esakal | सेतू अभ्यासक्रमाचा बाजार ! पीडीएफची पुस्तक स्वरूपात विक्री, पालकांना भुर्दंड
sakal

बोलून बातमी शोधा

Bridge Course

'सेतू'चा बाजार! पीडीएफची पुस्तक स्वरूपात विक्री; पालकांना भुर्दंड

sakal_logo
By
अशोक पवार

इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या जुन्या अभ्यासक्रमाची उजळणी होण्यासाठी एससीईआरटीकडून सेतू अभ्यासक्रमाची (ब्रीज कोर्स) सुरवात 1 जुलैपासून झाली आहे.

वेळापूर (सोलापूर) : इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या जुन्या अभ्यासक्रमाची उजळणी होण्यासाठी एससीईआरटीकडून (SCERT) सेतू अभ्यासक्रमाची (Setu course) सुरवात 1 जुलैपासून झाली आहे. एससीईआरटीने तयार केलेल्या ब्रीज कोर्सच्या विनामूल्य पीडीएफ फाइलची नोट व पुस्तक स्वरूपात मनमानी किमतीवर सर्रास विक्री होत असल्याने पालकांना नाहक भुर्दंड बसून सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना "सेतू' ओलांडणे अवघड बनले आहे. एक प्रकारे मोफत सेतू अभ्यासक्रमाचा बाजार मांडल्याचे दृश्‍य आहे. (The PDF of Setu syllabus in book form is being sold at a rising rate)

हेही वाचा: "जि. प. कर्मचाऱ्याचे 21 लाखांचे वैद्यकीय बिल दोन आठवड्यांत द्या!'

सेतू अभ्यासक्रम हा जरी सर्व विद्यार्थ्यांसाठी असला, तरी जे विद्यार्थी तांत्रिक साधनसुविधेच्या अभावामुळे ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात नव्हते, त्या विद्यार्थ्यांसाठी तो उपयुक्त ठरेल या उद्देशाने तयार केला आहे. पण सॉफ्ट कॉपीत हा अभ्यास असल्यामुळे ऑनलाइन शिक्षणाची साधने नसणाऱ्या मुलांसाठी अंमलबजावणीच्या दृष्टीने शाळा, शिक्षक व पालक यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या मुलांकडे ऑनलाइन शिक्षणाची साधने नाहीत, त्यांच्यासाठी सेतू अभ्यासक्रम पूर्ण करणे अडचणीचा ठरत आहे. एससीईआरटीच्या लिंकवर प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमाचे पीडीएफ स्वरूपात पुस्तिका आहे. या विषयांच्या झेरॉक्‍सचा खर्च पालक व शाळा अशा दोघांनाही परवडणारा नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: जन्म-मृत्यूचा दाखला मिळेना! जीवन विमा अन्‌ मुलांचा खोळंबला प्रवेश

झेरॉक्‍सवाल्यांची दुकानदारी

या परिस्थितीचा फायदा उठविण्यासाठी सेतू अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचे संच प्रिंट स्वरूपात काढण्यासाठी अनेकांची दुकानदारी सुरू झाली आहे. यासाठी सोलापूर, पंढरपूर, अकलूजमधील काही दुकानदारांनी त्यांची दरपत्रके दुकानांसमोर व सोशल मीडियावर (Social Media) वायरल केली आहेत. सर्वसाधारण दर रुपयांमध्ये पुढीलप्रमाणे : दुसरी 80, तिसरी 77, चौथी 102, पाचवी 80, सहावी 137, सातवी 115, आठवी 130. ही दरपत्रके जाणीवपूर्वक व्हॉट्‌सऍप ग्रुपवर प्रसारित करून मोफत योजनेचे व्यावसायीकरण सुरू आहे.

हेही वाचा: माढा स्टेट बँक ऑफ इंडियाचा कारभार तीनच कर्मचाऱ्यांवर

शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

चालू वर्षी नवीन पाठ्यपुस्तकांची छपाई न झाल्याने शिक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांची गतवर्षीची पाठ्यपुस्तके जमा करून मागील इयत्तेतून आलेल्या विद्यार्थ्यांना वाटप केली आहेत. सेतू अभ्यासक्रम राबविताना पुन्हा तीच पुस्तके जुन्या विद्यार्थ्यांना परत देण्याचे आदेश दिले गेले. त्यामुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

अभ्यासक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उजळणीसाठी आहे. विद्यार्थ्यांनी पीडीएफच्या स्वरूपातील लिंक वापरून जुन्या इयत्तेच्या शैक्षणिक अभ्यासाची उजळणी करावी. नोट्‌स, पुस्तक संच तयार करून अभ्यासक्रमाचे कोणीही व्यावसायीकरण करू नये.

- दिनकर टेमकर, संचालक, एससीईआरटी, पुणे

पीडीएफ स्वरूपातील अभ्यासक्रमामुळे ऑनलाइनची साधने नसणाऱ्या विद्यार्थ्यांची गोची होणार आहे. मोफत पाठ्यपुस्तके व स्वाध्याय पुस्तिका अजून वितरित व्हायच्या आहेत. स्वाध्याय पुस्तिकांची छपाई बाकी असेल तर त्यात सेतू अभ्यासक्रम छपाईचा जरूर विचार व्हावा.

- मच्छिंद्रनाथ मोरे, अध्यक्ष, सोलापूर जिल्हा शिक्षक संघ

शैक्षणिक उजळणीसाठी सेतू उपक्रमाचे नियोजन आहे. शिक्षकांना ऑनलाइन कार्यशाळेतून मार्गदर्शनही केले आहे. ऑनलाइन सुविधा नसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाचे नियम पाळून ऑफलाइन मार्गदर्शन करता येऊ शकते. विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या स्वाध्यायाच्या हार्ड कॉपीची प्रशासनाकडून मागणी नाही.

- डॉ. रामचंद्र कोरडे, प्राचार्य, डाएट, वेळापूर

loading image