सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय! नदीतील पाणी उपसा करणाऱ्यांवर दाखल होणार गुन्हे; नदीकाठचा वीजपुरवठा बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सोलापूरसाठी पिण्याकरिता येत्या दोन-चार दिवसांत उजनी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. भीमा नदीकाठचा वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यावेळी पाणी उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून मोटारी जप्त करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला.
solapur collecor kumar ashirwad
solapur collecor kumar ashirwadsakal

सोलापूर : उजनी धरणासह इतर साठ्यातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून सोलापूर शहरासाठी पिण्याकरिता येत्या दोन-चार दिवसांत उजनी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. या काळात भीमा नदीकाठचा वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यावेळी पाणी उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून विद्युत मोटारी जप्त करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.

सध्या औज बंधाऱ्यात दोन मीटर पाणी असून उद्या (मंगळवारी) औजमधील पाणी चिंचपूर बंधाऱ्यात घेतले जाणार आहे. त्यावेळी औजमधील पाणीपातळी विचारात घेऊन उजनीतून सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडण्यात येणार आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. सध्या उजनी धरणात वजा साडेसतरा टक्के तर सात मध्यम प्रकल्पात ९.७२ टक्के, ५६ लघु प्रकल्पात ३.४१ टक्के तर ९० कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यात ९.३ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे हे सर्व पाणीसाठे आता पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. या पत्रकार परिषदेस महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवार आदी उपस्थित होते.

टंचाईचा ७४ कोटींचा आराखडा तयार

संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुमारे ७४ कोटी ३५ लाखांचा आराखडा तयार केला आहे. यात विंधन विहिरी व नळ योजनांची दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना, टँकरने पाणीपुरवठा, खासगी विहिरींचे अधिग्रहण, विहिरीतील गाळ काढणे आदी कामांचा समावेश आहे. उपसासिंचन योजनांची वीजबिले देण्यासाठी दोन कोटी, प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनांची थकीत वीजबिले देण्यासाठी १० कोटी ६१ लाख व टंचाई कालावधीतील बिलासाठी ६ कोटी ११ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

चारा वाहतुकीस जिल्हाबंदी

सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील ४० तालुक्यात व १०२१ महसुली मंडळात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा, सांगोला, माळशिरस, मोहोळ तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. उर्वरित तालुक्यातही चारा टंचाई होण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्ह्यातील चारा इतर जिल्ह्यात तसेच परराज्यामध्ये विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन चारा निर्मिती करण्यासाठीही शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे. चारा निर्मितीसाठी पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना साडेतीन कोटींचे बियाणे मोफत वाटप करण्यात आले आहे. त्यातून शेतकऱ्यांनी चारा तयार केला आहे. तसेच मूरघाससाठी दोन कोटींचे अनुदानही देण्यात येणार आहे.

पुणे, नगर, कर्नाटकचाही वीज पुरवठा खंडित

उजनी धरणातील पाणी उपसा रोखण्यासाठी पुणे व अहमदनगर जिल्ह्यात ही वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याबरोबरच औज बंधाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला भीमा नदी काठावर असलेल्या कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांचाही वीज पुरवठा बंद करण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

ठळक बाबी

  • जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी ५८ ठिकाणी तपासणी नाके

  • नाक्यांवरील हालचालींवर सीसीटीव्हीद्वारे थेट जिल्हाधिकारी कार्यालयातून नियंत्रण

  • निवडणुकीच्या कामाबरोबरच चारा वाहतुकीवरही ठेवणार नजर

  • चारा वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र एक कर्मचारी नियुक्त

-------------------------------------------------------------

आकडे बोलतात....

  • जिल्ह्यातील १२ लाख ४१ हजार ५८ पशुधनास असून ३ जूनपर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध

  • संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जुलै २०२४ पर्यंत चाराबंदीचे आदेश

  • नगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्यासाठी दोन कोटींचा आराखडा

  • चार तालुक्यातील सहा गावांमध्ये सध्या टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

  • बार्शी तालुक्यात एका विंधन विहिरीचे अधिग्रहण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com