esakal | नगरसेवक म्हणतात, आयुक्‍त किंमत देत नाहीत ! कोरोनामुक्‍तीसाठी एकही घेतली नाही नगरसेवकांची बैठक

बोलून बातमी शोधा

SMC_Corona
नगरसेवक म्हणतात, आयुक्‍त किंमत देत नाहीत ! कोरोनामुक्‍तीसाठी एकही घेतली नाही नगरसेवकांची बैठक
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त टेस्ट करणे, जनतेला कोरोनाच्या परिणामांची जाणीव करून देणे, प्रभागातील हातावरील पोट असलेल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सोडविणे, कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग, प्रभागातील कोणत्या नगरात कोरोना वाढतोय, त्याची कारणे शोधून नगरसेवकांच्या माध्यमातून उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र, आयुक्‍तांनी एकदाही त्यासंदर्भात नगरसेवकांची बैठक घेतलेली नाही. प्रभागच नव्हे तर शहर कोरोनामुक्‍त होण्यासाठी नगरसेवकांचा पुढाकार असतानाही प्रशासनातील समन्वयाअभावी आयुक्‍तांनी नगरसेवकांशी चर्चाच केलेली नाही, असा आरोप काही नगरसेवकांनी केला आहे.

नगरसेवकांप्रमाणेच महापालिकेत अधिकाऱ्यांनीही राजकारण सुरू केले आहे. याबद्दल महापौर श्रीकांचना यन्नम, आनंद चंदनशिवे यांनी आयुक्‍तांबद्दल पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे भर बैठकीत तक्रार केली. पोलिसांमुळेच सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने काहीच प्रयत्न केले नाहीत, असा आरोप श्री. चंदनशिवे यांनीही केला. जनतेतून आरोग्य कर घेऊनही आयुक्‍तांनी मागील वर्षात एकही वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली नाही. नगरसेवक कोरोना हद्दपार करण्यासाठी भांडवली निधी द्यायला तयार आहेत, मात्र आयुक्‍त त्याबद्दल काहीच बोलत नाहीत, असाही आरोप त्यांनी केला. शहरातील आठ झोनपैकी प्रत्येक झोनमधील अधिकारी, लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करून त्यांच्या प्रभागातील अडचणी जाणून घ्याव्यात. त्यावर ठोस उपाययोजना केल्यास निश्‍चितपणे शहर कोरोनामुक्‍त होईल, असा विश्‍वासही नगरसेवकांनी व्यक्‍त केला आहे.

हेही वाचा: ऑक्‍सिजन अन्‌ व्हेंटिलेटर बेड नाहीच ! रुग्णाला घेऊन नातेवाईक हॉस्पिटलच्या दारोदारी

आयुक्‍तांनी प्रशासनाच्या जोडीला नगरसेवकांची मदत घ्यावी

कोरोनाचा शहरातील प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची सांगड घालणे खूप गरजेची आहे. मात्र, आयुक्‍तांनी अजूनपर्यंत नगरसेवकांची कोरोनासंदर्भात बैठक घेतली नाही. लोकप्रतिनिधी व प्रशासनात समन्वय राहिलेला नाही. आयुक्‍तांनी झोननिहाय बैठकांचे आयोजन करून त्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नगरसेवकांची मदत घ्यावी.

- अमोल शिंदे, विरोधी पक्षनेता

हेही वाचा: उजनीतून एक थेंबही पाणी घेऊ देणार नाही ! आजी-माजी लोकप्रतिनिधी, सत्ताधारी व विरोधक आक्रमक

प्रभागाबद्दल माहिती असलेल्या नगरसेवकांची बैठक हवी

सध्याची गरज पाहून व्हेंटिलेटरसाठी मी निधी दिला असून, 15 लाखांच्या निधीतून महापालिका ती गरज भागवेल. आता लोकांचा जीव वाचावा, संसर्ग रोखण्यासाठीच प्राधान्य राहील. नगरसेवकांचा जनतेशी थेट संवाद असतो आणि प्रभागातील संपूर्ण माहिती नगरसेवकांना असते. त्यामुळे विविध कामांसाठी प्रशासनाने लोकप्रतिनिधींची बैठक घ्यायला हवी.

- देवेंद्र कोठे, नगरसेवक

आयुक्‍तांनी थांबवावी मनमानी

महापालिका आयुक्‍तांनी प्रभाग कोरोनामुक्‍तीच्या अनुषंगाने अजूनही बैठक घेतलेली नाही. कोरोना वाढीची कारणे, कोणत्या परिसरात रुग्ण वाढत आहेत, त्याची माहिती प्रशासनाने दिलेली नाही. आम्ही निधी द्यायला तयार आहोत, परंतु महापालिका अधिकाऱ्यांनी झोननिहाय बैठका घेण्याची गरज आहे.

- आनंद चंदनशिवे, नगरसेवक

आयुक्‍तांनी झोननिहाय बैठका घ्याव्यात

आयुक्‍तांची भेट घेऊन माझ्या भांडवली निधीतून प्रभाग 14 साठी रेमडेसिव्हीर व अन्य औषधे खरेदी करून शहरातील रुग्णांना द्यायला हवेत. कोरोना येऊन आता वर्ष पूर्ण झाले, परंतु आयुक्‍तांनी या संदर्भात एकदाही बैठक घेतलेली नाही. आयुक्‍तांनी प्रभागातील लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन प्रशासनाच्या माध्यमातून कोरोना हद्दपार करावा.

- रियाज खरादी, नगरसेवक

आयुक्‍तांच्या मनमानीचा शहराला फटका

कोरोनाच्या पहिल्या लाटेत महापालिकेला नवे आयुक्‍त मिळाल्याने लोकप्रतिनिधींना व शहरवासीयांना कोरोनामुक्‍तीची आशा वाढली. मात्र, अजूनही आयुक्‍तांनी नगरसेवकांची बैठक घेऊन कोरोनासंदर्भात चर्चा केलेली नाही. लोकप्रतिनिधींना विश्‍वासात न घेताच आयुक्‍तांनी मनमानी सुरू केल्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.

- सुरेश पाटील, नगरसेवक

आयुक्‍तांनी नगरसेवकांना विश्‍वासात घ्यायला हवे

सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी काम केल्यास प्रशासनाला त्याची मदत होईल; जेणेकरून कोरोनाचे संकट दूर होण्यास मदत होईल. "माझा प्रभाग माझी जबाबदारी' अंतर्गत 50 बेडच्या कोव्हिड केअर सेंटरसाठी प्रस्ताव दाखल केला असून त्यासाठी स्वत:ची रक्‍कम व महापालिकेचा निधी जनतेसाठी खर्च करीत आहे.

- गणेश वानकर, नगरसेवक