esakal | न्यायालयात धाव : सोलापुरातील पाच मतदार संघाचा समावेश 
sakal

बोलून बातमी शोधा

court logo

राज्याच्या राजकारणात चर्चा सोलापूरची 
विद्यमान खासदारांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल सोलापूरच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. त्यामुळे देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सोलापूरची चर्चा झाली आहे. माजी सहकारमंत्री व सोलापूर दक्षिचणचे भाजप आमदार सुभाष देशमुख, मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने या विद्यमान लोकप्रतिनिधींच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे देखील येत्या काळात सोलापूर राज्याच्या राजकारणात चर्चेत येण्याची शक्‍यता आहे. 

न्यायालयात धाव : सोलापुरातील पाच मतदार संघाचा समावेश 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा ताजा असतानाच आता जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधी व मतदार संघाच्या बाबतीतील तक्रारी व याचिका समोर येऊ लागल्या आहेत. खासदार महास्वामी यांचे प्रकरण आता जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून न्यायालयात गेले आहेत. लोकप्रतिनिधी सभागृहात आणि याचिका/तक्रारी न्यायालयात अशीच स्थिती जिल्ह्याची झाली आहे. यातील काही याचिका न्यायालयाने दाखल करून घेतल्या आहेत तर काही याचिका दाखल होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. 
हेही वाचा - घोळ भाजपचा; डोकेदुखी शिवसेनेची! पक्षनेते पदावरून झेडपी अध्यक्ष हताश 
सोलापूर लोकसभा 
भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांनी देखील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. या शिवाय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार करणाऱ्यांनीही कॅव्हेटच्या माध्यमातून उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघ जात प्रमाणपत्रावर चर्चेत आला आहे. 
माढा लोकसभा 
माढा लोकसभा मतदार संघात प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणी दिवशी ईव्हीएममधून निघालेली मते यामध्ये तफावत असल्याचा मुद्दा पुढे करत ऍड. विजयराव मोरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 2019 ची लोकसभा निवडणूक ऍड. मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने माढ्यातून लढविली होती. 
हेही वाचा - खासदारांच्या याचिकेवर 13 मार्चला सुनावणी 
मोहोळ विधानसभा 
मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल सचिन थोरात यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आमदार यशवंत माने यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी बाबतचा मुद्दा थोरात यांनी उपस्थित केला आहे. न्यायालयात ही याचिका सध्या प्री ऍडमिशन स्थितीत आहे. 
अक्कलकोट विधानसभा 
2019 च्या विधानसभा निवडणुकीत धनसिंग राठोड यांच्या उमेदवारी अर्जावर दहा सुचकांपैकी एका सूचकाचे नाव खोडण्यात आले होते. अपक्ष लढण्यासाठी दहा सूचक आवश्‍यक असताना राठोड यांच्याकडे नऊच सूचक होते. म्हणून त्यांचा उमेदवारी अर्ज अपात्र करण्यात आला होता. या विरोधात राठोड यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. 
सोलापूर दक्षिण विधानसभा 
माजी सहकारमंत्री तथा सोलापूर दक्षिणचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढविताना सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात माहिती दडविली असल्याचा मुद्दा व निवडणुकीतील मते आणि मतमोजणीतील मते यामधील तफावतीबाबत माजी सभापती अप्पाराव कोरे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

loading image