esakal | विठ्ठलाच्या गावी रोज फिरतायत 11 हजार बेघर

बोलून बातमी शोधा

Every day 11000 homeless are in Pandharpur

पंढपुरात दररोज अन्नाच्या आणि निवारार्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या लोकांची संख्या सुमारे 11 हजाराहून अधिक असल्याची बाब समोर आली आहे. बेघर लोकांच्या पुनर्वसनासाठी काम करणार्या एका सेवाभावी संस्थेने अलीकडेच पंढरपुरात सर्वे केला होता. त्या सर्वेमधून ही बाब समोर आली आहे.

विठ्ठलाच्या गावी रोज फिरतायत 11 हजार बेघर

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर ही भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. येथे विठ्ठल दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात.  भाविकांबरोबरच अन्न, पाणी आणि निवारार्याच्या शोधात येणार्या बेघर, दिव्यांग, वृध्द, वैफल्यग्रस्त, पिडीत आणि निराश्रीत लोकांचीही संख्या अधिक आहे.

पंढपुरात दररोज अन्नाच्या आणि निवारार्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या लोकांची संख्या सुमारे 11 हजाराहून अधिक असल्याची बाब समोर आली आहे. बेघर लोकांच्या पुनर्वसनासाठी काम करणार्या एका सेवाभावी संस्थेने अलीकडेच पंढरपुरात सर्वे केला होता. त्या सर्वेमधून ही बाब समोर आली आहे.
पंढरपुरातील विविध मठ, मंदिर, धर्मशाळा, वाळवंट, घाट परिसर, रेल्वे स्टेशन, बस स्थानक याबरोबरच रस्त्यावरुन पैसे आणि अन्न मागत फिरणाऱ्या वृध्द महिला, पुरुषांबरोबरच मनोरुग्णांची संख्या देखील अधिक आहे. अशा लोकांचा यात्राकाळात भाविकांना व छोट्या दुकानदारांनाही त्रास सहन करावा लागतो. तो त्रास कमी करण्यासाठी बेघर आणि निराश्रीत लोकांसाठी पंढरपुरात माऊली बेघर निवाऱा केंद्र सुरु केले आहे. नगरपालिका, केंद्र सरकार आणि मंगळवेढा येथील परिश्रम ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राच्या मदतीने शहरात फिरणाऱ्या बेघर आणि निराश्रीत लोकांना आणून त्यांची राहण्याची, दोन वेळच्या जेवणाची व कपडयाची मोफत सोय केली जाते. हे केंद्र गोपाळपूर रोडवर आंध्रप्रेदश सरकारने बांधलेल्या वारकरी भवनामध्ये गेल्या पाच महिन्यांपासून विनाखंड सुरु आहे. या केंद्रामध्ये शंभर बेडची व्यवस्था केली आहे. पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र निवास आणि शौचालयाची सोय केली आहे. आता पर्यंत या केंद्रामध्ये 197 बेघर, अपंग, मनोरुग्ण, वृध्द अशा महिला व पुरषांची नोंद झाली आहे.यापैकी 55 जणांना संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या घरी परत पाठवले आहे.सध्या 45 लोक या ठिकाणी आश्रयाला आहेत. केंद्रातील लोकांची सेवा करण्यासाठी सहा लोकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये तीन जण काळजी वाहक, एक व्यवस्थापक, तर दोन जण स्वच्छतेचे काम करतात. येथे येणार्या लोकांना येथील उपजिल्हा रुग्णालायत मोफत औषधोपचार ही केले जातात. पंढरपुरात बेघर निवारा केंद्र सुरु झाल्याने नदी घाट, नदीपात्रासह इतरत्र उघड्यावर रात्रं काढणार्या बेघरांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे.

रस्त्यावरुन फिरणाऱ्यांची संख्या वाढली
केंद्र सरकारने दिनदयाळ अंत्योदय योजनेतून पंढरपुरात माऊली निवारा केंद्र सुरु केले आहे. येथे दहा लोकांची सोय आहे. परंतु पंढरपूर शहरात बेघर आणि रस्त्यावरुन फिरणार्या लोकांची संख्या अधिक आहे. अशा लोकांनाही संस्थेने या केंद्रात सोय केली आहे. यासाठी दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी मदत केली आहे. आणखी बरेच लोक शहरात फिरताना दिसतात. अशा लोकांची देखील सोय व्हावी यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. अलीकडेच संस्थेने अशा लोकांचा सर्वे केला होता. त्यामध्ये किमान 11 हजार लोक शहरात आहेत. या सर्व लोकांची सोय व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.शोध व्हाॅनची सोय करुन द्यावी. 
- मुबारक शेख, व्यवस्थापक माऊली निवारा केंद्र, पंढरपूर