Comb Duck : मंगळवेढ्यात चक्रवाक पाठोपाठ नकटा बदकांचे आगमन

मंगळवेढा शहरवासीयांनी आपली तहान व गरजा भागवून सोडलेल्या शहरालगत साचलेल्या पाण्याच्या डबक्यात नकटा बदक उदरनिर्वाह करताना आढळून आली आहेत.
Comb Duck
Comb Ducksakal
Summary

मंगळवेढा शहरवासीयांनी आपली तहान व गरजा भागवून सोडलेल्या शहरालगत साचलेल्या पाण्याच्या डबक्यात नकटा बदक उदरनिर्वाह करताना आढळून आली आहेत.

ब्रह्मपुरी (सोलापूर) - मंगळवेढा शहरवासीयांनी आपली तहान व गरजा भागवून सोडलेल्या शहरालगत साचलेल्या पाण्याच्या डबक्यात ही बदके उदरनिर्वाह करताना आढळून आली आहेत. चोचीवर टेंगूळ असलेल्या व पक्षी कुलातून नष्ट होत चाललेल्या या बदकांच्या आगमनामुळे पक्षीनिरीक्षक उत्साहित झाले आहेत.

नर व मादी बदके दिसायला सारखेच असतात मात्र मादी बारीक चणीची असते.‌ बदकाच्या चोचीवर जांभळाएवढे एक गोलाकार टेंगूळ असते. याच कारणावरून या बदलाकांना नकटा बदक, नाकेर, नंदीमुख अशी नावे दिली आहेत. मादी बदकाच्या चोचीवर असे टेंगूळ नसते. तरी सुद्धा मादी बदकांना नकटी, नाकेरी या नावाने ओळखले जाते. इंग्रजीत यांना कोंब डक (Comb duck) या नावाने ओळखतात. या बदकांच्या शरीरावरील पिसांचा रंग काळा असून त्यावर निळी - हिरवी झाक असते. पोटाकडील भाग पांढरा शुभ्र असतो. डोके व मान हेही पांढरे असून त्यावर काळे ठिपके असतात.

पाकिस्तानातील सिंध प्रांत व नेपाळमधील तराई तसेच हिमालयाच्या पर्वत प्रदेशात हिवाळ्यात हिमवर्षावाला प्रारंभ होण्यापूर्वी हे पक्षी भारतीय उपखंडातील पठारी प्रदेशात, दक्षिणेकडील राज्यांत स्थलांतर करुन येतात. कर्नाटक व केरळातील किनारपट्टीवरील भातशेतातील कोवळे कोंब व पाने, दलदल प्रदेशातील तलम पाणवनस्पती व त्यांचे पाती, जलकीटक, अळ्या, बेडकी, गोगलगाय, खेकडे, लहान साप, व त्यांची पिल्ले इत्यादी या बदकांचे प्रमुख खाद्य आहे.

'कित्येक वर्षांपासून सोलापूर शहरालगतच्या तुळजापूर रस्ता, देगाव, बाळे या परिसरातील शेकडो एकर क्षेत्रात कुरण शेती केली जात होती. या ठिकाणी मोठ्या समूहाने नकाट्या बदकांचा वावर असायचा. मात्र गेल्या दशकापासून होत असलेल्या शहराच्या हद्दवाढीमुळे या पक्ष्यांचा चराऊ भाग नष्ट झाला आहे. परिणामी हे पाहुणे पक्ष्यांनी सोलापूरलगतच्या भागाकडे आपली पाठ फिरवली आहे. नेहमी निसर्गाची हुलकावणी असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात ही स्थलांतरित बदके नेहमी येत असतात हे जिल्हाचे वैभव आहे.'

- डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक

'पवित्र संताच्या भूमीत विविध प्रकाराच्या पाहुणे पक्षांचे आगमन झाले आहे.या परिसरात पक्षी संमेलन भरत असल्याचे चित्र दिसत असून शहराच्या वैभवात भर पडली आहे.'

- डॉ. अतुल निकम, पक्षी अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com