esakal | पाच वर्षांत 300 कोटींचा चुराडा ! तरीही नागरिकांचा पायाभूत सुविधांसाठीच संघर्ष
sakal

बोलून बातमी शोधा

पाच वर्षांत 300 कोटींचा चुराडा! तरीही पायाभूत सुविधांसाठीच संघर्ष

एवढा मोठा खर्च होऊनही बहुतेक प्रभागांमधील नागरिक पायाभूत सुविधांसाठीच संघर्ष करीत असल्याची वस्तुस्थिती आहे.

पाच वर्षांत 300 कोटींचा चुराडा! तरीही पायाभूत सुविधांसाठीच संघर्ष

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पायाभूत सुविधा मिळाव्यात, 26 प्रभागांमधील रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न तत्काळ सुटावा, त्यांची देखभाल-दुरुस्ती वेळेत होण्यासाठी पाच वर्षांत महापालिकेने (Solapur Municipal Corporation) अंदाजित 300 कोटींचा खर्च केला. त्यामध्ये नगरसेवकांचा वॉर्डवाईज निधी, भांडवली निधी आणि प्रशासनाचा देखभाल-दुरुस्तीवरील खर्चाचा समावेश आहे. एवढा मोठा खर्च होऊनही बहुतेक प्रभागांमधील नागरिक पायाभूत सुविधांसाठीच संघर्ष करीत असल्याची वस्तुस्थिती आहे.

हेही वाचा: तुमच्या प्रभागात कोरोनाचे किती रुग्ण? जाणून घ्या अपडेट

शहराचा विस्तार वाढला, लोकसंख्याही साडेबारा लाखांवर गेली, परंतु, महापालिकेच्या उत्पन्नात काहीच फरक पडला नाही. बजेटनुसार अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने भांडवली कामांच्या पैशाचा बोजा महापालिकेला फेडणे मुश्‍कील होऊ लागले आहे. सद्य:स्थितीत मक्‍तेदारांचे जवळपास 62 कोटींचे देणे आहे. प्रभागांमधील समस्या सोडविण्यासाठी दरवर्षी नगरसेवकांना प्रत्येकी सहा लाखांचा वॉर्ड निधी दिला जातो. तर भांडवली निधी देण्याचाही निर्णय झाला. त्यातून नवीन कामे केली जातात. कामांची देखभाल-दुरुस्ती होऊन नागरिकांचे प्रश्‍न सुटावेत म्हणून प्रशासनाकडून दरवर्षी अंदाजित 40 ते 45 कोटींचा खर्च केला जातो. त्यात नालेसफाई, पावसाळ्यापूर्वीच्या उपाययोजना, दिवाबत्ती, आरोग्य, महापालिकेच्या इमारती, शॉपिंग सेंटर दुरुस्तीसह आठ झोनअंतर्गत येणाऱ्या समस्यांचा समावेश असतो.

हेही वाचा: कासेगावातील राष्ट्रवादी मेळाव्यात कोरोना नियमांचा फज्जा!

नागरिकांच्या करातून त्यांना चांगल्या सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून अपेक्षित आहे. मात्र, पाच वर्षांत तब्बल 300 कोटींपर्यंत खर्च करूनही शहरात सध्या एकही प्रभाग असा नाही, ज्या ठिकाणी नागरिकांना संपूर्ण पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे ही रक्कम 100 टक्‍के विकासकामांवरच खर्च झाली का, देखभाल-दुरुस्तीवर एवढा मोठा खर्च करूनही रस्त्यांवरील खड्डे, पाणी गळती, आरोग्याच्या समस्या दूर झाली का, असे प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. त्यावर उपाय म्हणून महापालिका आयुक्‍तांनी आता बनावटगिरीला आळा घालण्यासाठी "जीआयएस' प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील पाच वर्षांची स्थिती...

  • गावठाणमधील नगरसेवक : 40

  • "हद्दवाढ'मधील नगरसेवक : 62

  • स्वीकृत नगरसेवक : 5

  • नगरसेवकांचा वॉर्डवाईज निधी : 32.10 कोटी

  • खर्च झालेला अंदाजित भांडवली निधी : 63.30 कोटी

  • देखभाल-दुरुस्तीवरील प्रशासनाचा खर्च : 190 कोटी

कामांचा सपाटा, पण गुणवत्तेकडे नाही लक्ष

महापालिकेच्या बजेटनुसार हद्दवाढ भागातील नगरसेवकांना दरवर्षी प्रत्येकी 35 लाख तर गावठाणमधील नगरसेवकांना प्रत्येकी 25 लाखांचा भांडवली निधी देण्याचा निर्णय झाला. पदाधिकाऱ्यांना मात्र, वाढीव निधी दिला जातो. महापौरांना एक कोटी 85 लाखांचा तर सभागृह नेत्यांना एक कोटी 35 लाखांचा आणि विरोधी पक्षनेत्यांना सव्वा कोटीचा, उपमहापौरांना 85 लाखांचा भांडवली निधी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. सर्व गटनेत्यांना 50 लाखांचा भांडवली निधी दिल्याचेही सांगण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आता शहरात भांडवली कामांचा (विशेषत: रस्ते अन्‌ ड्रेनेज) सपाटा सुरू असून बहुतेक ठिकाणी कामाच्या गुणवत्तेकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याचे बोलले जात आहे.

दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करूनही पुन्हा त्याच ठिकाणी नव्याने काम होत असल्याच्या तक्रारी येतात. या पार्श्‍वभूमीवर कोणत्याही कामासाठी "जीआयएस' प्रणाली विकसित केली जात आहे. "जीआयएस' नकाशावर कामाची पूर्वीची स्थिती, कामाची मुदत, देखभाल-दुरुस्तीचा काळ, या सर्व बाबींची नोंद येईल. त्यातून बनावटगिरी थांबेल, असा विश्‍वास आहे.

- पी. शिवशंकर, महापालिका आयुक्‍त, सोलापूर

loading image
go to top