esakal | अखेर हालचिंचोळी तलाव दुरुस्तीस प्रारंभ ! भविष्यातील धोका टळणार
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Impact

"सकाळ'ने बातमी तसेच "भूमिका' सदरातून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार या तलावाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले.

अखेर हालचिंचोळी तलाव दुरुस्तीस प्रारंभ ! भविष्यातील धोका टळणार

sakal_logo
By
राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : हालचिंचोळी (ता. अक्कलकोट) (Akkalkot) येथील लघु पाटबंधारे तलावाच्या दुरुस्तीच्या कामास आजअखेर आमदार सचिन कल्याणशेट्टी (MLA Sachin Kalyanshetti) यांच्या हस्ते पूजनाने प्रारंभ करण्यात आला. "सकाळ'ने (sakal esakal) मागील आठवड्यात या कामासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला होता. हे काम पूर्णपणे व्यवस्थित झाल्यास भविष्यात धोका उद्‌भवणार नाही. (With the commencement of Halchincholi Lake repair work, future dangers will be avoided)

हेही वाचा: आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवण्याआधी व्हावी बेवारस "हालचिंचोळी'ची दुरुस्ती !

हालचिंचोळी (ता. अक्कलकोट) येथील नादुरुस्त लघु पाटबंधारे तलाव दुरुस्तीकामी लक्ष घालून भविष्यातील संभाव्य हानी टाळावी, असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना ग्रामस्थांनी केले होते. त्यास अनुसरून आमदार कल्याणशेट्टी यांनी ग्रामस्थांसमवेत या तलावाच्या दुरवस्थेची पाहणी केली आणि जिल्हाधिकाऱ्यांना भेटून लवकरच तुमचा प्रश्न मार्गी लावतो, असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे आमदार कल्याणशेट्टी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन तातडीने याकामी लक्ष घालून काम करून देण्याबाबत आवाहन केले होते. दुरुस्ती काम प्रारंभावेळी तहसीलदार अंजली मरोड, सरपंच भीमाबाई बनसोडे, उपसरपंच श्रीशैल माशाळे, पोलिस पाटील किरण सुरवसे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिवा कोरे, ग्रामसेवक श्री. कट्टीमनी तसेच प्रकाश सुरवसे, अमोल काळे, अमोल कोरे, सतीश संभुभैरे, नाना जमादार, मोहन घंटे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा: AIMA MAT : इंटरनेट आधारित टेस्टच्या रजिस्ट्रेशनसाठी दोनच दिवस मुदत

अक्कलकोट नगरपरिषदेने या तलावातील पाणी घेणे बंद केल्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे तलावाची दुरवस्था झाली आहे. भराव खचणे, बंधाऱ्यास समांतर भेगा पडणे, भरावावर काटेरी झुडपे वाढणे, पाण्याच्या बाजूचे दगडी पिचिंग खचलेले व विस्कळित होणे, सांडव्याच्या भागाची पडझड होणे आदी बाबींमुळे तलावाला कधीही धोका होऊ शकतो. त्यासाठी तातडीने काम सुरू करावे, असे वृत्त "सकाळ'ने प्रकाशित केले होते. मंगळवारी सकाळी जेसीबीचे पूजन करून कामास प्रारंभ करण्यात आला. आता या कामास आणखी जेसीबी आणि पोकलेनची व्यवस्था होणार असल्याने काम लवकरच पूर्ण होऊन दुरवस्था संपणार आहे.

"सकाळ'ची भूमिका

तब्बल 50 वर्षांपूर्वी तयार झालेला हालचिंचोळी तलाव पूर्वी पाटबंधारे विभागाकडे होता. त्यानंतर तो 22 डिसेंबर 1995 रोजी परिसर अभियांत्रिकी विभागाकडे वर्ग करण्यात आला. नंतर 1 ऑक्‍टोबर 1998 रोजी तो नगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आला. अक्कलकोट शहरास या तलावातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. नंतर हिळ्ळी व बोरी प्रकल्पातून अक्कलकोट शहरास पाणीपुरवठा होऊ लागल्याने या तलावाकडे दुर्लक्ष झाले. सध्या तलावाची दुरवस्था झाल्याने या परिसरास धोका निर्माण झाला होता. याच्या दुरुस्तीसाठी आमदार कल्याणशेट्टी यांनी पाठपुरावा केला होता. "सकाळ'ने बातमी तसेच "भूमिका' सदरातून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार या तलावाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले.