ताशांचा आवाज कुठं नाय झाला, तरीही बाप्पा माझा थाटात आला !

घरोघरी 'श्रीं'ची उत्साही प्रतिष्ठापना; मंडळांच्या मंडपातही गणराय विराजमान
Solapur
Solapur sakal

सोलापूर : ना ढोलचा दणदणाट... ना ताशांचा कडकडाट... अवघी गुलाबपुष्प अन्‌ गुलालाची मुक्त उधळण करीत शहरवासियांनी लाडक्‍या बाप्पांचे थाटामाटात स्वागत केले. कोरोनाच्या संभाव्य लाटेची सावधगिरी बाळगत भक्‍तगणांनी आपल्या घरी बाप्पांचे भक्तिभावात स्वागत केले. सार्वजनिक मंडळांच्या (public circles) मंडपातही बाप्पा दिमतीने विराजमान झाले. बाप्पांच्या आगमनाने सारं शहरच जणू "मंगलमय' झालं आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणरायाच्या आगमनासाठी भक्‍तांची होणारी गर्दी व गणेशमूर्ती खरेदी, यानुसार व्यापाऱ्यांनी पहाटे पाच वाजल्यापासून तयारी केली होती. शहरातील प्रत्येक छोट्या-मोठ्या चौकांमध्ये गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल थाटण्यात आले होते. पहाटे पाचपासूनच "श्रीं'ची मूर्ती घरी घेऊन जाण्यासाठी भक्तांनी स्टॉलकडे रिघ लागली होती. कुणी बुकींग केलेल्या गणेशमूर्ती मनोभावे पूजन करून घेऊन जात होता. तर कुणी स्टॉलवर हेरून गणेशमूर्ती पसंत करताना दिसून आला. गणपती बाप्पा मोरया .. मंगलमूर्ती मोरया.... आला रे आला गणपती आला च्या घोषणांनी शहरातील रस्ते अगदी दणाणून गेले होते. घरोघरी पहाटे 4.30 ते दुपारी 1.50 या मुहूर्तावर घरोघरी आपापल्या सवडीने गणेशभक्‍तांनी पूजाअर्चा करून "श्रीं' ची भक्तीमय वातावरणात प्रतिष्ठापना केली.

यंदा कोरोनामुळे ढोल, ताशा व लेझीम आदी मिरवणुकीवर आणि सार्वजनिक मंडळांच्या उत्सवावर बंदी असली तरी गणपती सजावट साहित्यांच्या दुकानात मात्र रंगबेरंगी लाईटच्या झिरमाळ्या, पांढऱ्या मोत्यांचे हार, किरीट आदी खरेदीला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महापालिकेच्या आवाहनानंतरही शहरवासियांनी बाप्पाच्या आगमनासाठी कुटुंबियांसह बाजारात येणे पसंत केले. त्यामुळे वयोवृध्दांसह बच्चेकंपनींचाही सहभाग उत्सवात दिसून आला. महत्त्वाचं म्हणजे बहुतांश जणांनी आपल्या तोंडावर मास्क असेल याची खबरदारी घेतल्याचे दिसून आले.

Solapur
ज्या कपड्यांत व्हॅक्सिन घ्यायला गेली, त्यामुळे झाली ट्रोल

कलेसह कलावंतही बाजारात अवतरले

गणेशमूर्ती विक्रीसाठी अनेक मूर्ती कलावंतांनी स्टॉल मांडून मूर्तींची विक्री केली. विविध मूर्तींच्या माध्यमातून आपली कला शहरवासियांसमोर सादर करणाऱ्या कलावंतांनी बाप्पांच्या विक्रीसाठी स्वत:च आर्ट स्टॉल थाटले होते.

शाडूच्या मूर्तींची मागणी

पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करण्याकडे भक्‍तांचा कल वाढत आहे. पर्यावरणाबाबत जनजागृती मोठ्या प्रमाणात होत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा शहरातील मुख्य चौकांमध्ये शाडूच्या मूर्तींचे स्टॉल उभारण्यात आले होते. शाडूच्या गणपती खरेदीला भक्‍तांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.

हलगीच्या निनाद

गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यासंबंधी सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्यामुळे ना वाजंत्री, ना कानटाळ्या बसविणारे डॉल्बी, ना नाशिक ढोलचा आवाज घुमला. कोरोनाच्या सावटाखाली बाप्पाच्या आगमनात हलगीचा निनादात मात्र काही ठिकाणी घुमला होता

सेल्फीचा नाद कायम

पांढरेशुभ्र कपडे, नेहमीपेक्षा जरा हटके असा पांढरा शुभ्रकपड्यांचा पेहराव. माथी केशरी रंगाची रिबीन आणि मुखी "गणपती बाप्पा मोरया 'चा जयघोष अशा उत्साही, भक्‍तीमय वातावरणात अनेक कुटुंबांनी व युवकांनी सेल्फीचा आनंद घेतला.

Solapur
युवकांनी केले बेरोजगारी, महागाईविरोधात विद्यापीठ गेटवर निदर्शने

कोरोना नियम अन्‌ उत्सव

- शहरातील काही चौकांमध्ये सोशल डिस्टन्सचा उडाला फज्जा.

- श्री गणेशमूर्तींसह इतर खरेदीसाठी आलेले काही नागरिक मास्कविनाच होते.

- प्रशासनाच्या सूचनांना बगल देत बाजारपेठेत बच्चेकंपनींना घेऊन पालकांचा सहभाग.

- चौक अन्‌ रस्त्याच्या दुतर्फा भाजी विक्रेते, पूजा साहित्य विक्रेते, मूर्ती विक्रेत्यांनी फुटपाथवरच टेबल, पलंग व स्टॉल मांडले होते. रहदारी खोळंबत होती.

- पोलिस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी व्यापारी व ग्राहक यांच्याकडून नियमांचे पालन झालेच नाही.

याठिकाणी होता तगडा बंदोबस्त

शहरात भवानी पेठ, भारतीय चौक, भुसार गल्ली, कुंभार वेस, कन्ना चौक, बाळीवेस, टिळक चौक, जोडबसवण्णा चौक, राजेंद्र चौक, शिवाजी चौक, सम्राट चौक, मधला मारुती, अशोक चौक, विजापूर रोड, सैफुल आदीठिकाणी भक्‍तांची मोठी गर्दी होती. मात्र बाळीवेस ते टिळक चौक ते मधला मारुती, बसवेश्‍वर सर्कल, कन्ना चौक, विजापूर वेस याठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. "गर्दी करू नका, सोशल डिस्टन्स पाळा' असे आवाहन पोलिसांकडून स्पिकरद्वारे वारंवार करण्यात येत होते. या मार्गावर दुचाकीशिवाय इतर वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com