पंढरीच्या विठूरायाला अर्पण केलेले सोने मुंबईत वितळवणार! कार्तिकी यात्रेनंतर होणार कार्यवाही | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंढरीच्या विठूरायाला अर्पण केलेले सोने मुंबईत वितळवणार!
पंढरीच्या विठूरायाला अर्पण केलेले सोने मुंबईत वितळवणार! कार्तिकी यात्रेनंतर कार्यवाही

पंढरीच्या विठूरायाला अर्पण केलेले सोने मुंबईत वितळवणार!

पंढरपूर (सोलापूर) : श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात (Vitthal-Rukmini Temple) 1985 पासून भाविकांनी सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) अनेक लहान- लहान वस्तू, दागिने (Jewelry) अर्पण केले आहेत. समितीला हे सर्व दागिने आणि वस्तू पोत्यात भरून ठेवायची वेळ आली आहे. त्यामुळे मंदिर समितीने शासनाच्या न्याय व विधी विभागाला (Department of Justice and Law) सुमारे 19 किलो वजनाच्या सोन्याच्या आणि 425 किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू वितळवून त्यातून नवीन अलंकार करण्यासाठी परवानगी मागितली होती. शासनाने त्याला परवानगी दिली आहे. कार्तिकी यात्रेनंतर (Kartiki Yatra) मुंबईत सोने वितळवण्याचे काम शासनाने निर्देश दिल्यानुसार केले जाईल, अशी माहिती प्रांताधिकारी तथा श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव (Gajanan Gurav) यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. कार्तिक यात्रेनंतर 20 ते 25 नोव्हेंबर च्या दरम्यान मुंबई येथे सोने-चांदी वितळविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

हेही वाचा: कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर नगपालिका प्रशासन सज्ज!

भाविकांनी दान स्वरूपात अर्पण केलेल्या लहान वस्तू आणि दागिने वर्षानुवर्षे साठवून ठेवण्यात आले आहेत. अशा सोन्याच्या वस्तू एकत्र करून त्यांची वीट तयार करावी, अशी भूमिका मंदिर समितीच्या सदस्यांनी घेतली होती. 2015 पासून त्या संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार सुरू होता. 2018 मध्ये शासनाने परवानगी दिली होती; परंतु प्रत्यक्षात कार्यवाही मात्र झाली नव्हती.

नुकत्याच झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत सोने, चांदी वितळवून सोन्याची वीट करण्याऐवजी देवाला घालण्यासाठी त्या सोन्या-चांदीतून अलंकार तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मंदिर समितीचे माजी कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी शासनाकडे यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या बदलीनंतर नूतन कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी शासनाकडे पाठपुरावा करून आणि संबंधितांशी बोलणे देखील केले होते. त्यानुसार आता शासनाने मदिर समितीस सोने- चांदी वितळविण्यास परवानगी दिली आहे. कार्तिकी यात्रेनंतर 20 ते 25 नोव्हेंबरच्या सुमारास ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

हेही वाचा: सिद्धिविनायक, शिर्डी सुटले; कॉंग्रेसच्या वाट्यातील पंढरपूर का लटकले?

मंदिर समितीकडे सगळे मिळून सुमारे 28 किलो वजनाचे सोन्याचे अलंकार आहेत. त्यापैकी जुने दागिने तसेच ठेवण्यात येणार आहेत. एकूण 28 किलो सोन्यापैकी सुमारे 19 किलो सोन्याचे छोटे दागिने (अंदाजे किंमत दोन कोटी 95 लाख) आणि वस्तू आणि एकूण 900 किलो चांदीपैकी 425 किलो चांदी (अंदाजे किंमत एक कोटी 20 लाख) वितळवण्यात येणार आहे. शासनाने या प्रक्रियेसाठी न्याय व विधी विभागाचे सहसचिव सुभाष कऱ्हाळे यांची नियुक्त केली आहे. त्यांच्यासह समितीचे तीन सदस्य, कार्यकारी अधिकारी हे वितळवण्यासाठीच्या सोन्या- चांदीच्या दागिन्यांची यादी अंतिम करतील आणि नंतर पंढरपूर येथून मुंबईत शासनाच्या रिफायनरीमध्ये सोने- चांदी जमा केले जाईल. तिथे सोने- चांदीची तपासणी करून त्याच्या नोंदी करून वितळवून त्याच्या विटा तयार केल्या जातील. वितळवलेल्या सोन्या- चांदीपासून कोणते दागिने बनवायचे याचा निर्णय अजून झालेला नाही. शासन आणि मंदिर समिती त्याविषयी निर्णय घेणार आहे.

loading image
go to top