esakal | नऊ महिने झाले लग्नाचा बस्ता बांधून ! शेवटी नवरीच गेली अमेरिकेला अन्‌...
sakal

बोलून बातमी शोधा

Marriage

नऊ महिने झाले लग्नाचा बस्ता बांधून ! शेवटी नवरीच गेली अमेरिकेला अन्‌...

sakal_logo
By
धीरज साळुंखे

भाळवणी (सोलापूर) : भारतात कोरोनासारख्या महामारीने थैमान घातले असताना विवाहास अनेक अडचणी येत आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउन घोषित केल्यानंतर व अवघ्या 50 ऐवजी 25 लोकांमध्येच विवाह सोहळा करावा, असा आदेश काढल्यानंतर लग्न करण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. मात्र लग्नाचा बस्ता बांधून नऊ महिने झालेल्या वधू-वराकडील मंडळींना विवाहाचे मुहूर्त टळतच गेल्याने टेन्शन येत होते. कारण, मुलगा अमेरिकेत नोकरीनिमित्त अडकलेला. त्यामुळे शेवटी नवरीच अमेरिकेला गेली अन्‌ एकदाचा लग्नाचा बार उडवून दिला.

अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या मुलास भारतात येणे कठीण झाले होते. यावर दोन्ही कुटुंबातील लोकांनी नामी शक्कल लढवून वधू स्मिता हिचा व्हिसा काढून अमेरिकेत पाठविले. वधू-वरांचे आई-वडील, भाऊ, मामा व नातेवाइकांच्या अनुपस्थितीत भारतातील स्मिता व अभिषेक यांचे लग्न 17 एप्रिल रोजी अमेरिकेतील मिशिगन येथील श्री वेंकटेश्वरा मंदिरात पार पडले. या वेळी मित्र-मैत्रिणी यांच्यासमवेत अवघ्या पंचवीस लोकांच्या उपस्थितीत हिंदू पद्धतीने विवाह पार पडला. आई, वडील यांनी घरीच थांबून यू-ट्यूब व फेसबुकवर ऑनलाइन विवाह सोहळ्यास हजेरी लावली व वधूवरांना आशीर्वाद दिला.

हेही वाचा: गृहमंत्र्यांच्या नावाने बार्शी पोलिसांनी केली पाच लाखांची मागणी ! व्यापाऱ्याचा आरोप

उत्तम कुंभार व त्यांच्या पत्नी अरुणा या दाम्पत्याचे मूळ गाव वाडीकुरोली हे आहे. नोकरीनिमित्त हडपसर (पुणे) येथे वास्तव्यास आहेत. त्यांची मोठी मुलगी स्मिता हिचे शिक्षण इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजीमधून इंजिनिअर झाले आहे. ती पुण्यातील नामांकित कंपनीत नोकरी करत आहे. तर वर अभिषेक याचे शिक्षण एमएस (इंडस्ट्रिअल इंजिनिअर) झाले आहे. सध्या नोकरीस अमेरिकेत आहे. नागेश कुंभार व यांच्या पत्नी नेहा यांचा तो मुलगा असून मूळचे कोल्हापुरातील मोहिते पार्क (रंकाळा) या परिसरात राहतात.

या विवाहबाबत वधूचे वडील उत्तम कुंभार म्हणाले, 22 मार्चला वाडीकुरोलीचे माझे भाऊ चंद्रकांत कुंभार व मुलीचे आजोबा सुभाष सखाराम कुंभार यांनी कोल्हापूर या ठिकाणी मुलाचे घर पाहून स्थळ पसंद केले. त्या दिवशीही कोरोनामुळे मला व तिच्या आईला कोल्हापूर या ठिकाणी जाण्यासाठी पास मिळाला नव्हता. अमेरिकेत लग्न होईल हे अपेक्षित नव्हतं. अभिषेकला प्रमोशन मिळाले होते. त्याला भारतात येण्यासाठी व्हिसा मिळत नव्हता. मिळालाच तर परत अमेरिकेत जाण्यास मिळेल की नाही याची शंका होती. शेवटी स्मिता व तिच्या भावाला दिल्ली येथे जाऊन व्हिसासाठी असणाऱ्या ओरल टेस्टसाठी पाठवले. त्यात ती पास झाली. नऊ महिने झाले होते लग्नाचा बस्ता बांधून मात्र मूहर्त काही मिळत नव्हता.

हेही वाचा: "माणसा सुधर, नाही तर प्रत्येक घर होईल दवाखाना !'

मुलाचे वडील नागेश कुंभार म्हणाले, विज्ञान युगात मुलीला ऑनलाइन पद्धतीने पसंत केले. त्यानंतर मुलीला प्रत्यक्ष पाहिलं व बैठक करण्यात आली. खूप दिवस झाले लग्न जमून परंतु कोरोनामुळे ते शक्‍य होत नव्हतं. माझे आई-वडील शिक्षक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली घरातील सपोर्टमुळे हा लग्न सोहळा पार पडल्याचा आनंद आहे. आम्हाला दोन मुलं, मुलगी नाही. स्मिताचा स्वभाव मनमिळावू आहे, ती आमची सून नाही तर मुलगी म्हणून तिच्याकडे पाहतो. अमेरिकेत हिंदू धर्माप्रमाणे 25 लोकांच्या उपस्थितीतच सोहळा संपन्न झाला आहे.