मैत्रिणीकडे गेलेली तरुणी परतलीच नाही! वाचा सोलापुरातील गुन्हेगारी | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापुरातील गुन्हेगारी
मैत्रिणीकडे गेलेली तरुणी परतलीच नाही! वाचा सोलापुरातील गुन्हेगारी

मैत्रिणीकडे गेलेली तरुणी परतलीच नाही! वाचा सोलापुरातील गुन्हेगारी

सोलापूर : मैत्रिणीकडे जाते म्हणून घरातून बाहेर गेलेली 19 वर्षीय मुलगी पुन्हा घरी आलीच नाही. ही घटना 13 नोव्हेंबरला (शनिवारी) सायंकाळी पाच वाजता घडली. तिच्या आई-वडिलांनी मैत्रिणीसह नातेवाईक, ओळखीच्या व्यक्‍तींकडे विचारपूस केली. मात्र, तिचा पत्ता लागलाच नाही. शेवटी त्यांनी मुलगी बेपत्ता झाल्याने एमआयडीसी पोलिस ठाणे (MIDC Police Station, Solapur) गाठले.

विनायक नगरातील ही घटना असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार हे पुढील तपास करीत आहेत. मागील काही दिवसांत अल्पवयीन मुली, तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून त्यासंदर्भात पोलिस आयुक्‍तालयाकडून काहीच जनजागृती केली जात नसल्याचे बोलले जात आहे.

बाळाचे तोंड पाहणेही नव्हते नशिबात! अपघातात तरुणाचा मृत्यू

मित्राच्या अंत्यविधीला दुचाकीवरून जाताना ट्रिपल सीट निघालेल्या दुचाकीस्वाराने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात आसिफ कादीर बादशा माशाळे या विवाहित तरुणाचा मृतू झाला. विशेष म्हणजे मृत तरुणाची आयबीसाठी निवड झाली होती. त्याची पत्नी चार महिन्यांची गर्भवती असून, बाळाचे तोंड पाहण्यापूर्वीच त्याला काळाने हिरावून नेले.

आसिफ कादीर बादशा माशाळे (रा. रत्नमंजेरी सोसायटी, जुळे सोलापूर) हा तरुण अक्कलकोट येथील मित्राच्या अंत्यविधीसाठी निघाला होता. शुक्रवारी सिद्धेश्‍वर कारखाना ते कुंभारी दरम्यान रस्ता ओलांडताना मागून आलेल्या दुचाकीने धडक दिली. कादीर हा दुचाकीवर मागे बसला होता. गाडीने धडक दिल्यानंतर उडून खाली पडला. डोक्‍याला जबर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास वळसंग पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक स्वामीराव पाटील हे करीत आहेत. अपघातानंतर तो दुचाकीस्वार त्याची गाडी सोडून फरार झाला. त्याचा शोध घेतला जात असून त्याची दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.

हेही वाचा: जेव्हा मध्यरात्री बंद घरातून येतो चित्रविचित्र आवाज, तेव्हा..!

किरकोळ कारणावरून धमकी

येथील अण्णा मठाशेजारील उत्तर कसबा परिसरातील संतोष हरिभाऊ जाधव यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून स्टीलचा तांब्या फेकून मारला. तर दुसऱ्याने लहान मुलीला ढकलून देत आणखी मारा, अशी चिथावणी दिली. एकाने धुण्याच्या धोपटण्याने डोक्‍यात मारहाण केली. तुला एक पोरगं आहे, लय मस्ती आल्यासारखे करू नको, नाहीतर लय महागात पडेल, अशी धमकी दिली. ही घटना रविवारी (ता. 14) दुपारी बाराच्या सुमारास घडली. या प्रकरणी संतोष जाधव यांनी फौजदार चावडी पोलिसांत तिघांविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार अवधुत सुरवसे, मल्लिनाथ काबणे, शंतनू सुरवसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वे सोसायटीत घरफोडी

येथील भारती विद्यापीठाजवळील रेल्वे सोसायटीतील महेश बंडप्पा निला यांच्या घरातून चोरट्याने 64 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. दिवाळीच्या निमित्ताने महेश निला यांचे कुटुंबीय त्यांच्या मूळगावी लातूर जिल्ह्यातील साकोळ येथे गेले होते. त्यावेळी चोरट्याने डाव साधला. ही घटना 7 ते 13 नोव्हेंबर या काळात घडल्याची फिर्याद निला यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली. बंद घराचा कुलूप-कोयंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर चार हजारांची रोकड व 60 हजारांचे दागिने घेऊन चोरटा पसार झाला, असेही फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोलिस नाईक माडे हे करीत आहेत.

क्रिकेट सट्ट्यावर कारवाई; चार लाखांचा मुद्देमाल जप्त

टी-20 वर्ल्डकपच्या ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील अंतिम क्रिकेट सामन्यावरील सट्टाप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी चार लाख नऊ हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनल सामन्यावर जोडभावी पेठ परिसरात सट्टा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलिस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी त्या ठिकाणी छापा मारला. त्या ठिकाणाहून पोलिसांनी मोबाईल फोन, टिव्ही, दुचाकी व अन्य साहित्य, रोकड असा एकूण चार लाख नऊ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सचिन कमलापुरे व मुकुंद कमलापुरे (रा. साखर पेठ, सध्या घोंगडे वस्ती) या दोन भावांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी लोकांना मोबाईलद्वारे सट्टा खेळण्यास प्रवृत्त केले. त्यांनी स्वत:च्या आर्थिक लाभासाठी त्यांची फसवणूक केली, असे पोलिस फिर्यादीत नमूद आहे. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने ही कारवाई केली. या प्रकरणात सचिन अंबादास कमलापुरे, मुकुंद अंबादास कमलापुरे, दत्तात्रय पिट्टाप्पा बडगंची (रा. वैष्णवी नगर, जुने विडी घरकुल), चणप्पा सिद्धाप्पा पुराणिक (रा. न्यू पाच्छा पेठ, विजय नगर), श्रीनिवास मुरली चिंता (रा. पिट्टा नगर, जुने विडी घरकुल), सतीश श्रीनिवास मंगलपल्ली (रा. राघवेंद्र नगर, जुने विडी घरकुल) यांना अटक केली आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक शिंदे यांच्या नृेत्वाखाली अजय पाडवी, तात्यासाहेब पाटील, अजिंक्‍य माने, कुमार शेळके, गणेश शिंदे, राजकुमार पवार, अजय गुंड, निलोफर तांबोळी, संजय काकडे यांच्या पथकाने केली.

पोलिस कर्मचाऱ्याला नेले फरफटत

सोलापूर : जेलरोड पोलिस ठाण्याकडे चारचाकी घेऊन न जाता कॉंग्रेस भवनमार्गे रंगभवनकडे गाडी घेऊन जात असताना पोलिस नाईक नागेशसिंग चव्हाण यांनी संशयित आरोपी सोहेल कुरेशी याला गाडीतून खाली उतर, मी गाडी चालवतो म्हणाले. त्यावेळी कुरेशी याने दरवाजा लॉक करून चव्हाण यांना रंगभवन चौकापर्यंत फरफटत नेले. त्यात चव्हाण हे जखमी झाले असून सोहेल कुरेशी हा गाडी घेऊन पसार झाला. त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

घटनेची हकीकत अशी की, सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास जामिया मस्जिदच्या बाजूला बोळात एक संशयित चारचाकी (एमएच 14, ईएच 1828) पोलिसांना दिसला. तेथे एकजण थांबला होता. त्यावेळी वाहनात बसलेल्यांची नावे विचारली. पोलिसांचे मनुष्यबळ कमी असल्याने जावेद बागवान, मोहसीन जहागीरदार हे दोघे पळून गेले. ड्रायव्हर सीटवर संशयित आरोपी व मागील सीटवर एकजण बसला होता. फिर्यादी नागेशसिंग चव्हाण हे ड्रायव्हरच्या बाजूला बसले. त्या वाहनासोबत पोलिसांची गाडीही होती. त्यांना जेलरोड पोलिस ठाण्याला घेऊन जाताना संशयित आरोपीने त्याच्याकडील वाहन कॉंग्रेस भवनच्या दिशेने घेतले. त्यावेळी पोलिस नाईक चव्हाण हे गाडी थांबवून खाली उतरले आणि मी स्वत: गाडी चालवतो म्हणाले. चारचाकीतील ड्रायव्हर खाली उतरला नाही. त्याने गाडीचा दरवाजा लॉक केला आणि गाडी मागे घेऊ लागला. त्यावेळी चव्हाण यांनी गाडीच्या टपाच्या अँगलला पकडले. तरीही, त्याने गाडी न थांबविता पोलिस नाईक चव्हाण यांना रंगभवनच्या दिशेने फरफटत नेले. रंगभवन चौकातील कॉर्नरला त्यांनी गाडीचा हात सोडला आणि त्यावेळी ते खाली पडले. त्यांच्या डाव्या हाताच्या कोपराला, दोन्ही पायाच्या गुडघ्याला मार लागला असून ते जखमी झाले. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कुरेशीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शशिकांत लोंढे हे करीत आहेत.

हेही वाचा: सोशल मीडियावर चुकीचे काही टाकू नका! सोलापुरातील युवक जेरबंद

वर्ल्डकपच्या फायनल सामन्यावर सट्टा; साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

टी-20 वर्ल्डकप क्रिकेटच्या अंतिम सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या रुमान सादिक शेख (रा. पाचकंदिलजवळ, मोदी खाना), संदिप ज्ञानेश्‍वर अंकुश (रा. स्पर्श हॉस्पिटलजवळ, वसंत विहार) यांच्याविरुध्द सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल 11 लाख 65 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शहरातील मोदी खाना परिसरातील पाचकंदिल परिसरात ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यावर सट्टा खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संशयित आरोपी रुमान शेख हा टीव्हीवर मॅच पाहत होता. कोणत्या संघाच्या किती धावा होतील, शेवटी कोण सामना जिंकेल यावर मोबाईलवरुन तो सट्टा घेत होता. त्याचा हिशोब कागदावर लिहून घेत होता. पोलिसांची चाहुल लागताच तो तिथून पळून गेला. रामलाल चौकातील अंकुश टायर्स दुकान परिसरात संदीप अंकुश हा पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनात (एमएच 13, सीएक्‍स 5151) बसून मोबाईलवर मॅच पाहत होता. तोही इतरांकडून फोनवरून सट्टा घेत असल्याचे पोलिसांना आढळले. त्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक धायतोंडे हे करीत आहेत. पहिल्या कारवाईत पोलिसांनी एलईटी टीव्ही, सेटटॉप बॉक्‍स, तीन मोबाईल, असा एकूण 48 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी दोन हजार 300 रुपयांची रोकड, मोबाईल व चारचाकी वाहन जप्त केले आहे.

loading image
go to top