मुंढेवाडीचा बसवराज पोचला "स्पोर्टस्‌ ऍथॉरिटी ऑफ इंडिया'मध्ये ! देतो देशभरातील खेळाडूंना प्रशिक्षण

Basavraj Kore
Basavraj Kore

अक्कलकोट (सोलापूर) : शेतकरी कुटुंबाचा संस्कार आणि वारसा असलेल्या मुंढेवाडी (ता. अक्कलकोट) येथील बसवराज चंद्रकांत कोरे हा तरुण भारतीय खेल प्राधिकरणात खेळाडूंच्या उच्च दर्जाच्या खेळासाठी प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे. फक्त खेळणे महत्त्वाचे नसून आरोग्याचा दर्जा आणि कौशल्य प्राप्त कसे करावे याचे शिक्षण उदयोन्मुख खेळाडूंना देऊन त्यांच्या आरोग्यासाठी उत्तम दिशा देण्याचे काम तो करीत आहे. 

भारतात अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात आणि त्यात खेळाडूंची संख्या देखील मोठी आहे. पण नुसते खेळून काहीच साध्य होत असून त्यासाठी खेळात सातत्य प्राप्त करण्यासाठी अनेक प्रकारचे कौशल्य प्राप्तीनंतर खेळणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. ते मिळविण्यासाठी शारीरिक कष्ट करण्याची तयारी आणि कौशल्य गुणवत्ता ही खेळाडूकडे असलीच पाहिजे, असे बसवराज यांचे मत आहे. स्वतः एमए एमपीएड ही पदवी घेऊन खेळातील डॉक्‍टरेट ही पदवी बनारस हिंदू विश्व विद्यालय, वाराणसी येथून प्राप्त होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. कुठल्या इंग्रजी माध्यमातून न शिकता गावातच प्राथमिक शिक्षण, तडवळ येथे माध्यमिक तर अक्कलकोट येथे मंगरुळे महाविद्यालयात शिकलेला बसवराज हा पुढे एमपीएड नंतर भारतीय खेल प्राधिकरणात दिल्ली येथे उदयोन्मुख खेळाडूंना आरोग्य प्रशिक्षण देण्यास कोच म्हणून दाखल झाला आहे. 

भारताच्या विविध भागांतून प्रशिक्षण घेण्यास या ठिकाणी खेळाडू अंतिमरीत्या दाखल होत असतात. त्यांना आरोग्य शिक्षण देण्याचे काम बसवराज करीत आहे, ज्यात खेळाडूंचे मानसशास्त्र, औषधे, आरोग्य तंदुरुस्त ठेवणे, आहारावर नियंत्रण ठेवणे, खेळण्यास सदैव तंदुरुस्त राहणे, खेळाडूंची मानसिक स्थिती बळकट करणे आदी बाबी खेळाडूंना मार्गदर्शन करून त्या उत्तम राहावेत याचे प्रशिक्षण तेथे देण्याचे काम डॉ. अंकुश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली तो सतत करतो आहे. 

आजपर्यंत त्याने ग्वालियर, पतियाळा, बंगळूर, पुणे, मुंबई, पंजाब, हरियाना, गोवा आदी अनेक ठिकाणी खेळाडूंना कौशल्यप्राप्तीचे प्रशिक्षण दिले आहे. तिथे खेळातील वेग, त्यात वापरायची ऊर्जा, खेळावर मिळवायचे नियंत्रण तसेच क्रिया व प्रतिक्रिया या सर्व बाबींवर एकेक उच्च कौशल्य प्राप्तीसाठी पंधरा दिवस प्रशिक्षण देण्याचे काम हा तरुण आपल्या देशात उत्तम खेळाडू तयार व्हावेत यासाठी करतो आहे. 

याची पुढची पायरी म्हणून त्याने पुण्यात 80 ते 100 विद्यार्थ्यांसाठी "कोरे बाय रॉयल्स' ही स्वतःची संस्था स्वत:च्या मार्गदर्शनाखाली सुरू केली आहे. त्याने याबाबत स्पष्ट केले, की लोक काय म्हणतील याचा विचार चुकून देखील करू नये. आपण वेगळी वाट निवडून त्यात यशस्वी होऊन दाखवावे तरच समाज आपली योग्य दखल घेऊन मानसन्मान देईल. आपण चार- पाच प्रयत्न करून थकतो आणि होत नाही म्हणून थांबतो; पण ज्या वेळी थांबतो त्याच्यापुढे यशच असते पण आपण निराश होतो आणि खचून माघारी फिरतो. नेमकी हीच चूक आपल्याला महागात पडत असते. यासाठी गुणी व महत्त्वाकांक्षी खेळाडूंनी खेळात यावे. यात शिष्यवृत्ती मिळते, त्याची माहिती घेऊन प्रशिक्षण घेऊन महाराष्ट्राचे पर्यायाने देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी दोन पाऊल पुढे टाकावे. यश आपली वाट पाहात आहे. 

माणूस पुढे आजारी पडू किंवा संकट येईल म्हणून विमा काढतो; पण खेळात कौशल्य मिळवून दररोज एक तास शरीरास वेळ देऊन तंदुरुस्त ठेवल्यास आपले आरोग्य अविरत चांगले राहते. मानसिक स्थिती उत्तम ठेवणे आणि सुदृढ राहणे याशिवाय या धकाधकीच्या काळात पर्याय नाही. तुम्हाला खेळात पुढे जायचे नसले तरी घरी राहून सुद्धा सर्व आरोग्य कौशल्ये प्राप्त करून निरोगी व आनंदी जीवन जगू शकता. 
- बसवराज कोरे, 
मुंढेवाडी, ता. अक्कलकोट 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com