अखेर 'भीमा' रेड झोनच्या बाहेर! गाळप परवाना मिळाला - अध्यक्ष महाडिक | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर 'भीमा' रेड झोनच्या बाहेर! गाळप परवाना मिळाला - अध्यक्ष महाडिक
अखेर 'भीमा' रेड झोनच्या बाहेर! गाळप परवाना मिळाला - अध्यक्ष महाडिक

अखेर 'भीमा' रेड झोनच्या बाहेर; गाळप परवाना मिळाला - अध्यक्ष महाडिक

sakal_logo
By
राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्यास (Bhima Sugar Factory) 2021-22 या हंगामासाठी गाळप परवाना मिळाला असून, अखेर कारखाना रेड झोनच्या बाहेर आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष तथा भाजपचे (BJP) प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिली. यामुळे भीमा साखर कारखान्याच्या विरोधातल्या बऱ्याच चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

हेही वाचा: मारुती चितमपल्ली म्हणाले, हंस हा दूध व पाणी वेगळे करत नाही, तर...

या संदर्भात माहिती अशी की, कारखान्याकडे गेल्या गळीत हंगामातील 28 कोटी रुपये एफआरपी शेतकऱ्यांना देणे होते. राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांची अशीच अवस्था होती. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी पूर्ण केल्याशिवाय त्यांना गाळप परवाना देऊ नये, तसेच त्यांच्यावर आरआरसीची कारवाई करावी, अशी मागणी अनेक शेतकरी संघटनांनी साखर आयुक्तांकडे केली होती. त्यामुळे साखर आयुक्तांनीही कारखान्यावर याप्रश्नी कारवाईचा बडगा उगारला. भीमा कारखान्याकडे 28 कोटींची थकीत एफआरपी होती, तर गोडाऊनमध्ये सुमारे 70 कोटींची साखर शिल्लक होती, त्यामुळे भीमाला एफआरपी देणे अडचणीचे झाले होते. दरम्यान, कारखाना सुरू होणार का, शेतकऱ्यांना पैसे मिळणार का, गाळप परवाना मिळणार का, अशी चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू होती.

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अध्यक्ष महाडिक यांनी राज्यातील सर्वच साखर कारखान्यांची अडचणीची वस्तुस्थिती मांडली. याची दखल घेत आरआरसी अंतर्गत भीमा कारखान्याला साखर विक्रीची परवानगी मिळाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची एफआरपी पूर्ण झाली. अडचणीवर मार्ग काढून एफआरपी पूर्ण केल्याबद्दल तालुक्‍यातील अनेक गावात अध्यक्ष महाडिक यांच्या आभाराचे फलक लावण्यात आले. राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई झाली, मात्र चर्चा फक्त भीमा कारखान्याचीच सुरू होती.

हेही वाचा: जलद लसीकरणासाठी 'ही' कृती करा! महाराष्ट्राचा केंद्राला सल्ला

चालू गळीत हंगामात कारखान्याकडे गाळपासाठी सुमारे नऊ लाख मेट्रिक टन उसाची नोंद आहे. सर्व ऊस वेळेत गाळप करून कारखाना बंद होण्याअगोदर शेतकऱ्यांचे सर्व पैसे अदा केले जातील, तसेच इतर कारखान्यांप्रमाणे दरही चांगला देऊ, अशी ग्वाही अध्यक्ष महाडिक यांनी दिली. दरम्यान शेतकऱ्यांचा भीमा कारखान्याच्या काट्यावर मोठा विश्वास आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला ऊस कुठल्याही काट्यावर वजन करून आणावा व तो भीमाला द्यावा, असे आवाहन महाडिक यांनी केले आहे. या वेळी उपाध्यक्ष सतीश जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे उपस्थित होते.

loading image
go to top