Draought : उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यांतील शेतकरी चिंतेत; दोन्ही तालुके दुष्काळाच्या यादीत नाहीत

सोलापूर जिल्ह्यातील १९१ महसूल मंडळांपैकी जवळपास ९५ महसूल मंडळांमध्ये पावसाने मोठा खंड दिला होता. त्यावेळी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
North Solapur and Akkalkot tahsil drought
North Solapur and Akkalkot tahsil droughtakal

सोलापूर - उत्तर सोलापुरातील काही गावे मोहोळ विधानसभा मतदारसंघात असून दुसरीकडे याच तालुक्याचा पाऊस मोजताना सोलापूर शहरातील पाऊसही गृहीत धरला जातो. त्यामुळे अडगळीतील या तालुक्याचा वाली कोण, असा प्रश्न आहे. दुसरीकडे अक्कलकोट तालुक्यात कोरडवाहू जमिनीचे क्षेत्र जास्त असून यंदा अनेक महसूल मंडळांमध्ये पाऊस कमीच झाला.

तरीसुद्धा दोन्ही तालुके दुष्काळाच्या यादीत नाहीत. तालुक्याचे विद्यमान आमदार- माजी आमदार मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार दरबारी विशेष प्रयत्न करतील का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सोलापूर जिल्ह्यातील १९१ महसूल मंडळांपैकी जवळपास ९५ महसूल मंडळांमध्ये पावसाने मोठा खंड दिला होता. त्यावेळी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता रब्बीच्या पेरण्या सुरू आहेत, पण ओल कमी असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. उजनी धरणातील पाणीसाठा ५६ टक्क्यांवर आला असून फेब्रुवारीत धरण मायनस होईल, अशी चिंताजनक स्थिती आहे.

मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा काही दिवसांतच संपेल. सोलापूर जिल्ह्याची पाणीपातळी यंदा पाच वर्षानंतर पहिल्यांदाच ०.९७ मीटरने खोलवर गेली आहे. तरीपण, जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा व बार्शी या पाच तालुक्यातच दुष्काळ जाहीर होणार आहे. उर्वरित तालुक्यातील शेतकऱ्यांचे काय, त्यांना मायबाप सरकारकडून दुष्काळी मदत मिळणार का, आमदार- माजी आमदार त्यासाठी सरकारकडे यशस्वी पाठपुरावा करतील का, याकडे बळिराजाचे लक्ष लागले आहे.

सरकारला जाणार गुरुवारी अहवाल

जिल्ह्यातील चाऱ्याची सद्य:स्थिती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, खरीप पेरणी व नुकसान आणि उत्पादकता, पडलेला पाऊस व एकूण खंड, रब्बी पेरणीची सद्य:स्थिती, जमिनीची पाणी पातळी, अशा बाबींचा अहवाल तहसीलदारांकडून मागविण्यात आला आहे. गुरुवारपर्यंत तो अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला पाठविला जाणार आहे.

दोन्ही तालुक्यांची सद्य:स्थिती

  • अक्कलकोट तालुक्यातील ७२ हजार १८६ हेक्टर रब्बीच्या क्षेत्रापैकी १४ हजार ५०० हेक्टरवरच सध्या पेरणी.

  • उत्तर सोलापूर तालुक्यातील रब्बीच्या २९ हजार ९४० हेक्टरपैकी सहा हजार हेक्टरवरच पेरणी.

  • अक्कलकोटची पाणीपातळी ०.४९ मीटर तर उत्तर सोलापूरची पाणीपातळी १.२१ मीटरने खालावली.

  • चाऱ्याचा प्रश्न गंभीर, पिण्याच्या पाण्यासाठी काही गावांना टॅंकरची गरज, मध्य प्रकल्प कोरडेच

सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांत दुष्काळ जाहीर होईल. परंतु, उर्वरित उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, मंगळवेढा व मोहोळ या सहा दुष्काळजन्य तालुक्यांसाठीही विशेष बाब म्हणून सरकारकडून मदत मिळावी, असा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. त्यादृष्टीने तहसीलदारांकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागविले आहेत.

- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com