esakal | Ujani Dam : 'उजनी'च्या प्रदूषणात भर घालतेय जलपर्णी! पिण्यासाठी होतोय दूषित पाण्याचा पुरवठा
sakal

बोलून बातमी शोधा

उजनी जलाशयाच्या प्रदूषणात भर घालतेय जलपर्णी !

पुणे शहरातील व परिसरातील जलपर्णी, पाणवनस्पती वाहत्या पाण्याबरोबर उजनी जलाशयामध्ये येऊन नदीकाठच्या परिसरात पसरल्याचे दिसत आहे.

उजनी जलाशयाच्या प्रदूषणात भर घालतेय जलपर्णी !

sakal_logo
By
राजाराम माने : सकाळ वृत्तसेवा

केत्तूर (सोलापूर) : उजनी (Ujani Dam) जलाशयातील पाणीसाठ्याने आपले शतक पूर्ण केले असून, जलाशयाची 111 टक्‍क्‍यांकडे वाटचाल सुरू आहे. पुणे (Pune) जिल्हा तसेच पुणे जिल्हा परिसरात होत असलेल्या पावसाच्या बळावर वाढत्या पाण्याबरोबर पुणे शहरातील व परिसरातील जलपर्णी, पाणवनस्पती वाहत्या पाण्याबरोबर उजनी जलाशयामध्ये येऊन नदीकाठच्या परिसरात पसरल्याचे दिसत आहे. या पाणवनस्पतीमुळे नदीकाठच्या परिसरातील पाणी प्रदूषणाची (Water pollution) समस्या आणखी वेगाने वाढून डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा उग्ररूप धारण करत चालला आहे. प्रशासन नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात आता काय भूमिका घेणार? की त्यांना वाऱ्यावर सोडून देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा: पवारांच्या उपस्थितीत कॉंग्रेसला धक्का! सुशीलकुमार शिंदे म्हणाले...

उजनी जलाशयातील वाढत्या पाणी प्रदूषणाची मगरमिठी दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालली आहे. एरव्ही पुणे परिसरातील केमिकल कंपन्या, कारखाने, साखर कारखाने यांमधून निघणारे प्रदूषित पाणी व मैलायुक्त घाण पाणी पावसाळ्याच्या दिवसात नजीकच्या ओढ्यात सोडून दिल्याने, पुढे तेच वाहत येऊन उजनी जलाशयातील पाण्यात मिसळत होते. त्यामुळे काचेप्रमाणे स्वच्छ चवदार दिसणारे पाणी आता प्रदूषणाच्या सर्व सीमा ओलांडून पुढे गेले आहे. हे कमी की काय म्हणून आता पुणे व दौंड परिसरात सातत्याने दिसणारे नागझरी (जलपर्णी) वनस्पती आता उजनी जलाशयातील पळसदेव, काळेवाडी, डाळज, चांदगाव (ता. इंदापूर), टाकळी, खातगाव, पोमलवाडी, केत्तूर, गोयेगाव, गवळवाडी (ता. करमाळा) अशा विस्तीर्ण पणीसाठ्यातील किनाऱ्यावर वाहत्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर येऊ लागली आहे. तसेच ती वाऱ्याबरोबरही पुढे पुढे सरकत आहे.

सध्या उजनीतील पाण्यात वाढ होत असल्याने ही वनस्पती वारे सुटेल त्या दिशेने पुढे निघत आहे. त्यामुळे मच्छिमारांनी टाकलेल्या जाळीत ही वनस्पती अडकत असल्याने मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच भीमाशंकर व इतर परिसरातील अतिशय जहाल विषारी सापही अनेकदा या पाणवनस्पतींवर असल्याचे मच्छीमारांना आढळून आले आहे. नदी किनाऱ्यावर मच्छीमारांनी बांधलेल्या होड्यांमध्ये हे साप अडकल्यास त्यातून बाहेर काढण्यासाठी मच्छीमारांना तासन्‌ तास शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. तसेच नागझरी वनस्पती एकाच जागेवर थांबून राहिल्यास तेथील पाण्याचा रंग काळाकुट्ट बनतो आणि पाणी अतिशय घाण झाल्याने मासे मरण्याच्या प्रमाणात वाढ होते. तसेच या काळ्या पाण्यामुळे पाण्यात उतरणारे मच्छीमार व शेतकऱ्यांच्या अंगाला खाज सुटणे, गांधी येणे असे प्रकार होत आहेत. पाण्याला विशिष्ट प्रकारची दुर्गंधी येते. या ना त्या कारणामुळे जलाशयाचे पाणी वरचेवर दूषित होत असताना व ते पिण्यायोग्यही राहिले नसताना यावर काहीही उपाययोजना केली जात नाही. हेच दूषित पाणी मात्र सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेद्वारे नागरिक पिण्यासाठी वापरतात, त्यामुळे रोगराई मात्र वाढत आहे.

हेही वाचा: उजनी धरण फुल्ल ! भीमा नदीत 30 हजार क्‍युसेकचा विसर्ग

श्रावण महिन्यापासून माशांना योग्य दर मिळत नाही, त्यातच आता जलपर्णीचे संकट आल्याने मासे सापडण्याचे प्रमाणही घटले आहे. त्यामुळे मच्छीमारी व्यवसाय संकटात आला आहे.

- हनुमंत कनिचे, लखन नगरे, मच्छिमार, केत्तूर

loading image
go to top