esakal | शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत ! सरासरीच्या तुलनेत 53 टक्के खरिपाची पेरणी
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer

शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत! सरासरीच्या तुलनेत 53 टक्के खरीप पेरणी

sakal_logo
By
प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर जिल्ह्यात खरिपाची सरासरीच्या तुलनेत 53 टक्के पेरणी झाली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने अजूनही अनेक ठिकाणी पेरणी करण्यास अडचण निर्माण झाली आहे.

माळीनगर (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यात खरिपाची सरासरीच्या तुलनेत 53 टक्के पेरणी (Kharif sowing) झाली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने अजूनही अनेक ठिकाणी पेरणी करण्यास अडचण निर्माण झाली आहे. उडीद आणि सोयाबीनची पेरणी सरासरीपेक्षा अधिक झाली आहे. पाऊस नसल्याने शेतकरी धास्तावला असून त्यांना झालेल्या पेरण्यांची चिंता लागली आहे. खरीप हंगाम वाया जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांना दमदार पावसाची (Heavy Rain) प्रतीक्षा आहे. (Farmers in Solapur district are waiting for heavy rains)

हेही वाचा: खरीप हंगामाच्या पीक विम्याची मुदत 15 जुलैपर्यंत !

कोरोनामुळे (Covid-19) झालेल्या लॉकडाउनमुळे (Lockdown) शेतीमालाला भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या आधीच पिचला आहे. खरिपात उत्पन्न मिळेल, या आशेवर शेतकरी बसला आहे. पावसाळ्याच्या प्रारंभी पाऊस झाला. त्यानंतर मृग, आर्द्रा नक्षत्राने दगा दिला. जून सरला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. पावसाअभावी पेरणी करणारे व न करणारेही शेतकरी संकटात आहेत. पावसाने दडी मारल्याने मजुरांना कामधंदा नाही. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे महागाईने नागरिक हैराण झाले आहेत.

खरिपाचे जिल्ह्यातील सरासरी क्षेत्र तीन लाख 72 हजार 177 हेक्‍टर आहे. त्यापैकी एक लाख 96 हजार 919 हेक्‍टर क्षेत्रात यंदा खरिपाची पेरणी झाली आहे. गतवर्षी या कालावधीत दोन लाख 25 हजार 777 हेक्‍टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 28 हजार 858 हेक्‍टर क्षेत्रात पावसाअभावी कमी पेरणी झाली आहे. जिल्ह्यात 8 जुलैपर्यंतचे सरासरी पाऊसमान 127 मिलिमीटर इतके आहे. आतापर्यंत 146.5 मिलिमीटर पाऊस जिल्ह्यात झाला आहे. सरासरीच्या तुलनेने जिल्ह्यात अधिक पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून दिसत असले तरी प्रत्यक्षात खरीप पिकांची स्थिती खूप वेगळी आहे. अजूनही अनेक भागात पेरण्या रखडल्या आहेत. अक्कलकोट, माळशिरस व करमाळा तालुक्‍यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

हेही वाचा: "जि. प. कर्मचाऱ्याचे 21 लाखांचे वैद्यकीय बिल दोन आठवड्यांत द्या!'

8 जुलैपर्यंत तालुकानिहाय झालेल्या पावसाची नोंद (मिलिमीटरमध्ये)

उत्तर सोलापूर 176.5, दक्षिण सोलापूर 150, बार्शी 164.9, अक्कलकोट 124.2, मोहोळ 135.7, माढा 180.4, करमाळा 122.1, पंढरपूर 142, सांगोला 148, माळशिरस 106.6, मंगळवेढा 146.5

पाऊस नसल्याने अनेकांनी पेरण्या केल्या नाहीत. तुरळक झालेल्या पेरण्या उगवून आल्यावर पाण्याअभावी सुकून गेल्या. विहिरी, बोअरचे पाणी कमी झाले आहे.

- दादासाहेब भोसले, शेतकरी, तांबवे (माळशिरस)

पावसाअभावी पेरणी वाया चालली आहे. दुबार पेरणी करावी लागण्याची शक्‍यता आहे.

- सुदर्शन शेळके, शेतकरी, रावगाव (करमाळा)

हेही वाचा: "स्वतंत्र केंद्रीय सहकार मंत्रालयामुळे घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्‍यता !'

जिल्ह्यातील खरीप पेरणी क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

  • पीक : सरासरी पेरणी क्षेत्र - प्रत्यक्ष पेरणी

  • बाजरी : 33351 - 20320

  • मका : 26855 - 19051

  • तूर : 68013 - 51995

  • मूग : 13657 - 10055

  • उडीद : 36064 - 41280

  • भुईमूग : 39176 - 34353

  • सोयाबीन : 37811 - 46814

  • सूर्यफूल : 6930 - 4461

loading image