

Pandharpur News : लोकसभा निवडणुकीत भाजपला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी साथ दिली होती. त्यामुळे या सत्तेचा उपयोग जनतेच्या विकासासाठी आणि विठ्ठलच्या सभासदांसाठी करण्याबाबतची भूमिका घेत शासन दरबारी विविध प्रश्न मांडण्यासाठी सुरवात केली आहे.
याचाच एक भाग म्हणून पिण्याचे पाणी सोडून भीमा नदीकाठचा वीजपुरवठा किमान आठ तास करण्यात यावा, अशी मागणी श्री. पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली होती. त्याची दखल घेऊन श्री. फडणवीस यांनी यासंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्री. पाटील यांनी भेट घेऊन वरील मागणीचे निवेदन दिले. राज्यामध्ये गतवर्षी पाऊसमान अत्यल्प झाले. सध्या उन्हाची तीव्रता पाहता शेतकऱ्यांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे.
शेतकरी अहोरात्र मेहनत करून पिके जगविण्याचा प्रयत्न करीत असून अशा तीव्र उन्हाळ्यामध्ये पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. सध्या भीमा नदीकाठचा वीज पुरवठा दोन तासच असल्यामुळे पिकांना पाणी देताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतातील उभी पिके करपू लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघत नसल्यामुळे बळिराजा आर्थिक अडचणीत सापडलेला आहे.
भीमा नदीकाठच्या गावांमधील शेतकऱ्यांच्या पाइपलाइन नदीपासून १५ ते २० हजार फूट अंतरावर असल्यामुळे कमी वेळेत पाणीपुरवठा होत नसल्यामुळे जनावरांस पिण्यासाठी पाणी मिळत नाही. विद्युत पुरवठा दोन तासांऐवजी आठ तास सुरू ठेवल्यास जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचीही सोय होईल.
वीज पुरवठ्याची वेळ वाढविण्याबाबत वारंवार शेतकऱ्यांकडून मागणी होत होती. यामुळे श्री. पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन मागणी केली असता त्यावर संबंधितांना आदेश देऊन लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या मागणीप्रमाणे वीजपुरवठा मंगळवारपासून सुरू होणार असून शेतकऱ्याची अडचण दूर होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
नदीत आलेले पाणी किमान २ महिने पुरेल. पण वीज नसेल तर पाणी असून काही फायदा शेतकऱ्यांना होणार नाही. पाणी वाया जाईल व उभी पिके जळून जातील. त्यामुळे सध्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी आपण ही मागणी केली होती. याची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत पिण्याचे पाणी ठेऊन शेतीस वीज सुरू करण्याच्या सूचना दिल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळेल, असे श्री. पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.