esakal | कसलं अंगण अन्‌ रणांगण, भाजपचं हरवलंय सामाजिक भान; सोलापूर राष्ट्रवादीची सडकून टिका 

बोलून बातमी शोधा

BJPs lost social consciousness Solapur NCPs criticism

भाजपने केंद्र सरकारचा निषेध करावा 
कोरोना भारतात आला ही संपूर्ण केंद्र सरकारची चुक आहे. आतंरराष्ट्रीय सीमा व आतंरराष्ट्रीय विमानतळे केंद्र सरकारने वेळीच पाऊले उचलून सील करायला हवी होती. बाहेर देशातून येणाऱ्या प्रत्येकाला क्वारंटाईन केले असते तर आज संपूर्ण देशाला या महामारीचा सामना करावा लागला नसता. देशातील हजोरो प्राण वाचले असते. त्यामुळे भाजपने सत्ताची लालसा सोडून केंद्र सरकारचा निषेध करावा, अशी अपेक्षा कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केली 

कसलं अंगण अन्‌ रणांगण, भाजपचं हरवलंय सामाजिक भान; सोलापूर राष्ट्रवादीची सडकून टिका 
sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार जिल्हा प्रशासन आपल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. त्यांचे मनोधैर्य वाढवणे अपेक्षित असताना भारतीय जनता पार्टी महामारीच्या काळात, संकटाच्या काळात राजकारण करत असल्याचा आरोप सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील व सोलापूर शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी केला आहे. भारतीय जनता पार्टी सामाजिक भान हरवलेली पार्टी असून महामारीच्या काळात आंदोलन करण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय निषेधार्ह असल्याचेही त्यांनी सांगितले. 

उमेश पाटील म्हणाले, जिल्हा परिषद, महापालिकेत भाजपची सत्ता 
आपले "आंगण हेच रणांगण" अशी घोषणा देऊन भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये व सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आंदोलन पुकारले आहे, ते हास्यास्पद असून भाजपच्या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त, सर्वसामान्य जनता त्यांच्या आंदोलनाला अजिबात प्रतिसाद देणार नाही. भाजपची ही केवळ स्टंटबाजी असून आंदोलन करून ते केवळ स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगितले. 
सोलापूर शहराशिवाय जिल्ह्याचा संपूर्ण ग्रामीण भाग हा कोरोनामुक्त ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे. सोलापूर महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता असून सोलापूर शहरांमध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये आलेल्या अपयशाची जबाबदारी ज्यांच्याकडे महापालिकेची सत्ता आहे त्यांनीच स्वीकारायला हवी. परंतू, अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये एखाद्या ठिकाणी कुठल्या पक्षाची सत्ता आहे, हे महत्वाचे नसून समाजातील सर्वच घटकांनी, राजकीय पक्षांनी व सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी मानवतेच्या भावनेतून एकत्रितरित्या आलेल्या संकटाचा सामना करण्याची आवश्‍यकता असते. केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला आर्थिक पाठिंबा देण्याची नितांत आवश्‍यकता असताना, केंद्र सरकार महाराष्ट्राच्या हक्काचे पैसे देखील वेळेवर उपलब्ध करून देत नाही. याचा जाब महाराष्ट्रातील भाजपचे नेते, त्यांच्या दिल्लीतील नेत्यांना का विचारत नाहीत? भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी व त्यांनी पोसलेल्या उद्योगपतींनी, मुख्यमंत्री फंडामध्ये निधी देण्याऐवजी पीएम फंडामध्ये आर्थिक मदत का दिली? अशा महाराष्ट्रद्रोही भाजपच्या नेत्यांच्या राजकीय स्टंटबाजीला महाराष्ट्रातील जनतेने पुरते ओळखले आहे. 

संतोष पवार म्हणाले, सत्तेच्या लालसेपोटी भाजपची स्टंटबाजी 
कोरोना महामारी ही जागतिक आणीबाणी आहे संपूर्ण जग या माहामारी विरोधात लढत आहे. संपुर्ण देशात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असताना कोणताही पक्ष राजकारण करत नाही. केंद्र सरकारने दिलेल्या निकषांवर आधारित निर्देशावर महाराष्ट्र सरकार चांगले काम करीत असल्याचे सोलापूर शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले. महाराष्ट्रात प्रशासन, डॉक्‍टर, आरोग्य सेवक व पोलिस दल आपल्या जीवाची पर्वा न करता आपत्कालीन स्थितीत काम करत आहे, अशा कठीण परिस्थितीत एकजुटीन कोरोनाविरुद्धच्या लढाईत भाजपाने साथ द्यायला हवी. परंतु सत्ता लालसेने सरकारविरुद्ध निषेध करून शासन, प्रशासन, डॉक्‍टर, आरोग्य सेवक व पोलिस दल याचे आत्मबल संपवू पहात आहे. हे अतिशय खालच्या पातळीवरचे राजकारण भाजप करत आहे. त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केले ते सांगावे. महाराष्ट्राला आर्थिक मदत न करता केंद्रात मदत केली. त्यामुळे महाराष्ट्रचा सरकारचा निषेध करण्याचा अधिकार ते गमावून बसले आहेत. त्यांना निषेध करायचा असेल तर केंद्र सरकारचा करावा, जे आपत्कालीन मदत करण्यास जो महाराष्ट्र देशात सर्वात जास्त कर भरतो, त्या महाराष्ट्रासोबत दुजाभाव करत आहे.