esakal | जिल्ह्यातील 30 टक्केच शाळा सुरू होण्याची शक्‍यता! जाचक अटीचा परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

school

जिल्ह्यातील 30 टक्केच शाळा सुरू होण्याची शक्‍यता! जाचक अटीचा परिणाम

sakal_logo
By
प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

गावात शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत कमी एक महिना कोरोना रुग्ण आढळलेला नसावा, ही घातलेली अट जाचक ठरण्याची चिन्हे आहेत.

माळीनगर (सोलापूर) : कोरोनामुक्त (Covid-19) गावातील आठवी ते बारावीच्या शाळा 15 जुलैपासून सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यासाठी त्या गावात शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत कमी एक महिना कोरोना रुग्ण आढळलेला नसावा, ही घातलेली अट जाचक ठरण्याची चिन्हे आहेत. या अटीमुळे सोलापूर जिल्ह्यातील 30 टक्केच शाळा सुरू होण्याची शक्‍यता असून, अधिकाधिक शाळा सुरू होण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे. गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान विचारात घेता कोरोनाचे नियम व शाळा सुरू करण्याचे निकष यांची सांगड घालून जिल्ह्यातील आठवी ते बारावीच्या शाळा सरसकट चालू होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. (Due to oppressive conditions, only 30 percent schools in Solapur district are likely to start)

हेही वाचा: शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत! सरासरीच्या तुलनेत 53 टक्के खरीप पेरणी

कोरोनाच्या टाळेबंदीमुळे (Lockdown) अपवाद वगळता मागील वर्षभरात शाळांची घंटा दीर्घकाळ वाजलीच नाही. लॉकडाउनच्या काळात मुलांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यासाठीच्या पुरेशा सुविधा, विद्यार्थ्यांना मोबाईलची उपलब्धता, इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी अशा अनेक अडचणी आल्या. अध्ययन- अध्यापन प्रक्रिया खंडित झाल्याने मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून बाजूला फेकली गेली आहेत. त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे मोठे आव्हान आहे. मुले बराच काळ घरी असल्याने त्यांच्यात चिडचिडेपणा आला आहे.

कोरोनाची दुसरी लाट (The second wave of corona) अद्याप पूर्ण संपलेली नाही. शासनाने केवळ कोरोनामुक्त गावातील शाळा सुरू करण्यास संमती दिली आहे. जिल्ह्यातील 720 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. 500 गावात महिनाभरात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. त्यापैकी अंदाजे 375 गावात आठवी ते बारावीच्या शाळा आहेत. जिल्ह्यात एक हजार 87 माध्यमिक शाळा व आठवीचे वर्ग असलेल्या जिल्हा परिषदेच्या 135 शाळा आहेत. म्हणजे शासनाच्या निकषानुसार जिल्ह्यातील 30 टक्केच शाळा सुरू होण्याची शक्‍यता आहे. जाचक अटीमुळे उर्वरित शाळा सुरू होण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

हेही वाचा: होनमुर्गीत रोखले दोन बालविवाह ! चाईल्ड लाइनच्या कॉलवरून कारवाई

तर उर्वरित विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

मोठ्या माध्यमिक शाळा असलेल्या गावात अजूनही कोरोना रुग्ण आढळत आहेत. कोरोना रुग्ण नसलेल्या गावात आठवी ते बारावीच्या 375 शाळा सुरू झाल्या तरी उर्वरित शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारातच राहणार आहे. 70 टक्के शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित का राहायचे, गावात कोरोना रुग्ण आढळण्यात विद्यार्थ्यांचा काय दोष, उर्वरित गावे कोरोनामुक्त केव्हा होणार, कोरोनामुक्त गावात पुन्हा कोरोना रुग्ण आढळणार नाही याची खात्री कोण देणार, याचा विचार करता जिल्ह्यातील आठवी ते बारावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत ऑफलाइन शिक्षण मिळायला हवे. बोटावर मोजण्याइतक्‍या कोरोना रुग्णांसाठी हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात लोटण्यात काय अर्थ आहे. आठवी ते बारावीच्या शाळा सुरळीत चालू झाल्याशिवाय सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होऊ शकणार नाहीत. मोठ्या माध्यमिक शाळांच्या गावात आढळलेले कोरोना रुग्ण व त्यांच्या कुटुंबांना गृह विलगीकरणात राहण्याची सक्ती करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळायला हवे.

जिल्ह्यातील 720 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. साधारण 500 गावांमध्ये महिनाभरात एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. त्यापैकी अंदाजे 375 गावात आठवी ते बारावीच्या शाळा आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण व आरटीपीसीआर चाचणी करण्याचे नियोजन केले आहे.

- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

जिल्ह्यातील स्थिती

  • माध्यमिक शाळांची संख्या : 1087

  • जिल्हा परिषदेच्या आठवीच्या शाळा : 135

  • आठवी ते बारावी विद्यार्थी संख्या : 3 लाख 27 हजार 85

  • आठवी ते बारावी शिक्षक संख्या : 31 हजार

  • शिक्षकेतर कर्मचारी : 4348

loading image