कोरोनामुळे अजूनही गणेश मूर्तींची विक्री संथगतीने; "या' मूर्तींना मिळतेय भाविकांची पसंती 

Ganesh Idols
Ganesh Idols

सोलापूर : शहरात गणेशोत्सवानिमित्त अनेकविध प्रकारच्या गणेश मूर्तींची विक्री बाजारात सुरू आहे. मात्र विसर्जन करण्यासाठी सोयीची व पर्यावरणपूरक म्हणून पीओपी ऐवजी शाडू मातीच्या मूर्ती घेण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. कोरोना संकटामुळे अजूनही मूर्ती विक्री संथगतीने सुरू आहे. तर सोलापूरच्या कलावंतांनी मात्र इतर शहरांच्या तुलनेत अधिक दर्जेदार मूर्तींची निर्मिती करून परराज्यात देखील प्रतिसाद मिळवला आहे. 

या वर्षी कोरोना संकटामुळे बाजारात मूर्ती विक्रीला साधारणच प्रतिसाद मिळत आहे. आर्थिक संकटामुळे कमी किमतीची मूर्ती विकत घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. तसेच छोट्यात छोटी मूर्ती अधिक प्रमाणात खरेदी केली जात आहेत. यावर्षी सोलापूर शहरात तयार केलेल्या मूर्तींची बाजारात संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वाहतुकीच्या अडचणीमुळे कोकण, पुणे, नगर आदी शहरांतून फारशा मूर्ती आलेल्या नाहीत. त्या तुलनेत सोलापूर शहरातील कलावंतांनी पीओपी व शाडू मातीच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात तयार केल्या आहेत. या मूर्तींना चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच सोलापूर शहरातून हैदराबाद, बंगळूर, विजयपूर आदी भागांत देखील मोठ्या संख्येने मूर्ती पाठवण्यात आल्या आहेत. 

गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी अद्याप ग्राहक बाजारात अपेक्षित संख्येने आलेला नाही. त्यामुळे मूर्ती विक्रीचा वेग देखील अगदीच कमी आहे. बच्चे कंपनीचा गणेशोत्सवासाठी उत्साह अधिक असतो, पण त्यांना बाजाराच्या गर्दीत आणणे टाळले जात आहे. कोरोनामुळे धास्तावलेल्या स्थितीतून ग्राहक अद्याप सावरला नसल्याने बाजारातील साठ टक्के मूर्तींची विक्री झालेली नाही. पोळा, अमावास्येनंतर देखील मूर्ती विक्री अद्यापही थंडच आहे. 

पीओपी व शाडू मूर्ती यांच्यातील फरक 

  • पीओपी मूर्ती देखण्या व आकर्षक असतात. बाजारात अधिक संख्येने उपलब्ध आहेत. मात्र या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत नाहीत. पयार्वरणास अपायकारक आहेत. 
  • शाडू मातीची मूर्ती ही साध्या पद्धतीची मूर्ती असते. पीओपीच्या तुलनेत शाडूच्या मूर्तींची संख्या कमी आहे. पाण्यात विरघळत असल्याने घरी विसर्जन शक्‍य असते. पर्यावरणपूरक असल्याने प्रदूषणविरहित असते. 

विसर्जनाचा संभ्रम 
यावर्षी कोरोना संकटामुळे गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघणार नाहीत. मग घरी बसवलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन कुठे करायचे, हा सर्वसामान्यांचा प्रश्‍न आहे. मूर्तीचे विसर्जन करता येणारच नसेल तर शाडू मातीची मूर्ती घेऊन घरीच पाण्यामध्ये विसर्जन करता येईल, याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. विसर्जन मिरवणुका या गणेश मंडळांसाठी असणार नाहीत. व्यक्तिगत विजर्सन करता येईल. 

जुळे सोलापूर येथील गणेश मूर्ती विक्रेता शहाजी पोकळे म्हणाले, यावर्षी मूर्ती विक्रीला उत्सव जसा जवळ येईल तसा प्रतिसाद वाढणार आहे. यावर्षी अडचणी असताना देखील स्थानिक कलावंतांसह कोकणच्या कलावंतांच्या मूर्ती उपलब्ध झाल्या आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com