esakal | उपासमारीला कंटाळून 'ती'चा आत्महत्येचा प्रयत्न! पण...
sakal

बोलून बातमी शोधा

उपासमारीला कंटाळून 'ती'चा आत्महत्येचा प्रयत्न! पण...

दोन दिवसांपासून उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांनी चहा मागितला. परंतु, तोही देता येत नसल्याच्या नैराश्‍यातून महिलेने तलावात उडी घेऊन आत्महत्येचा निश्‍चय केला.

उपासमारीला कंटाळून 'ती'चा आत्महत्येचा प्रयत्न! पण...

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : दोन दिवसांपासून उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांनी चहा मागितला. परंतु, तोही देता येत नसल्याच्या नैराश्‍यातून जुळे सोलापुरातील (Jule Solapur) भारतरत्न इंदिरा नगरातील महिलेने विजयपूर रोडवरील छत्रपती सम्भाजी महाराज तलावात (Chhatrapati Sambhaji Maharaj Lake) उडी घेऊन आत्महत्येचा निश्‍चय केला. मात्र, गणेशोत्सवानिमित्त तलाव परिसरात पोलिसांचा बंदोबस्त (Police Security) होता. संशयितरीत्या फिरणाऱ्या त्या महिलेला महिला पोलिसांनी हेरले आणि त्यांनी तिला विश्‍वासात घेऊन विचारल्यानंतर सर्व हकीकत समोर आली.

हेही वाचा: कासेगावातील राष्ट्रवादी मेळाव्यात कोरोना नियमांचा फज्जा!

सुखाचा संसार सुरू असतानाच पतीने (चार-पाच वर्षांपूर्वीच) अर्ध्यातून साथ सोडली. एकटी पडलेली पत्नी दोन चिमुकल्यांचे पोट भरण्यासाठी विडी वळण्याचे काम करू लागली. परंतु, कोरोना काळात घरातील दोन मुलांना सोडून काम करणे तिला कठीण झाले. घरात सात वर्षांची चिमुकली मुलगी आणि पाच वर्षांचा लहान मुलगा. हातावरील पोट असल्याने दोन्ही मुलांच्या पोटाची खळगी भरणे अवघड झाले. तिने काम शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु कोरोनामुळे कुठेही काम मिळाले नाही. त्यामुळे त्या महिलेने काही दिवस दुसऱ्यांकडे मागून भागवाभागवी केली. आता त्यांनीही देणे बंद केल्याने दोन दिवसांपासून मुले उपाशीपोटीच होती. मुलांनी खायला काहीतरी मागूनही देता आले नाही. शनिवारी (ता. 11) सकाळी उठल्यावर त्यांनी आईकडे चहा मागितला. परंतु, घरातील चार भांडी काही दिवसांपासून रिकामीच पडली होती. पावसामुळे घर गळत असल्याने चूल पेटवायला काहीच नव्हते. या नैराश्‍यातून "ती'ने मुलांना सोडून जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला. तलावाशेजारील मंदिरात त्या महिलेने दोन्ही मुलांना सोडले आणि तलाव गाठला. त्या ठिकाणी गणेशोत्सवासाठी नियुक्‍त पोलिसांची नजर त्या महिलेवर पडली. त्यांनी तिला ताब्यात घेऊन विचारल्यानंतर वस्तुस्थिती समोर आली. सदर बझार पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी त्या महिलेचे समुपदेशन केले आणि तिचा निर्णय बदलला.

हेही वाचा: तुमच्या प्रभागात कोरोनाचे किती रुग्ण? जाणून घ्या अपडेट

गळक्‍या छताखाली चार भांड्यांवर संसार

जुळे सोलापूर परिसरातील भारतरत्न इंदिरा नगरातील त्या महिलेचा पती घर सोडून गेल्यानंतर एकाच खोलीत तिने संसार थाटला. पावसाळ्यात गळणाऱ्या छताखाली ती राहात असून, घरात अवघी चार-पाच भांडी आहेत. मुलगी पहिलीत शिकत असून दुसरा मुलगा पाच वर्षांचा आहे. नगरसेविका फिरदोस पटेल यांनी त्या महिलेला दोन महिन्यांचे धान्य दिले असून, दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च देण्याची तयारी दर्शविली आहे.

loading image
go to top