esakal | पोटनिवडणुकीनंतर पंढरपूरची परिस्थिती विदारक ! हॉस्पिटल्स फुल्ल; वाढतेय बाधित व मृतांची संख्या

बोलून बातमी शोधा

Hospital
पोटनिवडणुकीनंतर पंढरपूरची विदारक परिस्थिती! हॉस्पिटल्स फुल्ल; वाढतेय बाधित व मृतांची संख्या
sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर शहर आणि तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना, शहरातील सर्व कोव्हिड डेडिकेटेड हॉस्पिटल्स हाउसफुल्ल झाली आहेत. रुग्णांवर वेळेवर उपचार होऊ शकत नसल्याने मृतांची संख्या वाढू लागली आहे. कोणत्याच कोव्हिड डेडिकेटेड हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसल्याने व रुग्णाला उपचार मिळत नसल्याने अतिशय विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.

पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्‍यांत पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हजारो लोकांच्या गर्दीत सभा घेतल्या. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. दोन्ही तालुक्‍यांत कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले आहेत. गेल्या पंधरा दिवसांत दोन्ही तालुक्‍यांत मिळून दोन हजार 813 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असताना कोव्हिड डेडिकेटेड हॉस्पिटल्सची संख्या मात्र अत्यंत अपुरी पडत आहे.

हेही वाचा: तर बार्शी तालुक्‍याव्यतिरिक्त इतर रुग्णांना दाखल करून घेणार नाही ! आमदार राऊतांचा इशारा

अनेक दिवस शहरात उपजिल्हा रुग्णालय, लाईफलाइन, गॅलॅक्‍सी, ऍपेक्‍स आणि श्री विठ्ठल अशा पाच ठिकाणी आणि तालुक्‍यातील करकंब येथे एक अशा एकूण सहा ठिकाणीच कोरोना रुग्णांवर उपचार होत होते. नुकतेच पावले, मेडिसिटी आणि वरदविनायक अशा तीन हॉस्पिटल्सना जिल्हाधिकारी यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे 75 जादा बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध झाले आहेत. पोलिस संकुलात प्राधान्याने पोलिसांवर उपचार करण्यासाठी 48 ऑक्‍सिजन बेडची व्यवस्था असलेले हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. परंतु, कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या मानाने बेडची संख्या अत्यंत कमी पडू लागली आहे.

सद्य:स्थितीत सुमारे साडेपाचशेहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील सर्व हॉस्पिटल्समधील क्षमता संपली असून हॉस्पिटल हाउसफुल्ल झाली आहेत. शहर व तालुक्‍यातील गंभीर स्थिती लक्षात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक रुग्णांवर उपचार केले जात आहेत. शहरातील रुग्णालयांना ऑक्‍सिजनचा तुटवडा जाणवत असून, व्हेंटिलेटर कमी पडू लागले आहेत. रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन मिळत नसल्याने गरजू रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

शहरात कोरोना रुग्णांवर उपचार व्हावेत यासाठी संबंधितांच्या नातेवाइकांची धावाधाव सुरू आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये चौकशी केल्यानंतर तिथे बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे. घरातील कोरोना बाधित व्यक्तीवर उपचार व्हावेत यासाठी धावपळ करून देखील दवाखान्यात दाखल करू न शकल्याने संबंधित रुग्णांचे उपचाराअभावी मृत्यू होऊ लागले आहेत. एकंदरीतच, अतिशय विदारक परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: कोरोना मृतांच्या कारणांचा घेतला जाणार शोध ! आयुक्‍तांनी नेमली डेथ ऑडिट कमिटी

लसीकरणासाठी गर्दी

लसीकरणासाठी खासगी हॉस्पिटलमधून आणि मनिषा नगरमधील नागरी आरोग्य केंद्रात नागरिक गर्दी करत आहेत. परंतु काही हॉस्पिटलमधून एका दिवशी केवळ वीस ते तीस लोकांना पुरेल इतकीच लस शासनाकडून उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या लोकांना तास्‌तास थांबूनही लस न घेता घरी परत जावे लागत आहे. अनेक नागरिकांचे पहिले लसीकरण होऊन पंचेचाळीस दिवस होऊन गेले आहेत. ते लोकही दुसऱ्या लसीकरणासाठी हॉस्पिटलशी संपर्क साधत आहेत. परंतु हॉस्पिटल्सना लस उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.

लसीकरणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

नगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रांत लसीकरण सुरू आहे. तिथे गर्दी होऊ लागल्याने नगरपालिकेने गूगल फॉर्मवर रजिस्ट्रेशनची व्यवस्था केली आहे. 45 वर्षापुढील नागरिकांनी गूगल फॉर्मच्या लिंकवर जाऊन नाव नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या नागरिकांना आदल्या दिवशी फोनद्वारे संपर्क साधून त्यांना कोणत्या वेळी लसीकरणासाठी उपस्थित राहावे याविषयी कळवले जाणार आहे. त्यानुसार लोकांनी गर्दी न करता रजिस्ट्रेशन करावे, असे आवाहन मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी केले आहे.