esakal | कासेगावातील राष्ट्रवादी मेळाव्यात कोरोना नियमांचा फज्जा! गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

कासेगावातील राष्ट्रवादी मेळाव्यात कोरोना नियमांचा फज्जा! गुन्हा दाखल

पंढरपूर तालुक्‍यातील कासेगाव येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्याला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मेळाव्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला.

कासेगावातील राष्ट्रवादी मेळाव्यात कोरोना नियमांचा फज्जा!

sakal_logo
By
भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : रेड झोन असलेल्या पंढरपूर (Pandharpur) तालुक्‍यातील कासेगाव (Kasegaon) येथे रविवारी (ता. 12) राष्ट्रवादीच्या (NCP) मेळाव्याला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मेळाव्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले. कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे पंढरपुरात पुन्हा कोरोना (Covid-19) वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. विधानसभा पोटनिवडणुकी दरम्यान पंढरपूर व मंगळवेढा (Mangalwedha) तालुक्‍यात कोरोना रुग्णसंख्या अधिक वाढली होती. याचे परिणाम आजपर्यंत लोकांना भोगावे लागले आहेत. सोलापूर (Solapur) जिल्ह्यात आजही सर्वाधिक रुग्ण हे पंढरपूर तालुक्‍यात असतानाही पक्षाच्या मेळाव्याला मोठी गर्दी होत असल्याने पोलिस काय कारवाई करणार, याकडेच आता लक्ष लागले आहे. दरम्यान, पोलिसांची परवानगी नसतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्याप्रकरणी पंढरपूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विजयसिंह देशमुख (Vijaysinh Deshmukh) यांच्यावर पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यामध्ये (Pandharpur Taluka Police Station) रविवारी सायंकाळी गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: "पंढरपूरच्या विठ्ठल साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करावी"

पंढरपूर तालुक्‍यातील कासेगाव व परिसरात जवळपास 20 हून अधिक कोरोना रुग्णसंख्या आहे. कासेगाव हे तर रेड झोनमध्ये असतानाही याच गावामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. सभा आणि मेळाव्यामुळे पंढरपुरात कोरोना वाढल्याचे ताजे उदाहरण असतानाही राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी यापासून कधी धडा घेणार, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विजयसिंह देशमुख, संदीप मांडवे, व्यापार व उद्योग सेलचे राज्य अध्यक्ष नागेश फाटे, मारुती जाधव आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख पदाधिकाऱ्यांची मेळाव्याकडे पाठ

विचार मंथन करण्यासाठी आयोजित केलेल्या या मेळाव्याकडेच भगीरथ भालके यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, राष्ट्रवादी कॉंगेसचे जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील, युवकचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे, माजी तालुका अध्यक्ष दीपक पवार, शहर अध्यक्ष सुधीर भोसले, विठ्ठल मासाळ, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष अरुण पांढरे, अरुण आसबे, यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. दरम्यान, विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके हे कारखान्याच्या कामाच्या निमित्ताने बाहेरगावी असल्याने ते मेळाव्याला उपस्थित राहू शकले नाहीत, असे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा: प्रश्‍नपत्रिकेतील चुकांमुळे 'मराठी'ची पेट रद्द! 15 सप्टेंबरला फेर परीक्षा

विजयसिंह देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल

पोलिसांची परवानगी नसतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्याप्रकरणी पंढरपूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विजयसिंह देशमुख यांच्यावर पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यामध्ये रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही देशमुख व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. पंढरपूर शहर व तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असल्याने कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊ नये, अशी विनंती पोलिसांनी केली होती. तरीही पदाधिकाऱ्यांनी मेळावा घेतला. या मेळाव्याला शेकडो लोकांनी गर्दी केली होती. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यानंतर आता पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यामध्ये कलम 188 नुसार पंढरपूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विजयसिंह देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top