
-सुनील राऊत
नातेपुते : वारीतील वारकऱ्यांना अन्नदानाच्या रूपाने आधार देणारा अवलिया भारत विश्वनाथ रामीनवार (रा. नांदेड) यांची विलक्षण कथा आहे. इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या भारत रामीनवार यांना संजय गांधी निराधार योजनेमधून १९८४ साली शासनाकडून २५० रुपये मिळाले होते. या अडीचशे रुपयांपासून ते आज बडे असामी झाले आहेत. मात्र, एकेकाळची आपल्या गरिबीची जाणीव असणारा हा माणूस आपल्या वडिलांची पंढरपूरची वारी डोळ्यापुढे ठेवून, वारीतील अनुभव लक्षात असल्यामुळे आपण काहीतरी केले पाहिजे, या एका ध्येयाने पछाडून त्यांनी नातेपुते जवळील शिखर शिंगणापूरच्या चौकात मोरोची हद्दीतील जालिंदर व हनुमंतराव सूळ यांच्या जागेत दहा वर्षांपासून वारकऱ्यांसाठी पिठले- भाकरी जेवण सुरू केले.