esakal | सर्वच कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क गायब ! कॉल ड्रॉपमुळे ग्राहक हैराण
sakal

बोलून बातमी शोधा

Mobile Network

सर्वच कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क गायब ! कॉल ड्रॉपमुळे ग्राहक हैराण

sakal_logo
By
विजय थोरात

मागील काही दिवसांपासून शहर परिसरात विविध कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क नेहमी अचानक कट होत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत.

सोलापूर : मागील काही दिवसांपासून शहर परिसरात विविध कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क (Mobile Network) नेहमी अचानक कट होत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. फोनवर बोलताना अचानक संभाषण ऐकू न येणे (कॉल ड्रॉप), नेटवर्क नसणे, असे प्रकार वाढत आहेत. सर्वसामान्यांना महिन्याकाठी भरमसाठ पैसे मोजून देखील योग्य सेवा मिळत नाही. संपर्क साधताना त्रास सहन करावा लागत आहे. काही भागात तर हा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार नेटवर्क व कॉल ड्रॉपमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. (Customers have been harassed as all companies' mobile networks are disappearing)

हेही वाचा: खरीप हंगामाच्या पीक विम्याची मुदत 15 जुलैपर्यंत !

पूर्वी काही विशिष्ट कंपन्यांपुरती मर्यादित ही समस्या आता मात्र सर्वच कंपन्यांमध्ये दिसून येत आहे. मोबाईल ग्राहकांना अनेक महिन्यांपासून कॉल ड्रॉपच्या समस्येचा सामना करावा लागत आहेत. एखाद्याशी फोनवर चर्चा करीत असताना विनाकारण आणि अचानक फोन बंद होतो. हा अनेकांचा अनुभव आहे. महत्त्वाचा फोन मध्येच कट होऊ नये, म्हणून नेटवर्क असलेल्या ठिकाणी जाण्याकरिता अनेकांची धावपळ होत आहे. मात्र, याचाही फारसा उपयोग होत नसल्याचे ग्राहकांनी सांगितले. कंपन्यांच्या इन्कमिंग आउटगोईंग, लोकल, एसटीडी या सर्वच सेवांवर ग्राहकांनी कॉल ड्रॉपचा अनुभव घेतला आहे.

दिवसा नेटवर्क नसल्याने रात्री काम

कोरोनामुळे अनेक कंपन्यांनी ऑफिस सुरू केले नाही. त्यामुळे पुणे, मुंबईसह स्थानिक कंपनीत वर्क फ्रॉम होम काम करणाऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. घरूनच ऑनलाइन काम करताना नेटवर्क जाण्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. ऑफिसच्या वेळात नेटवर्क समस्या झाल्यास मन:स्ताप सहन करावा लागतो. बराच वेळा वेळ वाया जातो आणि बसून राहावे लागते. दिवसा नेटवर्क समस्या असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. यामुळे आरोग्य व कामावर याचा परिणाम होत असल्याच्या तक्रारी देखील ग्राहकांनी केल्या आहेत.

हेही वाचा: 'सेतू'चा बाजार! पीडीएफची पुस्तक स्वरूपात विक्री; पालकांना भुर्दंड

ऑनलाइन शिक्षणाचा फज्जा

दोन वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्र ऑनलाइन सुरू झाले आहे. सध्यातरी दोन ते तीन तास शाळांचे वर्ग सुरू होत आहेत. ऑनलाइन वर्गात पूर्वीच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी आहे. त्यात वारंवार नेटवर्क गायब होत असल्याची प्रमुख अडचण ठरत आहे. ऑनलाइन क्‍लास सुरू असताना अचानक नेटवर्क गायब होत आहे. त्यामुळे शिक्षकांची शिकविण्याची लिंक तुटते तर मुलांचे लक्ष विचलित होते आणि त्या शिक्षकांना वारंवार एकच गोष्ट वारंवार सांगावी लागते. यात बराच वेळ वाया जात असल्याचे शिक्षकांनी सांगितले. विद्यार्थ्यांनाही क्‍लास जॉईन करण्यात अडचणी येत असून ऑनलाइन शिक्षणाचा फज्जा उडाला आहे.

सध्या कोरोनाच्या (Covid-19) काळात विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन ऑनलाइन शिक्षण सुरू आहे पण नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे अनेक अडचणींना सामोरे जात लेक्‍चर करावे लागतात. कधी वातावरणामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे लेक्‍चर वेळी लेफ्ट होऊन पुन्हा जॉईन होण्यास अडचण येते. त्यामुळे बऱ्यापैकी लेक्‍चरमध्ये जे शिकवले जाते ते सविस्तर समजून घेण्यास अडचणी येतात. शंकेचे हवे तसे निरसन होत नाही. प्रत्यक्ष ऑफलाइन ज्ञानार्जनाची कमतरता ऑनलाइन लेक्‍चर वेळी नेहमीच भासते. त्यामुळे लवकरात लवकर ऑफलाइन शाळा, महाविद्यालयात कोरोनाचे नियम पाळून वर्ग चालू होतील अशी आशा आहे.

- रसिका शिंदे, विद्यार्थिनी

हेही वाचा: "जि. प. कर्मचाऱ्याचे 21 लाखांचे वैद्यकीय बिल दोन आठवड्यांत द्या!'

ऑनलाइन शिक्षण घेण्यास खूप तांत्रिक अडचणी येत आहेत. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना जे काही शिकविले जाते ते सर्व ऑनलाइन असल्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजत नाही व नेटवर्कमध्ये सतत बिघाड आल्यावर अर्धवट माहिती मिळते. निदान आठवी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ग सुरू करावेत. ऑनलाइन शिक्षणात केवळ वेळ वाया जात आहे. शैक्षणिक संस्थांना ऑफलाइन वर्ग सुरू करण्याची परवानगी द्यावी.

- कुंजल मचाले, विद्यार्थिनी

ऑनलाइन शिक्षणामुळे ज्यांच्याजवळ स्मार्टफोन नाही ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहात आहेत. परंतु त्यासोबत ज्यांच्याकडे मोबाईल आहे परंतु ऑनलाइन वर्गास उपस्थित राहताना नेटवर्कची समस्या उद्‌भवत आहे. त्यामुळे देखील विद्यार्थी अभ्यासक्रमापासून वचिंत राहात आहेत.

- सुमीत शिवशरण, विद्यार्थी

कोरोनामुळे सध्या ऑनलाइन क्‍लासेस सुरू आहेत. बऱ्याच इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांना नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा आम्ही काय शिकवितो हे विद्यार्थ्यांना नेटवर्क प्रॉब्लेममुळे ऐकू येत नाही. तर बऱ्याच वेळा ऐकू येत असते पण स्क्रीनवर दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मधूनच ऐकू न आल्यामुळे विषयाचे आकलन नीट होत नाही. तसेच विद्यार्थ्यांना स्क्रीन टाईम वाढल्यामुळे डोळ्यांचे आजार वाढत आहेत.

- सुनील कामतकर, संचालक, कामतकर क्‍लासेस, सोलापूर

मागील पंधरा दिवसांपासून आयडिया, एअरटेल, जिओ या कंपन्यांचा नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे. त्यामुळे ऑनलाइन मीटिंग, शैक्षणिक क्‍लास आणि कॉल ड्रॉप होत आहेत. त्यामुळे सध्या कोरोनामुळे सर्व कामे ऑनलाइन होऊ लागल्याने यामध्ये नेटवर्कची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

- अर्जुन सोनवणे, ग्राहक

सध्या मागील पंधरा दिवसांपासून सर्वच कंपन्यांचे नेटवर्क प्रॉब्लेम बरोबरच टेक्‍निकल प्रॉब्लेम देखील आहेत. त्यामुळे ग्राहकांची संख्या देखील आयडिया कंपनीतून कमी होत आहे. सिग्नल मिळत नसल्याने देखील दिवसेंदिवस यामध्ये वाढत होत आहे.

- श्रीनिवास कुला, आयडिया रिटेलर, सोलापूर

loading image