esakal | गौराई आली सोन्याच्या पावलांनी, माणिक मोत्याचा पावलांनी
sakal

बोलून बातमी शोधा

gauri pujan

गौराई आली सोन्याच्या पावलांनी, माणिक मोत्याचा पावलांनी

sakal_logo
By
राजकुमार घाडगे

पंढरपूर (सोलापूर) : गौराई आली सोन्याच्या पावलांनी.. गौराई आली माणिक मोत्याचा पावलांनी.. असे म्हणत रविवारी (ता.12) लाडक्या गौराईचे घरोघरी आगमन झाले. गौराई चे स्वागत करताना महिलावर्गाचा उत्साह ओसंडून वाहत होता.

गणेशोत्सवातील महत्त्वाचा सण म्हणजे गौरी आगमन. गणेशोत्सवात गणपती पाठोपाठ दोन दिवसांनी गौरीचं आगमन होतं. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरीचं घरोघरी आगमन होतं. ग्रामीण भागात गौरी पूजनाला 'महालक्ष्मी पूजन'असेही म्हणतात. यंदा सगळीकडे कोरोनाचे संकट असले तरी महिलांनी गौरी सणाच्या उत्साहात कुठेही कमतरता ठेवली नाही.

हेही वाचा: लक्ष्मीच्या पावलांनी गौराईचे आगमन; घरोघरी उत्साहात स्वागत

नऊवारी साडी, केसांचा अंबाडा त्यावर गजऱ्याचा हार, नथ, गळ्यात हार, मंगळसूत्र असा पारंपरिक साजश्रृंगार करून महिलांनी गौरीचे पूजन केले. घराघरात गौराई समोर विविध वस्तू, फळे, मिठाई, आकर्षक रोषणाईची सजावट केल्याचे दिसून आले. गौरी-गणपतीच्या निमित्ताने बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढल्याने व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले. चौफाळा येथील फुलांचे विक्रेते दीपक राऊत म्हणाले, फुलबाजारात झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली. शेवंतीची फुले मात्र इथे मिळत नसल्याने आम्ही खास बेंगलुरू येथून मागवली आहेत. सणामुळे फुलहारांच्या दरात वाढ झाली असून पिक्चर एरवी पन्नास रुपयाला मिळणारा फुलांचा मोठा हार शंभर रुपये दराने विकला जात आहे.

गौराईला भाजी-भाकरी सह भोजनाचा नैवेद्य देण्याची प्रथा आहे. त्याकरिता भाजीबाजारात महिला वर्गाने मोठी गर्दी केली होती. दरवर्षीपेक्षा यंदा मात्र भाज्यांचे दर उतरल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले. गौराईला नैवेद्य दाखवण्यासाठी केळीच्या पानाला मोठी मागणी होती. केळीचे एक पान दहा रुपयाला विकले गेले. गौराईची प्रतिष्ठापना करताना विविध पद्धती दिसून आल्या. काही घरात गौराई पाटावर विराजमान होत्या तर काही लोखंडी सांगाड्यावर सजावट करून केल्या होत्या. पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सव व गौराईच्या सणामुळे घराघरात पुढील काही दिवस भक्तिमय वातावरण असणार आहे.

loading image
go to top