esakal | वृद्धाश्रमातील तब्बल 15 जणांनी दिली कोरोनाला हुलकावणी !

बोलून बातमी शोधा

Old age home

वृद्धाश्रमातील तब्बल 15 जणांनी दिली कोरोनाला हुलकावणी !

sakal_logo
By
संतोष पाटील

टेंभुर्णी (सोलापूर) : कोरोनाची (Covid-19) अनाठायी भीती बाळगल्याने संकट अधिक वाढत आहे. टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रमातील आश्रम (Old age home) चालकासह एकूण पंधरा जण अनाथ, निराधार ज्येष्ठ नागरिक व महिला कोरोना तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आल्या. यानंतर टेंभुर्णी येथील संकेत मंगल कार्यालयातील कोव्हिड सेंटरमध्ये दहा जण, दोन महिलांना होम क्वारंटाईन तर तिघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनाची खंबीरता व जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन व कृत्रिम ऑक्‍सिजनविना वृद्धाश्रमातील सर्व अनाथ व निराधार ज्येष्ठ नागरिक व महिला कोरोनामुक्त झाल्या. (Fifteen elderly corona in the old age home were cured of the disease)

विशेष म्हणजे, कोरोनामुक्त होणाऱ्यांमध्ये वयाची ऐंशी वर्षे पार केलेल्या एका अंध वृद्धाचाही सामावेश आहे. वेळीच काळजी व उपचार घेतल्यास कोरोनाच्या संकटावर यशस्वीपणे मात करू शकतो, असा विश्वास त्यांनी निर्माण केला असून, तो अनेकांना निश्‍चितच प्रेरणादायी आहे.

हेही वाचा: "उजनी'च्या मूळ पाणी वाटपात हस्तक्षेप नाही ! खडकवासला धरण विभागाचे स्पष्टीकरण

टेंभुर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते बिभीषण देशमुख यांच्या प्रेरणेतून दशरथ महाडिक- देशमुख यांनी 2002 मध्ये आपल्या शेतामध्ये महाडिक वस्ती येथे अनाथ व निराधार वृद्धांसाठी गोविंद वृद्धाश्रम सुरू केले. त्यानंतर 11 वर्षांपूर्वी टेंभुर्णी- अकलूज रस्त्यावरील अडीच एकर जागेत या वृद्धाश्रमाचे स्थलांतर करण्यात आले. या ठिकाणी पाच स्लॅबच्या व सहा पत्र्याच्या खोल्या आहेत. सध्या वृद्धाश्रमामध्ये 22 ज्येष्ठ नागरिक व महिला आहेत. या वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना अनाथ व निराधार असल्याची भावना निर्माण होऊ नये याची काळजी घेतली जाते. याकरिता पहाटे काकडा आरती, रामायण, नऊ वाजता चहा-नाश्‍ता, दुपारी जेवण चार वाजता नाम जप, सायंकाळी चहा, हरिपाठ, रात्री जेवण आणि विश्रांती असा येथील दिनक्रम असतो. शिवाय वर्षभरातील सर्व सणवार उत्साहात साजरे केले जातात.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने चालक दशरथ महाडिक- देशमुख यांनी 9 एप्रिल रोजी वृद्धाश्रमातील सर्वांची कोरोना तपासणी केली. दीपक इंगळे (वय 65), मोरेश्वर घाणेकर (वय 85), प्रदीप थिटे (वय 53), राजेश साळवी (वय 61), नंदकिशोर चव्हाण (वय 57), शांताबाई उकिरडे (वय 70), रुक्‍मिणी पवार (वय 68), चतुरा महाडिक (वय 70), लंका व्हनमुखे (वय 47), रंजना मोरे (वय 70), अंजना राऊत (वय 70), भागीरथी बाळापुरे (वय 72) व अन्य दोन महिला तसेच वृद्धाश्रमाचे चालक दशरथ महाडिक -देशमुख (वय 61) यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे दशरथ महाडिक- देशमुख यांच्यासह सोमनाथ महाडिक व जयराम महाडिक या दोन मुलांनी तातडीने यातील दहा पॉझिटिव्ह वृद्धांना टेंभुर्णी ग्रामपंचायत व आरोग्य विभागातर्फे सुरू केलेल्या संकेत मंगल कार्यालयातील कोव्हिड सेंटरमध्ये दाखल केले. तिघांना अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तर दोन महिलांना वृद्धाश्रमामध्येच होम क्वारंटाईन केले.

हेही वाचा: जिल्ह्यातील 1674 रुग्णांची कोरोनावर मात ! नव्याने वाढले 2009 रुग्ण

टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल माने, डॉ. विक्रांत रेळेकर, डॉ. प्रणिती खोटे यांनी त्यांच्यावर उपचार केले. टेंभुर्णीचे सरपंच प्रमोद कुटे, ग्रामविकास अधिकारी मधुकर माने, गणेश केचे आदींनी कोव्हिड सेंटरमधील रुग्णांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. विशेष म्हणजे दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले मोरेश्वर घाणेकर (वय 85) यांनी देखील उपचाराला उत्तम प्रतिसाद दिला. सर्व वृद्धांनी कोरोनाशी यशस्वीपणे झुंज देऊन कोरोनावर मात केली. कोव्हिड सेंटरमध्ये दाखल केलेल्या वृद्धाश्रमातील एकाही रुग्णाला ऑक्‍सिजन अथवा रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन देण्याची गरज भासली नाही. बारा दिवसांच्या उपचारानंतर सर्व रुग्ण ठणठणीत बरे होऊन वृद्धाश्रमात परतले आहेत. सध्या गृह विलगीकरणामध्ये सर्वजण असून पूर्वीप्रमाणेच त्यांचा दिनक्रम सुरू झाला आहे.

वृद्धाश्रमाची सुरवात झाल्यापासून गेल्या 19 वर्षात वृद्धाश्रमातील 79 लोकांचा वृद्धापकाळाने निधन झाले. या सर्व वृद्धांवर आश्रमामार्फत अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच चांगल्या घराण्यातील, आर्थिक परिस्थिती उत्तम असताना केवळ मुले व्यवस्थित सांभाळत नाहीत, त्यामुळे नाइलाजाने अथवा उद्वेगातून 169 वृद्ध घरातून निघून येथील आश्रमामध्ये आले होते. त्यांच्याकडून मुलांचा पत्ता घेऊन त्यांना या ठिकाणी बोलावून आई- वडिलांचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर त्यांना स्वगृही पाठविण्याचे काम केले तसेच वृद्धाश्रमातील 11 अनाथ, निराधार व अपंग मुलींची लग्नं वृद्धाश्रमात करून दिली आहेत. स्वतःच्या शेतातील उत्पन्न, वाढदिवस व पुण्यतिथिनिमित्त आलेल्या दानधर्मातून वृद्धाश्रमाचा खर्च केला जातो. गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे दानधर्म कमी झाल्याने वृद्धाश्रमाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे वृद्धाश्रम चालक दशरथ महाडिक देशमुख यांनी सांगितले.