चंद्रभागा परिसर फुलू लागला! प्रशासनाने पुरवल्या सोयीसुविधा | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रभागा परिसरात होतेय भाविकांची गर्दी! प्रशासनाने पुरवल्या सोयीसुविधा
चंद्रभागा परिसर फुलू लागला! प्रशासनाने पुरवल्या सोयीसुविधा

चंद्रभागा परिसर फुलू लागला! प्रशासनाने पुरवल्या सोयीसुविधा

sakal_logo
By
राजकुमार घाडगे : सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : कार्तिकी यात्रेसाठी (Kartiki Yatra) चंद्रभागा नदी (Chandrabhaga River) पैलतीरावरील 65 एकर परिसरामध्ये भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. जिल्हा प्रशासनाने 65 एकरातील 465 प्लॉटच्या माध्यमातून यात्रेसाठी येणाऱ्या दिंडीतील भाविकांच्या निवासाची सोय केली आहे. या परिसरामध्ये शुक्रवारी (ता. 12) सुमारे 110 प्लॉटमध्ये दिंडीतील भाविकांनी आपल्या राहुट्या व तंबू उभारले आहेत. त्यामुळे 65 एकर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.

हेही वाचा: तरच होईल पंतप्रधानांच्या अपेक्षेप्रमाणे स्वच्छ पंढरपूर तीर्थक्षेत्र!

जिल्हा प्रशासनाच्या वतीने 65 एकर परिसरामध्ये यात्रेला आलेल्या भाविकांसाठी विविध सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. 65 एकरामध्ये निवासासाठी आलेल्या भाविकांसाठी 1200 कायमस्वरूपी स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षांपासून कोणतीही यात्रा न भरल्याने 65 एकर परिसरात काटेरी झुडपांची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. महसूल व नगरपालिका प्रशासनाने काटेरी झुडपे तोडून सर्व परिसर स्वच्छ केला आहे. येथे निवासासाठी असणाऱ्या भाविकांसाठी 24 तास पिण्याचे पाणी व वीजपुरवठा पुरविला जात आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता यंदा प्रथमच प्रत्येक प्लॉटमध्ये तीनशे भाविकांऐवजी फक्त पन्नास भाविकांना राहण्याची अट घालण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी व प्रशासनातील सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी 65 एकरामध्ये एक आपत्कालीन मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, चंद्रभागा नदी परिसरातील अस्वच्छतेबाबत 'सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत पंढरपूर नगरपालिकेने शुक्रवारी सुमारे शंभर सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चंद्रभागा नदीच्या वाळवंटाची साफसफाई केली आहे. वाळवंटातील गोळा केलेला कचरा दोन जेसीबी, टिपर व ट्रॅक्‍टरच्या माध्यमातून उचलून नेण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रभागा नदी परिसर स्वच्छ झाला आहे. पालिकेच्या अतिक्रमण पथकाने वाळवंटात अतिक्रमण करून उभारण्यात आलेले स्टॉल हटवले आहेत. काही परगावच्या विक्रेत्यांनी भाविकांच्या ये-जा करणाऱ्या वाटेवरच आपले विक्री साहित्य मांडले होते. त्या सर्व विक्रेत्यांना वाळवंटात आपले दुकान थाटण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे वाळवंटात भाविकांना मोकळेपणाने फिरता येत आहे. यात्रेला आलेल्या महिला भाविकांसाठी वाळवंटामध्ये तीन ठिकाणी चेंजिंग रूमची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हेही वाचा: अखेर 'भीमा' रेड झोनच्या बाहेर; गाळप परवाना मिळाला - अध्यक्ष महाडिक

यंदा 15 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी असून एकादशीच्या दिवशी चंद्रभागा नदीपात्रामध्ये पवित्र स्नान करण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होत असते. मात्र सद्य:स्थितीत चंद्रभागा नदीत स्नानासाठी पुरेसे पाणी नसल्याने भाविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. यासंदर्भात ' सकाळ'शी बोलताना येथील प्रांत अधिकारी तथा श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव म्हणाले, यात्रेदरम्यान भाविकांना स्नानासाठी नदीपात्रामध्ये पुरेसा पाणीसाठा राहील याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घेतली असून, गुरसाळे बंधाऱ्यातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.

loading image
go to top