esakal | हर्षवर्धन पाटील म्हणाले, महाविकास आघाडीमधील कोणाला कोणाबद्दल गॅरंटीच राहिली नाही !

बोलून बातमी शोधा

Harshwardhan

सत्तेसाठी कोण कोणाचा गळा दाबतोय तर कोण नाक दाबण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे कोणाला कोणाबद्दलची गॅरंटीच राहिली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेची विश्वासाहर्ता गमावली आहे, अशी टीका करत माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. 

हर्षवर्धन पाटील म्हणाले, महाविकास आघाडीमधील कोणाला कोणाबद्दल गॅरंटीच राहिली नाही !

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या तीन पक्षांमध्ये आता मेळ राहिला नाही. सत्तेसाठी कोण कोणाचा गळा दाबतोय तर कोण नाक दाबण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे कोणाला कोणाबद्दलची गॅरंटीच राहिली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेची विश्वासाहर्ता गमावली आहे, अशी टीका करत माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. 

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे केवळ गृहमंत्र्यांनी नाराजीनामा देणे संयुक्तिक ठरणारे नाही तर नैतिकता म्हणून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही माजी मंत्री पाटील यांनी या वेळी केली. 

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांची बुधवारी गादेगाव (ता. पंढरपूर) येथे प्रचार सभा झाली. या सभेसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आले होते. सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी श्री. पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या लॉकडाउन धोरणांवर टीका करत, परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटींच्या आरोपामुळे मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारने महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास गमावल्याचा आरोप केला. 

श्री. पाटील म्हणाले, राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांना लोकांनी नाकारले आहे. तरीही त्यांनी सत्तेसाठी अनैसर्गिक युती करून महाविकास आघाडी तयार केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक चुकीच्या गोष्टी आता बाहेर येऊ लागल्या आहेत. दीड वर्षात दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. अनेक मंत्र्यांची नावे वेटिंग लिस्टमध्ये आहेत. सत्तेच्या राजकारणासाठी एकत्रित आलेले तिन्ही पक्ष आता एकमेकांचा गळा, नाक आणि तोंड दाबण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. त्यामुळे कोणाला कोणाबद्दलची गॅरंटी राहिली नाही. 

आयपीएस दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्याने एका गृहमंत्र्यांवर नावानिशी आरोप केल्यानंतर त्याच दिवशी त्यांनी राजीनामा देणे अपेक्षित होते. परंतु जेव्हा उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशी करण्याचा आदेश दिला तेव्हा त्यांनी राजीनामा दिला. या प्रकरणामध्ये राज्य मंत्रिमंडळाची विश्वासार्हता संपली आहे, असेही माजी मंत्री पाटील यांनी सांगितले. ही पोटनिवडणूक महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सोयीसुविधांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. पाणी असूनही पिके जळू लागली आहेत. 

या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माऊली हळणवर, दीपक भोसले, पद्माकर बागल, चंद्रकांत बागल, बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, माजी सभापती पोपट रेडे, उपसभापती विवेक कचरे आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल