२ ते २० जानेवारीपर्यंत पोलिस भरतीची मैदानी चाचणी! दररोज ९०० उमेदवारांना बोलवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी
२ ते २० जानेवारीपर्यंत पोलिस भरतीची मैदानी चाचणी! दररोज ९०० उमेदवारांना बोलवणार

२ ते २० जानेवारीपर्यंत पोलिस भरतीची मैदानी चाचणी! दररोज ९०० उमेदवारांना बोलवणार

सोलापूर : पोलिस भरतीच्या मैदानी परीक्षेचे वेळापत्रक शहर पोलिस आयुक्तालयाकडून अंतिम झाले आहे. चालक पदाची पहिल्यांदा आणि त्यानंतर पोलिस शिपाई पदांसाठी मैदानी चाचणी होईल. २ ते २० जानेवारीपर्यंत मैदानी चाचणी उरकली जाणार आहे. ग्रामीण पोलिस दलाची मैदानी चाचणी देखील २ जानेवारीपासूनच सुरु होणार आहे.

सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातर्फे चालकपदाच्या ७३ जागांसाठी पाच हजार ५५८ उमेदवारांचे अर्ज आहेत. तर शिपाई पदाच्या ९८ जागांसाठी सहा हजार ६२१ उमेदवार मैदानात आहेत. चालकसाठी २५२ महिला तर शिपाई पदासाठी एक हजार ३८५ महिला उमेदवार आहेत. आयुक्तालयाच्या मैदानावरच उमेदवारांची मैदानी चाचणी पार पडेल. २ जानेवारीपासून मैदानीला सुरवात होणार असून पहिल्या दिवशी ६०० उमेदवारांना बोलावले जाणार आहे. त्यानंतर दररोज ९०० उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन आयुक्तालयाने केले आहे. चालकपदाच्या उमेदवारांची मैदानी झाल्यानंतर पोलिस शिपाई पदासाठी अर्ज केलेल्यांना बोलावले जाणार आहे. २० जानेवारीपर्यंत मैदानी चाचणी झाल्यानंतर फेब्रुवारीत लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन सुरु आहे. मुंबई वगळता राज्यभरात पोलिस शिपाई व चालक पदांसाठी एकदाच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. अतिशय पारदर्शक पद्धतीने मैदानी चाचणी पार पडणार असून त्यात कमीतकमी मानवी हस्तक्षेप राहणार आहे. भरतीच्या प्रत्येक क्षणाचे व्हिडिओ शूटिंग केले जाणार असून भरती काळात मैदानावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहे.

शिपाई पदासाठी एक तृतीयपंथी उमेदवार

न्यायालयाच्या आदेशानुसार पहिल्यांदाच पोलिस भरतीत तृतीपंथीयांना संधी मिळाली आहे. त्यांची मैदानी चाचणी कशी होणार, त्यात धावणे, गोळाफेक पुरुषांप्रमाणे की महिलांप्रमाणे होणार की त्यांचे स्वतंत्र नियोजन होणार हे अजूनही निश्चित झालेले नाही. आगामी काही दिवसात ते ठरणार आहे. दरम्यान, सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस भरतीत फक्त एकाच तृतीयपंथी उमेदवाराने पोलिस शिपाई पदासाठी अर्ज केला आहे.

सिद्धेश्वर यात्रेसाठी १२ ते १६ जानेवारी सुटी

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा १२ जानेवारीपासून सुरु होणार आहे. तत्पूर्वी, २ जानेवारीपासून पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीला प्रारंभ होईल. पण, श्री सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्ताने पोलिस भरतीची मैदानी चाचणी पाच दिवस थांबवली जाणार आहे. उमेदवारांना १२ ते १६ जानेवारी या काळात सुटी राहील, असेही पोलिस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

मैदानी चाचणीचे वेळापत्रक

  • चालक

  • २ ते ८ जानेवारी

  • दररोज ९०० उमेदवारांची चाचणी

  • शिपाई

  • ९ ते ११ जानेवारी

  • १२ ते १६ जानेवारी सुटी

  • १७ ते २० जानेवारी