कोरोना व लॉकडाउनमुळे मंगळवेढेकर त्रस्त तर लोकप्रतिनिधी पोटनिवडणुकीत व्यस्त ! प्रशासनाचा मात्र दुजाभाव

Corona Mangalwedha
Corona Mangalwedha

मंगळवेढा (सोलापूर) : दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन प्रशासनाने अंशतः लॉकडाउन जाहीर करत कडक निर्बंध लादले आहेत. तालुक्‍यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना नेते मात्र निवडणुकीच्या धामधुमीत गुंतले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेस त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशातच प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडत आहे. 

शहरामध्ये असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये सध्या 40 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विधानसभा पोटनिवडणुकीमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी दामाजीनगर व चोखामेळानगर कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहे. ग्रामीण भागामध्ये जालीहाळ येथे देखील रुग्णांची संख्या आढळून आली. मात्र त्या ठिकाणी कडक उपाययोजना दिसून आल्या नाहीत. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या आटोक्‍यात आणण्याच्या दृष्टीने प्रशासनाने आक्रमक पावले उचलणे आवश्‍यक आहे. 

सध्या शहरात व ग्रामीण भागात कोरोना नियमांचे पालन न करणारे नागरिक मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. यावर मात्र निर्बंध लावण्याची आवश्‍यकता आहे. सध्या लावलेल्या निर्बंधातून छोट्या व्यावसायिकांना बळीचा बकरा बनवले जात आहे. पंचायत समितीमध्ये कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यामुळे तालुक्‍यातील शासकीय कार्यालयांमध्ये कोरोना प्रतिबंधक असलेल्या सॅनिटायझरचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे शासकीय कार्यालये जनतेच्या दृष्टीने आवो-जावो घर तुम्हारा, अशी अवस्था झाली आहे. 

तालुका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असून, पोटनिवडणुकीच्या निमित्ताने होत असलेल्या विविध नेत्यांच्या सभांवर, दौऱ्यांवर कोरोनाची कोणतीच भीती दिसून येत नसून, प्रत्येक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. सभेच्या ठिकाणी मास्क व सॅनिटायझरची सक्ती करण्याची आवश्‍यकता आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी गर्दी टाळा, सामाजिक अंतर ठेवा, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा, स्वच्छता ठेवा अशा अनेक सूचना वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व शासनाकडून देण्यात येत आहेत. रस्त्यावर उभे राहून विनामास्क दुचाकीवर फिरणाऱ्या दुचाकीस्वारांकडून 500 रुपये दंड आकारणी केली जाते; मात्र गर्दीच्या ठिकाणी पोलिस दुर्लक्ष करत आहेत. छोट्या व्यावसायिकांवर कारवाई करून त्यांच्यावर निर्बंध लादले जात आहेत. 

शहरामध्ये कोव्हिड रुग्णालयाची आवश्‍यकता आहे. सध्या उपचारासाठी सोलापूर किंवा पंढरपूरला जावे लागत आहे. सोलापूरमध्ये बेड उपलब्ध होण्याबाबत साशंकता आहे. सध्याचा धोका लक्षात घेता मंगळवेढा शहरामध्ये कोव्हिड रुग्णालय व पुरेसे वैद्यकीय कर्मचारी उपलब्धता करणे आवश्‍यक आहे. मात्र जबाबदार नेते निवडणुकीच्या आखाड्यात वावरत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याकडे कोण लक्ष देणार, असा सवाल विचारला जात आहे. 

विनामास्क, सोशल डिस्टन्स न ठेवता लोकांची गर्दी गावोगावी दिसत असताना, या गर्दीकडे पोलिस व स्थानिक प्रशासन का लक्ष देत नाही? कोरोनाचे निर्बंध छोटे दुकानदार, छोटे व्यावसायिक, हातावर पोट असणाऱ्या लोकांसाठीच आहे का? निवडणुकीच्या गर्दीवर लक्ष न देता प्रशासन त्यांच्यावर एवढे मेहेरबान का? 
- प्रभुलिंग स्वामी, 
हॉटेल व्यावसायिक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com