esakal | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! अवकाळीच्या नुकसानीची मिळणार मदत
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer

राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून पंचनामा अहवाल मागितला आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 11 कोटींचे तर राज्यभरात 47 हजार शेतकऱ्यांचे अंदाजित 58 कोटींचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! अवकाळीच्या नुकसानीची मिळणार मदत

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : अवकाळी पावसामुळे (unseasonal rains) मार्च, एप्रिल आणि मे 2021 या कालावधीत झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची (Crop damage) माहिती राज्य सरकारने (Maharashtra State Government) मागवली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना पत्र पाठवून नुकसानीचा पीकनिहाय अहवाल मागवला असून तो सोमवारपर्यंत (ता. 31) सरकारला पाठवला जाणार आहे. (Farmers will get help from the government for crop damage)

हेही वाचा: अखेर हालचिंचोळी तलाव दुरुस्तीस प्रारंभ ! भविष्यातील धोका टळणार

राज्यातील जवळपास 46 हजार 700 शेतकऱ्यांना 55 ते 58 कोटींचा फटका बसल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. कोरोनाच्या संकटाशी दोन हात करतानाच शेतकऱ्याला अवकाळीच्या संकटाला सामोरे जावे लागले. मार्च-एप्रिल व मे महिन्यातील अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका पुणे, नाशिक, ठाणे विभागातील बहुतांश जिल्ह्यांसह अकोला, अमरावती, बुलडाणा येथील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांना बसला. त्यात सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मोहोळ व माळशिरस तालुक्‍यांचाही समावेश आहे. द्राक्ष पिकासह केळी, बेदाणा, आंबा या पिकांचे मोठे नुकसान झाले. राज्यभरातील नुकसानीचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला असून त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील अंदाजित तीन ते साडेतीन हजार शेतकऱ्यांचे 11 कोटींचे तर उर्वरित जिल्ह्यांमधील 43 हजार शेतकऱ्यांचे 45 ते 46 कोटींचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: मोहोळ तालुक्‍याला "डेंटल फ्लोरोसीस'चा विळखा ! का होतो हा आजार?

तत्पूर्वी, संबंधित तालुक्‍यांनी नुकसानीचे पंचनामे करावेत, अशा सूचना तहसीलदारांना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी पंचनामेही करून ठेवले, परंतु सरकारकडून मदतीची काहीच घोषणा न झाल्याने ते अहवाल त्यांच्याकडेच पडून होते. आता सोमवारी (ता. 24) सरकारने अवकाळीच्या नुकसानीची माहिती मागविल्याने ते अहवाल शासनाला सोमवारपर्यंत पाठविले जाणार आहेत. कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या बळिराजाला मदतीचा हात देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज...

  • नुकसानग्रस्त जिल्हे : 17

  • अंदाजित नुकसानीचे क्षेत्र : 17,600 हेक्‍टर

  • नुकसानग्रस्त शेतकरी : 46,700

  • नुकसानीची रक्‍कम : 55 ते 58 कोटी

मार्च ते मे या काळातील अवकाळीने नुकसान झालेल्या शेतीपिकांची माहिती शासनाने मागवली आहे. पंढरपूर, माळशिरस, मोहोळसह इतर तालुक्‍यातील नुकसानग्रस्तांची माहिती संकलित केली आहे. सोमवारी (ता. 31) जिल्ह्यातील नुकसानीचा अंतिम अहवाल पाठविला जाणार आहे.

- भारत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर