esakal | "भाऊ माझी परिस्थिती खूप हलाखीची आहे, मला तुम्ही मदत करता का?'
sakal

बोलून बातमी शोधा

Bachchu Kadu

"भाऊ माझी परिस्थिती खूप हलाखीची आहे, मला तुम्ही मदत करता का?'

sakal_logo
By
वैभव देशमुख

दोन फूट उंची... पूर्ण अपंग असणाऱ्या नयना जोकारचा राज्यमंत्र्यांना फोन... पूर्ण पाच मिनिटांचा संवाद... सध्या राज्यभर चर्चेचा विषय ऐकायला मिळत आहे.

मानेगाव (सोलापूर) : दोन फूट उंची... पूर्ण अपंग असणाऱ्या नयना जोकारचा (Nayana Jokar) राज्यमंत्र्यांना फोन... पूर्ण पाच मिनिटांचा संवाद... सध्या राज्यभर चर्चेचा विषय ऐकायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्‍यातील (Madha Taluka) मानेगाव येथे राहणारी नयना नागनाथ जोकार (वय 17) ही उंची दोन फूट असणारी शंभर टक्के अपंग आहे. नयनाला स्वतःहून काहीच हालचाल करता येत नाही. मात्र, तिला अगदी बोलता स्पष्टपणे येते. घरची परिस्थिती खूप हलाखीची असून, राहायला घर देखील नाही. (Disabled Nayana Jokar sought help from state minister Bachchu Kadu-ssd73)

हेही वाचा: 23 ऑगस्टपर्यंत अकरावी प्रवेशाची सीईटी! "या' जिल्ह्यांमध्ये थेट प्रवेश

अशा परिस्थितीमध्ये प्रहार संघटनेच्या (Prahar Sanghatna) कार्यकर्त्यांचा आणि नयनाचा संपर्क झाला आणि यातूनच तिला राज्यमंत्री बच्चू कडू (State Minister Bachchu Kadu) यांचा मोबाईल नंबर मिळाला. तिने डायरेक्‍ट बच्चू कडूंना फोन लावला आणि "भाऊ, मला राहायला घर नाही, हक्काची जागा नाही व माझी परिस्थिती फार हलाखीची आहे. मला तुम्ही मदत करता का?' असे म्हणत आपल्या कुटुंबातल्या व्यथा सांगितल्या व या व्यथा ऐकताना बच्चू कडू हे प्रवासात होते. हे सर्व ऐकून त्यांनाही गहिवरून आले व त्यांनी तत्काळ प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नयनाला शक्‍य ती मदत करून तिचे पुनर्वसन करा, अशा सूचना दिल्या.

नयना जोकार मानेगाव येथील संजीवनी विद्यालयामध्ये इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत आहे. तिला तिची आई रोज शाळेत ने-आण करते. ती सर्व व्यवस्था करते मात्र घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. तिला राहायला घर नाही. वडील रोज मजुरी करून कुटुंबाची गुजराण करत आहेत. त्यामुळे नयनाने थेट राज्यमंत्री बच्चू कडू यांना फोन केला व आपल्या व्यथा सांगितल्या. नयनाच्या व्यथा ऐकून बच्चू कडू यांनी तत्काळ सोलापूर जिल्हा प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला व "तुम्ही तत्काळ नयना जोकार हिला मानेगाव येथे भेटा व तिला काय पाहिजे, कशाची अडचण आहे त्याची पूर्तता करा. तिला पक्कं घर कशा पद्धतीने देता येईल याचे नियोजन करा', अशा सूचना दिल्या व चोवीस तासाच्या आत प्रहार संघटनेचे जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी मानेगावमध्ये पोचले. त्यांनी रोख स्वरूपातील मदत दिली. घर बांधण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून तिला पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या वेळी प्रहार संघटना पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख अमोल जगदाळे, विठ्ठल मस्के, संजीवनी बारंगुळे, दत्तात्रय व्यवहारे, अमोल केसरे, बापू राऊत आदींसह पदाधिकारी, विविध संघटनांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा: "या' गोष्टी करा, मुलांना होणार नाही कोरोना! 101 वर्षांवरील चौघे कोरोनामुक्‍त

खरे तर नयनाला सर्वच स्तरावर मदतीची गरज आहे. नयनाने बच्चू कडू यांना विचारले, "मला तुम्हाला भेटायचे आहे. कुठे भेट होईल?' यावर बच्चू कडू म्हणाले, मुंबईत आहे बेटा.' नयनाने प्रवासाला पैसे नसल्याचे सांगताच "तुला तिकिटाचे पैसे देतो, तुम्ही मुंबईला या' असे म्हणताच नयनाच्या कुंटुंबीयांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.

बच्चूभाऊंनी माझे म्हणणे ऐकून घेतले. मला मदत करतो म्हणाले. हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. मला मोठे होऊन तहसीलदार व्हायचे आहे व जनतेची सेवा करायची आहे.

- नयना जोकार

loading image