
मंगळवेढा : रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर मंगळवेढा ते सोलापूर दरम्यान मंगळवेढ्यापासून तीन किलोमीटरवर असलेल्या हॉटेल सुगरणजवळ इथाईल ॲसिटेट या रसायनाची वाहतूक करणारा टँकर उलटला. चालकाच्या झोपेच्या भरात दुभाजकाला धडकून टँकर उलटल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली. रविवारी सकाळी तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली. अखेर सात तासांच्या अथक परिश्रमानंतर वाहतूक पूर्ववत करण्यास यश आले.