esakal | अजित पवारांच्या दुसऱ्या सभेलाही प्रचंड गर्दी ! संयोजकावर झाला पुन्हा गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Mob

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काल (ता. 8) कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम झाला. या वेळी प्रचंड गर्दी झाल्याने कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

अजित पवारांच्या दुसऱ्या सभेलाही प्रचंड गर्दी ! संयोजकावर झाला पुन्हा गुन्हा दाखल

sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काल (ता. 8) कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम झाला. या वेळी प्रचंड गर्दी झाल्याने कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी 21 मार्च आणि 4 एप्रिल रोजी देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अशाच प्रचंड गर्दीत सभा झाल्याने त्याही वेळी गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना व सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी यांच्यावर कडक निर्बंध लादले जात असताना राजकीय पक्षांचे हजारोंच्या उपस्थितीत कार्यक्रम होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. असे असताना देखील जिल्हाधिकारी यांच्या आदेशाकडे काणाडोळा करून विविध पक्षांच्या सभा सुरू आहेत. 

उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत 21 मार्च रोजी श्रीयश पॅलेस येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसची सभा घेण्यात आली. त्या वेळी मीडियातून विचारणा झाल्यानंतर कार्यक्रमाचे संयोजक संदीप मांडवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 4 एप्रिल रोजी रांझणी येथे पुन्हा भगीरथ भालके यांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने सभा घेण्यात आली. तिथेही कोरोनाच्या नियमाची पायमल्ली करण्यात आल्याने राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 

या पार्श्वभूमीवर काल (गुरुवारी) उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या कार्यक्रमात काळजी घेतली जाईल अशी अपेक्षा होती; परंतु पुन्हा कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करत गर्दीत कार्यक्रम पार पडला. एकीकडे कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी केली नाही म्हणून सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असताना राजकीय पक्षांच्या सभा मात्र मोकाटपणे सुरू आहेत. 

याविषयी विचारलेल्या प्रश्नाला अजित पवार यांनी गर्दी केली जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. नियमांचे पालन केले पाहिजे, परंतु पंढरपूर- मंगळवेढ्यात पोटनिवडणूक होत असल्याने सभांसाठी गर्दी होणार हे लक्षात घेऊन नियम शिथिल केले पाहिजेत, असे मत व्यक्त केले. 

हजारोंच्या उपस्थितीत सभा होऊच नयेत यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याऐवजी कार्यक्रम झाल्यावर फार आरडाओरड झाली तर एखाद्या संयोजक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करायचा, अशी भूमिका घेतली जात असल्याने सर्वसामान्य नागरिक तसेच व्यापाऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल