esakal | सोलापूर: मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला बगल! आमदार प्रणिती शिंदेंविरुध्द गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

praniti shinde

सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला बगल! आमदार प्रणिती शिंदेंविरुध्द गुन्हा

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: इंधन व गॅस सिलिंडरसह जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरवाढीवरुन केंद्र सरकारविरोधात आंदोलन विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, नगरसेवक चेतन नरोटे, नगरसेविका फिरदोस पटेल, अनुराधा काटकर, तौफिक हत्तुरे, सुशिला बंदपट्टे, माजी महापौर अलका राठोड, संजय हेमगड्डी, देविदास गायकवाड, अर्जुनराव पाटील, नरसिंग कोळी, अंबादास करंगुळे यांच्याविरुध्द सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: आमदार प्रणिती शिंदे यांना मिळणार मंत्रिपद !

इंधन (पेट्रोल, डिझेल) हा विषय जीएसटीतून वगळण्यात आला, परंतु त्यावर राज्य व केंद्र सरकारकडून टॅक्‍स लावला जातो. त्यामुळे इंधनाचे दर सध्या वाढले आहेत. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी इंधन हे जीएसटीत आणण्याचा घाट घातला होता. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधानंतर तो विषय मागे पडला. इंधनाचे दर कमी होण्यासाठी राज्य सरकारने टॅक्‍स कमी करावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारने टॅक्‍स कमी करावेत, अशी मागणी महाविकास आघाडीची आहे. त्यातून सातत्याने विरोधक व सत्ताधारी आंदोलन करताना दिसत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊन जनहित धोक्‍यात येऊन नागरिकांच्या जिवीतास गंभीर धोका निर्माण होईल, अशा प्रकारचे वर्तन केल्याप्रकरणी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला जातो. मात्र, काही दिवसांनी सरकारच्या माध्यमातून सामाजिक हेतूसाठी केलेल्या आंदोलकांवरील (ज्यामध्ये कोणाचीही जिवित व वित्त हानी झालेली नसते) गुन्हे मागे घेतले जातात. त्यामुळे पोलिसांत गुन्हा दाखल होईल, याची भिती कोणालाच राहिलेली दिसत नाही.

हेही वाचा: शहरातील प्रश्‍नांवर प्रणिती शिंदे व संजय शिंदे पुन्हा आमने-सामने !

तिसऱ्या लाटेचा धोका संपलेला नाही

कोरोनाची दुसरी लाट आटोक्‍यात आली, परंतु तिसऱ्या लाटेची शक्‍यता अजूनही संपलेली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सर्वसामान्यांसह राजकीय पक्षांनी गर्दीचे कार्यक्रम घेऊ नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्याचवेळी त्यांनी कोरोना वाढल्यास पुन्हा लॉकडाउन करावा लागेल, असा इशाराही दिला होता. मात्र, भाजपचे पदाधिकारी महाविकास आघाडी विरोधात तर कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह इतर पक्षांचे पदाधिकारी केंद्र सरकारविरोधात सातत्याने आंदोलने करीत आहेत. मागील दोन महिन्यांत जवळपास 30 पेक्षा अधिक गुन्हे पोलिसांत दाखल झाले आहेत. दरम्यान, आमदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलन केले. त्यामुळे त्यांच्यासह 15 जणांविरुध्द सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

loading image
go to top