esakal | सगळे पक्ष हिंडून आलेल्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये! दीपक पवारांचा काळेंवर निशाणा
sakal

बोलून बातमी शोधा

सगळे पक्ष हिंडून आलेल्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये! दीपक पवारांचा काळेंवर निशाणा

काळे राष्ट्रवादीत आल्यापासूनच पंढरपुरातील राष्ट्रवादीला घरघर लागली आहे, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष दीपक पवार यांनी लगावला.

'सगळे पक्ष हिंडून आलेल्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये!'

sakal_logo
By
भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : सगळ्या पक्षात हिंडून आलेल्या कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांनी आम्हाला पक्षनिष्ठा काय असते हे शिकवू नये. काळे राष्ट्रवादीत (NCP) आल्यापासूनच पंढरपुरातील (Pandharpur) राष्ट्रवादीला घरघर लागली आहे, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष दीपक पवार (Deepak Pawar) यांनी लगावला. राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांनी रविवारी (ता. 12) कासेगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी मेळाव्यात, पक्षात राहून पक्षाचेच पदाधिकारी आमची मापं काढतात, अशी तक्रार वरिष्ठ नेत्यांसमोर केली होती. त्यावर आज (सोमवारी) दीपक पवार यांनी कल्याणराव काळे यांच्या तक्रारीचा चांगलाच समाचार घेत निशाणा साधला. तुमच्या कारखान्याकडे थकीत असलेली उसाची बिलं द्या, तुमच्यावर कोणीही नजर ठेवणार नाही की कोणी तुमची मापं काढणार नाही, असे सांगत, तुमच्या पायगुणामुळेच राष्ट्रवादी पक्षात गटतट पडल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चांगलाच कलगीतुरा (Political Drama) रंगू लागला आहे.

हेही वाचा: राष्ट्रवादीत झालेत कार्यकर्त्यांपेक्षा नेतेच उदंड! काळेंचा घरचा आहेर

यावेळी पवार म्हणाले, आमचे नेते शरद पवारांच्या विचारावर चालणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आहे. पक्षाच्या विचारांशी आम्ही आजही बांधील आहोत. परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी सगळ्या पक्षात फिरून आलेल्या काळेंनी आम्हाला पक्षनिष्ठा आणि तत्त्वे शिकवण्याची गरज नाही. भालके- काळे या दोन्ही नेत्यांच्या साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची ऊसबिले थकली आहेत. थकीत उसाची बिले मिळावीत म्हणून शेतकरी हेलपाटे मारून थकले आहेत. शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे हे नेते पक्ष कार्यकर्त्यांना काय उपदेश करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा: कासेगावातील राष्ट्रवादी मेळाव्यात कोरोना नियमांचा फज्जा!

ज्या संस्था शेतकऱ्यांच्या मालकीच्या आहेत, त्याच संस्थांवर आम्ही बोलणार. तुम्हाला विरोधकांच्या कारखान्यांची बरोबरी करायची असेल तर त्यांच्या बरोबरीने ऊसदर द्या. चंद्रभागा कारखान्याने 25 तर विठ्ठल कारखान्याने शेतकऱ्यांचे 30 कोटी रुपये थकवले आहेत. त्यामुळे भालके- काळे या दोन्ही नेत्यांवर शेतकऱ्यांची नजर आहे. तुम्हाला कारभारी व्हायचं असेल तर तुम्ही ज्या संस्थांचा कारभार करत आहात, त्या संस्थांचे किती वाटोळे केले हे तालुक्‍यातील जनतेला माहिती आहे. तुम्ही पक्षात आयात झाल्यापासूनच स्वयंपाक बिघडल्याचेही पवार यांनी सांगितले. विठ्ठल आणि चंद्रभागा साखर कारखान्याच्या सभासदांची तुम्ही फसवणूक केली आहे. याचाही शेतकरी आता तुम्हाला जाब विचारतील, असेही पवार यांनी या वेळी सांगितले.

loading image
go to top