esakal | अरे देवा...शेती करणे म्हणजे "लाखाचे बारा हजार'
sakal

बोलून बातमी शोधा

Grape damage

धरणामध्ये सध्यातरी चांगला पाणीसाठा आहे. नदी, नाले, विहिरी यातही बऱ्यापैकी पाणी आहे. त्यामुळे या वर्षी उत्पन्न चांगले मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे पिकांवर कीड पडून पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. नंतर पिके काढणीस आली असताना अवकाळी पावसाने अचानकपणे दणका दिल्याने पिके काळी पडली.

अरे देवा...शेती करणे म्हणजे "लाखाचे बारा हजार'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

केत्तूर (सोलापूर) ः वारंवार बदलणारे हवामान, उत्पादनात होणारी घट, मजुरीचे वाढलेले दर, खते व औषधे आदींचे वाढलेले दर व वीजटंचाई यामुळे सध्या शेती करणे म्हणजे "लाखाचे बारा हजार' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा - खबरदार...! नाल्यात कचरा टाकाल तर....

वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे नुकसान
वारंवार बदलणारे हवामान व रोगट हवामानामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सततच्या दुष्काळाशी सामना करीत असताना या वर्षी परतीचा चांगला पाऊस झाला. धरणामध्ये सध्यातरी चांगला पाणीसाठा आहे. नदी, नाले, विहिरी यातही बऱ्यापैकी पाणी आहे. त्यामुळे या वर्षी उत्पन्न चांगले मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे पिकांवर कीड पडून पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. नंतर पिके काढणीस आली असताना अवकाळी पावसाने अचानकपणे दणका दिल्याने पिके काळी पडली. हाती आलेल्या पिकांना चांगला दर मिळणे अवघड झाले. त्यातच शेतीसाठी पुरुष मजुरांना 500 रुपये तर महिला मजुरांना 300 रुपये मजुरी द्यावी लागत आहे. अनेक वेळी गावात शेतमजूर मिळत नसल्याने इतर गावांवरून गाडी करून मजूर आणावे लागत आहेत. त्याचा वाहतूक खर्चही शेतकऱ्यांना करावा लागत आहे. ज्यावेळी शेतीसाठी पावसाची गरज आहे, त्यावेळी पाऊस पडत नाही, तर गरज नसताना पाऊस पडत असल्याने उभ्या शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. या वर्षी वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे पिकांची वाढच झाली नाही. त्यामुळे पिकांवर रोगही पसरले, त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही.

रोगामुळे पिके काळी
रोगामुळे पिके काळी पडली. झालेले उत्पादन कमी, डाग पडलेले, कमी प्रतीचे झाल्याने बाजारभाव उतरले आहेत. सध्या नवीन ज्वारी बाजारात येऊ लागताच ज्वारीचे दरही निम्म्याने खाली उतरले आहेत. तीन हजार 600 रुपये क्विंटल विकली जाणारी ज्वारी सध्या एक हजार 800 रुपयांवर आली आहे. एकूणच, या वर्षी लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचे काम निसर्गानेच केल्याने शेती म्हणजे लाखाचे बारा हजार अशीच परिस्थिती झाल्याचे चित्र आहे.

loading image