esakal | एकाच चितेवर बापासह दोन मुलींचा अंत्यविधी ! सावडीकरही हळहळले
sakal

बोलून बातमी शोधा

Death

एकाच चितेवर बापासह दोन मुलींचा अंत्यविधी ! सावडीकरही हळहळले

sakal_logo
By
अण्णा काळे : सकाळ वृत्तसेवा

करमाळा (सोलापूर) : सावडी (ता. करमाळा) येथे बाप व दोन मुलींच्या एकाच चितेला अग्नी देण्यात आला. ही काळीज पिळवटून टाकणारी घटना पाहण्याची वेळ सावडीकरांवर आली. संपूर्ण गावात या घटनेचा दुखवटा पाळण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी, की इंदोरी (ता. मावळ) येथे मुलींच्या प्रेमप्रकरणांवर आणि चारित्र्यावर संशय घेऊन मध्यरात्री मुलींना रस्त्यावर झोपविले आणि त्यांच्या अंगावर ट्रक घालून बापानेच खून केला. नंतर बापाने स्वत: ट्रकखाली उडी घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता. 17) मध्यरात्री एकच्या सुमारास घडली.

इंदोरी (ता. मावळ) येथे राहणारे भराटे कुटुंब मूळचे सावडी (ता. करमाळा) येथील आहे. भरत भराटे हे साधारणपणे 15 वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात पुण्यात गेले होते. तेथे काही दिवस ड्रायव्हर म्हणून दुसऱ्यांच्या गाडीवर काम करून अलीकडच्या काळात स्वतःचा ट्रक घेतला होता. लॉकडाउन लागण्यापूर्वी ते सावडी येथे येऊन गेले होते. त्यानंतर ही घटना घडल्याचे समजताच संपूर्ण सावडी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा: लस घेतल्यानंतर पाळा "हे' नियम ! दुसरा डोस घ्या आठ आठवड्यांतच

भरत भराटे यांनी मुलींच्या मोबाईलवर बोलण्याचा राग मनात धरून हे कृत्य केले. नंदिनी भरत भराटे (वय 19) व वैष्णवी भरत भराटे (वय 14) असे खून झालेल्या दोन्ही बहिणींची नावे आहेत. तर भरत भराटे (वय 45) असे बापाचे नाव आहे. भराटे यांच्या मागे एक आठ वर्षांची मुलगी व पत्नी आहे. या प्रकरणी सपना भरत भराटे (वय 36, रा. सावडी, ता. करमाळा, जि. सोलापूर, सध्या रा. इंदोरी, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे.

गेल्या काही वर्षांपासून हे कुटुंब मावळ तालुक्‍यातील इंदोरी गावातील अल्फा नगरी सोसायटीत वास्तव्यास होते. भरत भराटे यांचा स्वत:चा ट्रक होता. त्यांना पत्नी आणि तीन मुली होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुलींचे प्रेमप्रकरण सुरू आहेत, असा संशय भरत भराटे यांना होता. मुलींच्या "अशा' वागण्याने नाव खराब होईल, यापेक्षा जीव दिलेला बरा, असे भरत भराटे हे पत्नी सपना यांना वारंवार बोलून दाखवत होते. पण ते असे करतील असे कधी वाटले नव्हते.

हेही वाचा: कोरोना पॉझिटिव्ह शिक्षकांना आता दोन महिन्यांची सुट्टी !

भराटे हे इंदोरी (ता. मावळ) येथे कमी लोकवस्तीत राहात होते. त्यामुळे उन्हाळ्याचे दिवस असल्याने ते सर्वजण बाहेर झोपले होते. मुलींच्या प्रेम प्रकरणाच्या संशयातून भरत भराटे हे रविवारी पहाटे एकच्या सुमारास उठले व आपला स्वतःचा ट्रक (एमएच 12 एचडी 1604) चालू करून झोपलेल्या नंदिनी आणि वैष्णवी या मुलींच्या अंगावर घातला व मुलींच्या अंगावरून ट्रक जाताच ट्रकमधून खाली उतरून स्वतः त्याच ट्रकखाली उडी मारून जीव दिला, असे फिर्यादी सपना भराटे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

भरत भराटे हे धार्मिक वृत्तीचे होते. दरवर्षी भराटे वस्तीवर हनुमान जयंतीनिमित्त होणाऱ्या सप्ताहात वर्गणी देण्यापासून सर्व कामात आघाडीवर असायचे. हलाखीच्या परिस्थितीत पुण्यात जाऊन त्यांनी संसार वाढवला होता. त्यांनी हा निर्णय घ्यायला नको होता. या घटनेने गाव अंतर्मुख झाले आहे.

- भाऊ शेळके, सावडी, ता. करमाळा

loading image