esakal | शेतकऱ्यांनो, आनंदाची बातमी ! बाजार समितीत नियमांचे पालन करून होतील शेतमालाचे लिलाव
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी उत्पन्न बाजार समिती

शेतकऱ्यांनो, आनंदाची बातमी ! बाजार समितीत नियमांचे पालन करून होतील शेतमालाचे लिलाव

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : कोरोनाची साळखी खंडीत करण्याच्या हेतूने आज रात्री आठ वाजल्यापासून कडक संचारबंदीची अंमलबजावणी केली जाणार आहे. या काळात घरपोच सेवा (होम डिलिव्हरी) सुरू राहणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी दिली. तर कोरोनासंबंधीचे सर्व नियम पाळून कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव सुरु राहतील, अशी माहिती बाजार समितीचे प्रभारी सचिव अंबादास बिराजदार यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. पहाटे पाच ते सकाळी साडेसात-आठ वाजेपर्यंत शेतमालांचे लिलाव होतील, असेही बिराजदार यांनी स्पष्ट केले.

शेतमालाच्या वाहनांची अडवणूक नको

कडक संचारबंदी काळात शेतमाल वाहतूक सुरुच राहणार आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्ह्यातील अनेक भागातून विविध प्रकारचा शेतमाल विक्रीसाठी त्याठिकाणी येतो. या पार्श्‍वभूमीवर शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचे कोणतेही वाहन पोलिस कर्मचाऱ्यांनी अडवू नये. मात्र, शेतमालासोबत येताना एकाच शेतकऱ्याने यावे.

- अतुल झेंडे,

प्रभारी पोलिस अधीक्षक, सोलापूर

कडक संचारबंदीच्या काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निराधारांसह नोंदणीकृत घरेलू कामगार, बांधकाम कामगार, परवानाधारक रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रूपये देण्याची घोषणा केली. तर शेतकऱ्यांसाठी काहीच मदतीची घोषणा केली नाही. तरीही दिलासादायक बाब म्हणजे संचारबंदीच्या काळात कोरोनाचे नियम पाळून बाजार समितीतील लिलाव प्रक्रिया सुरु राहणार आहे. सध्या बाजारात कांदा, टोमॅटो, वांगी, बटाटा, अन्य भाजीपाल्यासह विविध शेतमाल विक्रीसाठी येत आहेत. संचारबंदी काळात घरात लॉकडाउन असलेल्यांना घरपोच शेतमाल पोहच करण्याची सवलतही देण्यात आली आहे. परंतु, घरपोच सेवा देणाऱ्यांना मागील 48 तासांतील कोरोना टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच त्यांनी लस टोचून घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.शेतमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनीही कोरोन टेस्ट करून घेणे आवश्‍यक आहे.

ठळक बाबी...

  • बाजार समितीत आजपासून शेतमालाची किरकोळ विक्री बंद

  • कांदा, बटाटा, वांगी, टोमॅटोसह अन्य शेतमालाचा दररोज लिलाव; गर्दी होणार नाही याची घेतली जातेय दक्षता

  • पहाटे पाच ते सकाळी आठ वाजेपर्यंत बाजार समितीत होणार शेतमालाचे लिलाव

  • आडत व्यापारी, हमाल, मजुरांना कोरोना टेस्टचे बधंन; दररोज सुरु आहे टेस्टिंग

  • शेतकऱ्यांनी एकत्रित शेतमाल पाठविला असल्यास सर्वांनी येऊ नये; बाजार समितीच्या सचिवांचे आवाहन

  • आडत व्यापाऱ्यांशी संपर्क ठेवून शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री करण्यासंदर्भात सचिवांच्या सूचना

  • शहरातील नागरिकांना घरपोच शेतमाल पोहचविणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांना फार काळ बाजार समिती थांबण्यास मनाई

  • सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच शेतमालांचे लिलाव; सर्वांना मास्क बंधनकारक

बातमीदार : तात्या लांडगे