करमाळ्यात लॉकडाउन करण्यावरून सोशल मीडियात मतमतांतरे 

Controversy on social media over lockdown in Karmala
Controversy on social media over lockdown in Karmala

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील कोरोनाच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. बुधवारपर्यंत तालुक्‍यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1085 झाला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढती संख्या कमी करण्यासाठी करमाळ्यात जपता कर्फ्यू लावावा, असा सूर उमटत असतानाच जनता कर्फ्यू नको, असे म्हणणाराही एक वर्ग पुढे आल्याने करमाळ्यातील जनता कर्फ्यू रद्द झाला आहे. तर करमाळा बंदबाबत प्रशासनाने कोणताही आदेश दिला नसल्याचे सांगितले आहे. करमाळा शहर व तालुक्‍यात वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा लक्षात घेऊन किरणा व्यापारी संघटनेने 10 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर सात दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेतला. याबाबत बंदला अनेकांनी विरोध दर्शवला आहे. याविषयी सोशल मीडियातून वेगवेगळे मेसेज फिरत आहेत. 
करमाळा शहरातील व तालुक्‍यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणावर वाढत आहे. सध्या हे प्रमाण तपासणी केलेल्यामध्ये 25 टक्के जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येत आहे. वाढत्या रुग्णांची संख्या पहाता कोविड सेंटरवरही ताण येऊ लागला आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची साखळी तोडण्यासाठी शहरातील काही व्यापाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन करमाळा शहरात जनता कर्फ्यू जाहीर केला. मात्र जनता कर्फ्यूला विरोध होत असल्याने ता. 10पासून जनता कर्फ्यू रद्द झाला आहे. 
करमाळा येथे जनता कर्फ्यूविषयी शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय शिंदे, नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधिक्षक मनोज पाटील, तहसीलदार समीर माने, पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांना निवेदन ही दिले होते. 

एकत्र निर्णय घ्यावा 
कोरोनाविषयी सर्वांनीच काळजी घेणे गरजेच आहे. करमाळा येथे जनता कर्फ्यूबाबत स्थानिक सर्व पक्षीय नेते मंडळी, प्रशासकीय अधिकारी व नगरसेवकांनी एकत्र निर्णय घ्यावा. जो निर्णय होईल तो सर्वांनी मान्य करावा. 
- संजय शिंदे, आमदार, करमाळा 

अनेक व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण 
करमाळ्यातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता, जनता कर्फ्यू घेण्याबाबत काही व्यापाऱ्यांनी चर्चा केली. व्यापारी पेठेतील अनेक व्यापारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. बंद पाळला तर कोरोनाची साखळी तुटू शकते. या भूमिकेतून बंद पाळण्याविषयी आम्ही भूमिका मांडली आहे. 
- महेश चिवटे, शिवसेना, उपजिल्हाप्रमुख 

दंडात्मक कारवाई होणे गरजेचे 
अचानक बंदचा निर्णय घेणे कायद्याला धरून नाही. बंद करण्याऐवजी गर्दी करणारे लोक, विनाकारण फिरणारे, मास्क न वापरणारे यांच्यावर दंडात्मक कारवाई होणे गरजेचे आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्रात नियमाचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे. बंदबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. 
- भालचंद्र पाठक, सचिव, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मध्य महाराष्ट्र 

संपादन : वैभव गाढवे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com