

सोलापूर: डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे रुग्णांना होणाऱ्या वेदना, निद्रानाशाने त्रस्त डोळे, ताण-तणावाने कोलमडलेले जीव, हृदयाची वाढती धडधड, उच्च रक्तदाबामुळे होणारी घालमेल आणि सततच्या आवाजामुळे उद्ध्वस्त झालेले मानसिक आरोग्य... ही सारी व्यथा सोमवारी शहरातील डॉक्टरांनी आपल्या आवाजातून पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्यापर्यंत पोचवली. ‘सोलापूर डीजेमुक्त व्हावे’ या मागणीसाठी काढलेल्या रॅलीत डॉक्टरांनी हादरवून टाकणारे अनुभव पोलिस आयुक्तांसमोर मांडले.