esakal | शहरात एकूण टेस्टमध्ये 12.45 टक्‍के लोक पॉझिटिव्ह ! उपमहापौरांच्या प्रभागात उच्चांकी मृत्यू

बोलून बातमी शोधा

कोरोना पॉझिटिव्ह.
शहरात एकूण टेस्टमध्ये 12.45 टक्‍के लोक पॉझिटिव्ह ! उपमहापौरांच्या प्रभागात उच्चांकी मृत्यू
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : दुसऱ्या लाटेतील कोरोनाने शहरातील बहुतेक नगरांना वेढा घातला असून, लहान-मोठ्यांनाही कवेत घ्यायला सुरवात केली आहे. मागील दहा महिन्यांच्या तुलनेत सध्या उच्चांकी पॉझिटिव्ह रेट असून एकूण टेस्टमध्ये 12.45 टक्‍के लोक कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. तर मृत्यूदर मार्च 2021 च्या तुलनेत वाढला असून मार्चमध्ये शहरात दररोज एकूण बाधितांमधील 1.75 टक्‍के रुग्णांचा मृत्यू व्हायचा. आता 3.69 टक्‍के रुग्णांचा मृत्यू होऊ लागला आहे. प्रभाग 23 आणि 24 मध्ये सर्वाधिक 163 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरातील एकूण 26 पैकी 13 प्रभाग कोरोनामुक्‍त झाले होते. सभागृह नेते श्रीनिवास करली, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांच्या माध्यमातून सर्वप्रथम हाच प्रभाग कोरोनामुक्‍त झाला. मात्र, आता सर्वच प्रभागांमध्ये विशेषत: उपमहापौर राजेश काळे यांच्या प्रभागात सर्वाधिक रुग्णवाढ व मृत्यूचे प्रमाण आहे. या प्रभागात आतापर्यंत दोन हजार 810 रुग्ण आढळले आहेत. चिंतेची बाब म्हणजे, त्या ठिकाणी एकूण रुग्णांपैकी 8.16 टक्‍के रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील 26 प्रभागांपैकी 6, 7, 8, 16, 22, 23 आणि 24 या ठिकाणीही मृत्यू व रुग्णवाढ मोठी आहे. शहरातील कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नगरसेवकांच्या पुढाकारातून प्रशासनाने त्या ठिकाणी नागरिकांचे लसीकरण करणे, कोरोना टेस्टिंग वाढविण्याची गरज आहे. मात्र, पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत नगरसेवकांनी मदतीचा हात आखडता घेतल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: ना रेमडेसिव्हीर ना ऑक्‍सिजनची लागली गरज ! अठ्ठ्याण्णव वर्षीय आजोबांनी केली कोरोनावर मात

महापालिकेच्या अहवालानुसार....

  • शहरात दहा महिन्यांतील उच्चांकी 12.45 टक्के पॉझिटिव्ह रेट

  • 60 वर्षांवरील व्यक्‍तींचा सर्वाधिक 61.32 टक्‍के मृत्यूदर

  • 51 ते 60 वयोगटातील 20.8 टक्‍के रुग्ण कोरोनाचे बळी

  • तीन ते सात दिवस उपचार घेऊनही 297 जणांचा झाला मृत्यू

  • सात दिवसांच्या उपचारानंतरही 380 रुग्णांचे कोरोनाने घेतले बळी

  • प्रभाग 24 मध्ये सर्वाधिक 8.16 टक्‍के रुग्णांचा तर प्रभाग 23 मृत्यूदरात (7.68 टक्‍के) दुसरे

हेही वाचा: नगरसेवक म्हणतात, आयुक्‍त किंमत देत नाहीत ! कोरोनामुक्‍तीसाठी एकही घेतली नाही नगरसेवकांची बैठक

प्रभाग 19 मधील कामगारांनी करून दाखवलं

शहरातील एकूण 26 प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक सात, 23, 24 या परिसरात सुशिक्षित, नोकरदारांचे सर्वाधिक वास्तव्य आहे. तर प्रभाग 19 मध्ये कामगार वर्ग मोठा असून हातावरील पोट असलेले त्या ठिकाणी सर्वाधिक आहेत. तरीही, कोरोनाच्या दोन्ही लाटेत या प्रभागात सर्वात कमी 267 रुग्ण आढळले असून सध्या दहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मागील वर्षभरात कोरोनामुळे 16 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी विनाकारण घराबाहेर न पडणे, मास्क, सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेचे पालन केल्यानेच हे शक्‍य झाल्याचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी सांगितले.