esakal | ना रेमडेसिव्हीर ना ऑक्‍सिजनची लागली गरज ! अठ्ठ्याण्णव वर्षीय आजोबांनी केली कोरोनावर मात

बोलून बातमी शोधा

Fight Corona
ना रेमडेसिव्हीर ना ऑक्‍सिजनची लागली गरज ! अठ्ठ्याण्णव वर्षीय आजोबांनी केली कोरोनावर मात
sakal_logo
By
गजेंद्र पोळ

चिखलठाण (सोलापूर) : शेटफळ (ता. करमाळा) येथील 98 वर्षीय आजोबा कोरोना पॉझिटिव्ह आले. घरातील सर्व मंडळींना काळली वाटू लागली. त्यांना जेऊर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. मनाची खंबीरता व जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर आजोबांनी रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन व कृत्रिम ऑक्‍सिजनविना कोरोनावर यशस्वी मात केली असून, त्यांचे उदाहरण इतर रुग्णांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

शेटफळ येथील प्रल्हाद रामचंद्र पोळ यांचा जन्म 1923 साली झाला. त्यांचे शिक्षण जुन्या चौथीपर्यंत झाले. शिक्षकाची नोकरी लागत असतानाही वडिलांच्या इच्छेमुळे शेती करण्याचा निर्णय घेतला. वारकरी कुटुंबात जन्म झाल्याने ते शाकाहारी आहेत. लहानपणापासून व्यायामाची व वाचनाची आवड असून आजही ते नियमितपणे धार्मिक वाचन व दररोज व्यायाम करतात. वयाच्या 98 व्या वर्षीही त्यांना कोणताही आजार नाही. चष्म्याशिवाय पुस्तक व वर्तमानपत्रे वाचू शकतात. सर्व दातही चांगले असल्याने स्वतः ऊस सोलून खातात. आजही शेतातील किरकोळ कामे व गुरे सांभाळण्याचे काम करतात. शेतातील घरापासून दररोज नित्यनेमाने चालत गावात देवदर्शनासाठी येतात. आई व वडिलांनी लहानपणापासून केलेले संस्कार व लावलेल्या सवयी यामुळेच या वयातही कोरोनावर मात करणे शक्‍य झाल्याचे ते सांगतात.

हेही वाचा: ऑक्‍सिजन अन्‌ व्हेंटिलेटर बेड नाहीच ! रुग्णाला घेऊन नातेवाईक हॉस्पिटलच्या दारोदारी

15 एप्रिल रोजी त्यांच्या अंगात थोडासा ताप भरला. तोंडाला चव नसल्याने त्यांचा नातू ज्ञानेश्वर त्यांना जेऊर येथील दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेला. लक्षणांवरून डॉक्‍टरांनी कोव्हिड टेस्ट करण्यास सांगितले. टेस्ट पॉझिटिव्ह आली. घरच्या सर्वांना त्यांची काळजी वाटू लागली. उपचारासाठी खासगी कोव्हिड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. इतर टेस्ट नॉर्मल आल्या तर स्कोअरही फार नव्हता. परंतु वय जादा असल्याने काळजी वाटत होती.

हेही वाचा: उजनीतून एक थेंबही पाणी घेऊ देणार नाही ! आजी-माजी लोकप्रतिनिधी, सत्ताधारी व विरोधक आक्रमक

डॉ. किरण मंगवडे व डॉ. संदीप नाईकनवरे, डॉ. हर्षवर्धन गायकवाड यांनी त्यांच्यावर उपचार केले. उपचार सुरू असताना "मला काही होत नाही, तुम्ही काळजी करू नका' म्हणत खुद्द डॉक्‍टरांना व शेजारच्या इतर रुग्णांना धीर देण्याचे काम ते करत. दहा दिवस त्यांच्यावर कोव्हिडचे नियमित उपचार करण्यात आले. उपचाराला त्यांच्या शरीराने साथही दिली. रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन अथवा कृत्रिम ऑक्‍सिजनची गरजच पडली नाही. आज ते ठणठणीत बरे होऊन घरी गृह विलगीकरणात आहेत. जवळचे नातेवाईक भेटायला आले, तर "तुम्ही अंतरावरच लांब थांबा, हा आजार फार वाईट आहे, काळजी घ्या, मास्क लावा' असा सल्ला देतात.