Solapur : विमा कंपनी अन्‌ कृषी खात्याच्या पडताळणीत बनावट शेतकरी उघड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rabbi sowing started in the  district ; So far 18% complete

Solapur : विमा कंपनी अन्‌ कृषी खात्याच्या पडताळणीत बनावट शेतकरी उघड

सोलापुर- हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत आंबा बहारामध्ये तालुक्यामधील आठ महसूल मंडलातील शेतकऱ्यांचा समावेश असतो. त्यामध्ये दोन महसूल मंडलामधील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या ही इतर मंडलापेक्षा अधिक असते. त्यामध्ये फळपीक जमिनी दुसऱ्या गावातील शेतकऱ्याची असून, या जमिनी शंभर रुपये प्रतिज्ञापत्र करून खंडाने कसत असल्याचे दाखवून त्या जमिनीचा विमा खंड लावणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे भरला जातो.

यामध्ये काही सीएससी सेंटर चालकही सहभागी आहेत. पण असा विमा प्रस्ताव अपलोड करताना त्यांनी संबंधित शेतकऱ्याकडून ‘अर्थ’पूर्ण व्यवहार करीत असल्याची माहिती समोर येत आहे. ही बाब गेल्या काही वर्षांपासून सुरू असून, ठराविक मंडलाचा विमा मिळवण्यासाठी विमा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या संपर्कात असतात.

गतवर्षी काही शेतकरी पडताळणीत समोर आले होते. सध्या हाच प्रकार विमा कंपनीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रँडम पद्धतीने काही शेतकऱ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये एकाही शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये फळपीक आढळून आले नाही. हा विमा दुसऱ्याच शेतकऱ्यांनी भरला. या प्रस्तावामध्ये परजिल्ह्यातील शेतकऱ्यांचा देखील समावेश केला.

वास्तविक पाहता, गेल्या तीन-चार वर्षांपासून फळबाग विमा भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या एक-दोन मंडलांमध्येच सर्वाधिक असते व इतर मंडलांमध्ये फार तोकडी असते. यावर संबंधितांच्या लक्षात यायला हवे होते; परंतु यातील काहींचे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी लागेबांधे असल्यामुळे विमा कधी मंजूर होणार, किती होणार याची देखील माहिती त्यांना लागत होती.

अलीकडच्या दोन वर्षात विमा कंपन्याच बदलल्यामुळे त्यांनी पडताळणी करून माहिती जाणून घेतली. त्यामध्ये अनेक गैरप्रकार समोर येऊ लागले. त्यामुळे या चुकीमुळे प्रामाणिकपणे विमा भरलेल्या फळबाग शेतकऱ्यांना मात्र विमा कंपनीने टार्गेट केला. विमा कंपनीच्या पोर्टलवर अर्ज भरताना सात-बारा व ‘आठ अ’चा क्रमांक टाकावा लागतो. त्यावेळी विमा कंपनीने पडताळणी करताना बरोबर की चूक, ही त्रुटी काढायला हवी होती.

योग्य असेल तरच अर्ज सबमिट व्हायला हवा होता. गेल्या दोन वर्षात तालुक्याच्या इतर मंडलांमध्ये विमा न देणाऱ्या विमा कंपनीने एकाच मंडलातील शेतकऱ्यांना टार्गेट करून कारवाईचा बडगा दाखवून चूक झाकण्याचा प्रयत्न यानिमित्ताने सुरू असल्याचा सूर या भागातील नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.