esakal | शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी ! बाजार समितीत कांद्याला प्रतिक्‍विंटल शंभर ते बाराशेचा दर

बोलून बातमी शोधा

Onion
शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी ! बाजार समितीत कांद्याला प्रतिक्‍विंटल शंभर ते बाराशेचा दर
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जमिनीच्या मशागतीपासून कांदा बाजारात येईपर्यंत शेतकऱ्याने एकरी 35 ते 40 हजारांचा खर्च करूनही कांद्याला सध्या प्रतिक्‍विंटल शंभर ते बाराशे रुपयांचा दर मिळू लागला आहे. शेतमालाची आवक वाढली आहे, परंतु कडक संचारबंदीमुळे मागणी घटल्याने दर गडगडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळत आहे.

ऊस कारखान्याला घालून दीड महिन्याहून अधिक काळ लोटला, तरीही एफआरपीची संपूर्ण रक्‍कम मिळालेली नाही. भाजीपाला आहे, परंतु त्यालाही भाव नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह, उसने तथा व्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड, बॅंकांचा तगादा अशा विविध कारणांमुळे कमी दर असतानाही शेतकरी आपला शेतमाल कवडीमोल भावाने विक्री करू लागला आहे. सोलापूर कृषी बाजार समितीत दररोज कांद्यासह टोमॅटो, बटाटा, वांगी, काकडी, टरबूज, खरबूज, कलिंगड अशा विविध फळभाज्यांची आवक वाढली आहे. कडक संचारबंदी असली, तरीही शेतमाल हा नाशवंत असल्याने तो ठेवता येत नाही. त्यामुळे भाव परवडत नसतानाही शेतकऱ्याला तो विकावा लागत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या शेतमालावर बाजार समित्या मालामाल झाल्या आहेत, हे विशेष. मागील वर्षी कांद्याला एप्रिलमध्ये सरासरी अडीच हजारांपर्यंत दर होता. आता मात्र, उत्पादन खर्च निघत नाही, अशी स्थिती आहे.

हेही वाचा: पोटनिवडणुकीनंतर पंढरपूरची विदारक परिस्थिती! हॉस्पिटल्स फुल्ल; वाढतेय बाधित व मृतांची संख्या

कोरोना काळातही बाजार समिती मालामाल

मार्च 2020 पासून राज्यात कोरोनाचे सुरू झालेले संकट अजूनही दूर झालेले नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्रीतून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला 2020-21 या आर्थिक वर्षात तब्बल 23 कोटी 60 लाखांचा नफा झाला आहे. मागच्या वर्षी (2019-20) बाजार समितीला 21 कोटी 89 लाखांचा फायदा मिळाला होता. आता ज्या शेतकऱ्याच्या शेतमालातून बाजार समितीला फायदा झाला, त्यांच्यासाठी सभापती विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनातून शेतकरी निवास उभारण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाल्याची माहिती बाजार समितीचे प्रभारी सचिव अंबादास बिराजदार यांनी दिली. कोरोनाचे निकष पाळून बाजार समितीत दररोज सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत कांद्याचे लिलाव होतात, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

कांद्याची सद्य:स्थिती

  • दररोजची सरासरी आवक : 220 गाड्या

  • किमान दर : 100 रुपये

  • कमाल दर : 1200

  • मागील वर्षीचा दर : 2700