
सोलापूर : शहर-जिल्ह्यात यंदा प्रथमच मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पावसाने उच्चांक मोडला आहे. आतापर्यंत सुमारे १७१ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील पावसाची मे महिन्याची सरासरी ३२ मिलिमीटर इतकी आहे. आतापर्यंत जवळपास सात पट जादा पाऊस झाला आहे. अनपेक्षितपणे झालेल्या या पावसामुळे बेसावध असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. केळी, डाळिंब, पेरू, आंबा, द्राक्ष, पपई या बागांसह कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच वीज पडून जीवितहानी झाली असून मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे बांध तसेच छोटे-मोठे बंधारे फुटले आहेत.