esakal | जिल्ह्यात होणार 21 ठिकाणी ऑक्‍सिजन निर्मितीचे प्लॅन्ट !

बोलून बातमी शोधा

oxygen generation projects

शहरात तीन तर ग्रामीण भागातील 18 ठिकाणी हवेतून ऑक्‍सिजन तयार करण्याचे प्रकल्प उभारले जाणार आहेत.

जिल्ह्यात होणार 21 ठिकाणी ऑक्‍सिजन निर्मितीचे प्लॅन्ट !
sakal_logo
By
तात्या लांडगे :

सोलापूर : जिल्ह्यातील रूग्णांसाठी लागणारा ऑक्‍सिजन वेळेत पोहोच करण्याच्या दृष्टीने नियोजन करत असताना प्रशासनाची झोपच उडाली आहे. मात्र, आता त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ठोस पाऊल उचलले आहे. त्यासाठी आता शहरात तीन तर ग्रामीण भागातील 18 ठिकाणी हवेतून ऑक्‍सिजन तयार करण्याचे प्रकल्प उभारले जाणार आहेत.

हेही वाचा: क्या बात ! सांगोल्यातील २३ गावांत अद्याप कोरोनाचा शिरकाव नाही

शहर-जिल्ह्यातील रूग्णालयांमध्ये खाटा आहेत, परंतु ऑक्‍सिजन बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर नाहीत, हे वास्तव दिवसेंदिवस गडद होऊ लागले आहे. सध्या जिह्यातील रूग्णांसाठी पुणे, बेल्लारी, विशाखापट्टणम, हैदराबाद, उस्मानाबाद, लातूरसह विविध ठिकाणांहून ऑक्‍सिजन उपलब्ध केला जात आहे. ऑक्‍सिजनमुळे कोणताही रूग्ण दगावणार नाही, याची खबरदारी जिल्हाधिकारी श्री. शंभरकर, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, प्रातांधिकारी हेमंत निकम यांनी घेतली आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनही गरजेनुसार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचा विभागीय स्तरावर पाठपुरावा सुरुच आहे. शहरातील बॉईज हॉस्पिटल व कामगार विमा रूग्णालयात (ईएसआय) महापालिकेच्या वतीने ऑक्‍सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्याठिकाणी दररोज 150 सिलिंडर ऑक्‍सिजन तयार होणार आहे.

हेही वाचा: ऑक्‍सिजन निर्मितीबाबत साखर कारखाने सकारात्मक : पालकमंत्री भरणे

मशिनद्वारे अशी होईल ऑक्‍सिजन निर्मिती

हवेत 21 टक्‍के ऑक्‍सिजन असतो. तर 78 टक्‍के नायट्रोजन असतो. एक टक्‍का कार्बन डायऑक्‍साईड असतो. हवेतील शुध्द ऑक्‍सिजन संकलित करून तो सिलिंडरमध्ये भरता येऊ शकतो, अशी तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे. एका विशिष्ट आकाराच्या मशिनमध्ये हवा शोषून घेतली जाते आणि त्यातून नायट्रोजन व कार्बन डायऑक्‍साईड बाजूला केला जातो. त्यासाठी विशिष्ट असे केमिकलचा वापर केला जातो. या मशिनद्वारे हवेतील 99 टक्‍के शुध्द ऑक्‍सिजन संकलित होऊन तो रूग्णासाठी वापरला जाणार असून त्याचा वापर रूग्णांना केला जाणार आहे. या मशिनची किंमती किमान 50 लाख ते सव्वाकोटींपर्यंत आहे.

झांडाचे महत्त्व कोरोनाने केले अधोरिखित

एकूण जमिनीच्या क्षेत्रफळापैकी 33 टक्‍के क्षेत्रात वृक्ष लागवड गरजेची आहे. जेणेकरून पर्यावरणीय संतुलन निरोगी राहू शकते. मात्र, शहरीकरण, औद्योगिकरणाचा वेग स्पर्धेच्या काळात वाढू लागला आणि शहरांचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला. नद्याही पुनर्जिवित झाल्या नाहीत. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग उभारणीपासून ते मोठमोठ्या टोलेजंग इमारती उभारताना वृक्षतोड प्रचंड झाली. शासनस्तरावरून कोट्यवधी वृक्षलावगड झाली, परंतु त्याचे जतन झालेच नाही. मात्र, त्यावेळी ज्येष्ठांनी सांगितलेल्या गोष्ट आता खरी ठरू लागली असून ऑक्‍सिजनअभावी अनेकांना जीव गमवावा लागत आहे. कोरोनाच्या संकटातून शासन, प्रशासन आणि नागरिक काहीतरी धडा घेतील, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा: उजनीचा पाणीसाठा आला 20 टक्‍क्‍यांवर

लवकरच वर्कऑर्डर दिली जाईल

"शहरातील रूग्णांची गरज भागविण्यासाठी बॉईज हॉस्पिटल व ईएसआय हॉस्पिटल, या दोन ठिकाणी 50 आणि 100 सिलिंडर ऑक्‍सिजन दररोत तयार होईल. त्याची निविदा काढून लवकरच वर्कऑर्डर दिली जाईल. त्यानंतर रूग्णांना ऑक्‍सिजन कमी पडणार नाही, असा विश्‍वास आहे."

- पी. शिवशंकर, महापालिका आयुक्‍त, सोलापूर

21 ठिकाणी जिल्ह्यात ऑक्‍सिजन प्लॅन्ट

"ऑक्‍सिजनची कमतरता अजूनही संपलेली नाही. जिल्ह्यातील कोणत्याही रूग्णाला ऑक्‍सिजन कमी पडू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणाहून त्याचे नियोजन केले जात आहे. महिनाभरात 21 ठिकाणी जिल्ह्यात ऑक्‍सिजन प्लॅन्ट उभारले जातील."

- भारत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर

रूग्णांसाठी ऑक्‍सिजन निर्मितीचा प्रकल्प

"संपूर्ण देशभरातच ऑक्‍सिजनची कमतरता भासत आहे. रूग्णसेवा हेच आमचे व्रत असतानाही ऑक्‍सिजन कमी पडत असल्याने इच्छा असूनही रूग्णांना ऑक्‍सिजनअभावी सेवा देण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे आता मी स्वत: रूग्णांसाठी ऑक्‍सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारत आहे."

- डॉ. प्रसन्न कासेगावकर, सीएनएस हॉस्पिटल, सोलापूर