esakal | पुण्यात टॅंकरची पळवापळवी ! ऑक्‍सिजनसाठी तीन तहसीलदार मुक्‍कामी

बोलून बातमी शोधा

oxygen tankers

रूग्णांसाठी सर्वच ठिकाणाहून मागणी वाढल्याने चाकण एमआयडीसीतील दोन्ही उद्योगात तीन शिफ्टमध्ये कर्मचारी रात्रंदिवस ऑक्‍सिजन निर्मितीचे काम करीत आहेत.

पुण्यात टॅंकरची पळवापळवी ! ऑक्‍सिजनसाठी तीन तहसीलदार मुक्‍कामी
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील अडीच हजार रूग्णांचा समावेश असून जिल्ह्यात सध्या 12 हजारांवर ऍक्‍टिव्ह रूग्ण आहेत. त्यातील तीन हजारांहून अधिक रूग्णांना ऑक्‍सिजनची गरज आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विशेषत: पुण्याची ऑक्‍सिजनची गरज मोठी असल्याने चाकण एमआयडीसीत ऑक्‍सिजनच्या टॅंकरची पळवापळवी सुरू आहे. त्यामुळे मोहोळ, माळशिरस, करमाळ्याचे तहसीलदार त्याठिकाणी (शुक्रवारी ता. 23) मुक्‍कामी गेले. दररोज कोणत्या ना कोणत्या तहसिलदारांना पुण्याला मुक्‍कामी पाठवावे लागत आहे.

हेही वाचा: जिल्ह्यात होणार 21 ठिकाणी ऑक्‍सिजन निर्मितीचे प्लॅन्ट !

राज्यातील ऍक्‍टिव्ह रूग्णांची संख्या सध्या सात लाखांपर्यंत असून आतापर्यंत कोरोनामुळे राज्यातील 63 हजार 928 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई, जळगाव, नाशिक, औरंगाबद, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये त्याचे प्रमाण अधिक आहे. कडक संचारबंदी करूनही रूग्ण वाढतच असून चिंतेची बाब म्हणजे हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही, बेड मिळाला तर ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर नाही म्हणून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. तर दुसरीकडे उपचारासाठी दवाखान्यात जाणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यामुळे रूग्णालयांना ऑक्‍सिजन कमी पडत आहे.

या पार्श्‍वभूमीवर मृत्यूदर रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील प्रशासन ऑक्‍सिजन कुठून मिळतो का, यासाठी धडपडत आहे. त्यातूनच ऑक्‍सिजन निर्मितीच्या प्लॅन्टवरून टॅंकरच पळवापळवी करू लागल्याची वस्तूस्थिती त्याठिकाणी गेलेले अधिकारी त्यांच्या वरिष्ठांना सांगू लागले आहेत. रूग्णांसाठी सर्वच ठिकाणाहून मागणी वाढल्याने चाकण एमआयडीसीतील दोन्ही उद्योगात तीन शिफ्टमध्ये कर्मचारी रात्रंदिवस ऑक्‍सिजन निर्मितीचे काम करीत आहेत.

हेही वाचा: ऑक्‍सिजन निर्मितीबाबत साखर कारखाने सकारात्मक : पालकमंत्री भरणे

पालकमंत्र्यांच्या नुसत्याच गप्पा अन्‌ आश्‍वासने

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्याने आपल्याला काहीच लक्ष देता आले नसल्याचे कारण पुढे करून वेळ मारून नेणारे पालकमंत्री तीन दिवस (रविवारपर्यंत) सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी काही तालुक्‍याचा आढावा घेतला असून आज रविवारी ते सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतील. मात्र, ते मूळचे पुणे जिल्ह्यातील असतानाही जिल्ह्यासाठी चाकण (जि. पुणे) एमआयडीसीतून पुरेशा प्रमाणात ऑक्‍सिजन उपलब्ध करून देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे अनेक रूग्णालयांना मागणीच्या प्रमाणात ऑक्‍सिजन मिळत नसून प्रशासनही चिंतेत आहे.

रेमडेसिवीरचीदेखील अशीच स्थिती असून आजही रूग्णांच्या नातेवाईकांना त्या इंजेक्‍शनची शाश्‍वती वाटत नाही. ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर पुरेसे नाहीत, रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा तुटवडा कायम असून रूग्णालयांमध्ये तीव्र, अतितीव्र लक्षणे असलेल्या रूग्णांसाठी बेड मिळत नाहीत. ही परिस्थिती बदलण्याची गरज असून त्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करून रूग्णांसह रूग्णालयांना, प्रशासनाला शाश्‍वती देण्याची गरज आहे. मात्र, पालकमंत्री केवळ आणि केवळ आश्‍वासनेच मिळत असल्याने ऑक्‍सिजन मिळेल की नाही, तो नाही मिळाला तर रूग्णांचा जीव जाईल, या भितीने तहसिलदारांना त्याठिकाणी मुक्‍कामी रहावे लागत आहे.